कवडसे......

    " कवडसे..."

     दि. 13/5/2018 वेळ संध्याकाळी सहाची आणि आम्हा पाच नवोदीत कवी कवयित्रींच्या परिक्षेचीही.....! कल्याण काव्यमंच प्रस्तुत" कवडसे" या बहारदार काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आम्हा सर्वच सहभागी कवी मडळींची तयारी सुरू झाली होती.  

     कल्याण काव्यमंच ची स्थापनाच नवोदीत कवी कवयित्रींना त्यांच्या काव्यलेखनाला रसिकश्रोत्यांसमोर आणून त्यांना प्रोत्साहन देणे आहे.  कल्याण काव्य मंच ही जशी एक साहित्य साधनेची कार्यशाळा आहेत तशीच ती एक साहित्य चळवळही आहे.

     13 मे ची संध्याकाळ कल्याण काव्य मंच प्रस्तुत कवडसे  च्या निमीत्ताने आम्हा सहभागी सर्व कवीमंडळींसाठी अतिशय महत्वाची होती.  यात सहभागी माझ्यासह सर्वच कवी कवयित्री नवोदीत होतो, त्यामुळे प्रथमच कवडसे या कार्यक्रमामुळे रसिकप्रेक्षकांसमोर जे खास आमच्यासाठी आमच्या कवितांना एेकायला येणार होते त्यांना कवितेतून आनंद देणे ही आमची फार मोठी जबाबदारी होती. आणि जबाबदारी पेलण्याची उर्जा आम्हाला कल्याण काव्य मंच च्या  प्रत्येक सदस्याकडून मिळत होती. सुधा पालवे, अपर्णा ताई, निचीता झुंझारराव  , चित्ते सर, प्रशांत वैद्य सर यांच्या उपस्थितीने ती कार्यक्रमाच्या दिवशीही आमच्या सोबत होती. 

     कार्यक्रमाची सुरूवात श्री. सुधीर चित्ते सरांनी सुत्रसंचालन करून नेहमीच्याच उत्साही आणि आंतरीक आत्मविश्वास वाढवणा-या शब्दांनी केली..... आणि सुरूवातीलाच....
"शब्दानी प्रसन् व्हावं 
मनाचा कोपरा चिंब भिजावा
सुख आणि शांती नांदावी 
शब्दांनी शब्दांशी गोड
होऊन एकजुटीनं नांदावं....!"

असा शब्दांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहचवणा-या सीमा झुंझारराव यांनी प्रथम काव्यवाचन करून रसिकांना आपल्या शब्दकाव्यातून आनंद दिला...! सुरूवातीला केवळ वाचक असणा-या पण वाचनातूनच फुललेले त्यांचे हे काव्य कौतुकास्पद आहे.

     व्यवसायाने डेन्टीस्ट अगदी तरूण ताज्या दमाचा कल्याण काव्य मंचचा तरूण चेहरा......
"प्रेमाचा अनेक व्याख्यांवरूनही प्रेमाचा 
अर्थ सांगणं भल्याभल्यांना नाही जमलं
प्रेम म्हणजे काय असतं हे मलाही 
ख-या अर्थाने प्रेम झाल्यावरच समजलं.....!"

सहज सोप्या सोज्वळ शब्दांतून क्ती मोठा अर्थ सांगणारा हा युवा कवी म्हणजे शुभम नाईक याने अतिशय सुंदर तरल ह्रद्यस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व कव्यरसिकांची दाद मिळवली.....!

     "अंकिता डोंगरे"  हा कल्याण काव्यमंचचा आणखी एक तरूण सुंदर चेहरा आणि तिच्या काव्यातील भावही तसाच सुंदर तरूण आणि परिपक्वतेकडे प्रवास करणारा , आशावादी आणि कणखर वाटला. तीची स्वप्न ही कविता अशीच कणखर वाटली.

"त्यांनी समजावून पाहिले मला
मी नाही एेकले.....
त्यांनी आवाज चढवला 
मी नाही एेकले......
त्यांनी थोडा घातला धाक
मी नाही घाबरले 
मग त्यांनी अश्रूंचा घेतला आधार 
मी नाही विरघळले.....
त्यांच्या कोणत्याही कृतीचा
मला फरक पडला नाही
हे पाहून शेवटी
त्यांनी माझ्या स्वप्नांना स्वीकारले!

अशा प्रगल्भतेकडे जाणा-या युवा कवयित्रीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

     नवकविंचे नवखेपण असूनही काव्यरसिकांनी दिलेली दाद म्हणजे कवी- कवितेला नवा उत्साह देणारी असते याची प्रचिती वेळोवेळी येत होती...!  आणि त्यामुळेच कल्याण काव्यमंचने नवोदितासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ म्हणजे " काव्यपंढरीच" आहे.  आणि या काव्यपंढरीचे आम्ही सर्व सदस्य "वारकरी" आहोत तर "कविता"  आमची "विठूमाऊली"  कार्यक्रम दरम्यान हेच भक्ती कृतज्ञतेचे भाव मनात येत होते.  

     सीमा झुंझारराव, शुभम नाईक, अंकिता डोंगरे यांच्या काव्यवाचनानंतर  सुधाकर वसईकर यांनी त्यांच्या कविता अतिशय उत्कटतेने सादर केल्या.

     "केसात माळलेल्या 
      गज-याचा सुगंध मी 
     धुंदणारा भुंगा मीच तो 
    झिंगणारा भुंगा मीच तो "

या प्रेमकाव्यापासून ते "रंगभुमी" सारखी गंभीर अंतर्मुख करणारी कविता सादर करून उपस्थित सर्वच काव्यरसिकांची मने जिंकली.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की  पार्कातल्या कविता ही काव्यवाचनातील अतिशय सुंदर संकल्पना  यशस्वीपणे सादर करणारे , सुरेश पवार  हे राज्यस्तरीय नाट्यकर्मी  ,  अरूण गवळी  सारखे प्रगल्भ कवी  "कवडसे" या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.  तसेच आयोजकांनी प्रत्येक काव्यरसिक श्रोत्यांची दखल घेत प्रत्येकाचे प्रेमाने स्वागत केले जात होते.    त्यामुळे कवडसे हा कल्याण काव्यमंचच्या अंगणातून ते उपस्थित प्रत्यक रसिकांच्या मनात जाणारी प्रकाशाचा स्रोत होता.

     कवडसे मध्ये माझेही काव्यवाचन होते !  एवढ्या सा-या श्रोत्यांसमोर एक दोन नव्हे तर वीस मिनीटे काव्यवाचन करणे हे इतरांसारखे मलाही दडपण आणणारे होते, कारण माझाही हा पहिलाच होता.  पण सर्वच सन्मानीय सदस्यांनी आम्हाला आत्मिविश्वास दिला म्हणूनच काव्यवाचन, सादरीकरणाचा आनंद घेऊ शकलो.

     "तुझ्या श्वासांची ऊब 
       मला इथे जगवते
       अनं
      माझ्या आसवांची गाज
     तुला तिथे कळते

    काय फरक पडतो 
    तू तिथे 
    अनं 
    मी ईथे   

या कवितेने काव्यवाचनाला सुरूवात केली........ माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि त्याचे माझ्यासाछी खुप होते.  या काव्यवाचनातून मला माझ्या कवितांची रसिक श्रोत्यांच्या मनाच्या ठायी किती झेप घेऊ शकते याची थोडी का होईना कल्पना येणार होती.... !  आणि "कवडसे" कार्यक्रमाने  काव्यरसिकांपर्यंत कवितेने पोहचणे म्हणजे काय याची खरी जाणीव करून दिली.    माझ्या आवडीच्या मिश्र भावनांच्या कविता सादर करतांना मला स्वत:ला सुद्धा खुप आनंद मिळाला.  

उगावावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझा सहनशीलतेचा देठ भिडेल
आणि तू मग सावलीतून फक्त शीतल
माया देशील ज्याची मला आता गरज आहे!
तुझ्या आतल्या पुरूषाला सांग ना
माझ्यातल्या अगणीत कवितांना तुझा
कोमल स्वर हवाय...!
देशील तू तुझ्यातल्या थोड्या अश्रुंना
माझ्या डोळ्यातल्या आसवांची साथ...!
फार नाही पण हसतांना तूला पहायचंय
तुडूंब भरलेल्या हंड्यातून उचंबळणा-या पाण्यासारखे
तुझ्या सुखाच्या कल्पना एकदा कैनव्हासवर उतरवून
त्यात रंग तूच भर
पण त्यामध्ये एखाददुसरी सुखाची नक्षी माझीही
सामील कर...!
तुझ्या जुन्या फोटोफ्रेममध्ये
अजुनही मला ब्लैकअँड व्हाईट
संदर्भ दिसतात....
काढू नकोस ते बाहेर ...
पण
तिथेच मलाही थोडे आत घे....
माझे सारे तूझ्यात सामावून जावे
असेच प्रयत्न करत आले
तरी मी अजुनही बाहेर आहे...
व्यवहार आणि विश्वास यात
तोलत ठेवून मला अजुनही तू
हिशोबात मांडतोस
पण ...
हिशोबात धरत नाहीस.....!!!!

 ही कविता सादर करतांना मला विशेष आनंद झाला. रसिकांनाही तो मिळाला असेल अशी अाशा करते.  कवडसे हा माझ्यासाठी सर्वच अर्थाने एक अविस्मरणीय अनुभव होता.   काव्यरसिकांपर्यंत आपली कविता पोहचवताना काय  व कसे  भान ठेवावे, काय टाळणे आवश्यक आहे  असे अनेक नवीन धडे मिळाले   कल्याण काव्य मंच ची यासाठी मी कायम ऋणी  असेन . 

     या निमीत्ताने   आमच्या मनातले काव्य'कवडसे' काव्यरसिकांच्या मनामनात प्रकाशाची एक तिरीप जरी सोडून गेले असतील  तरी आम्हाला खुप समाधान मिळेल....! पण ही तर आमची सुरूवात आहे.  अजून खुप अनुभव येणार आहेत.... आणि मला खात्री आहे " कल्याण काव्य मंचच्या" अभिमानास्पद विस्तारासोबत आम्हा सर्व काव्यवारक-यांचा प्रवासही दिमाखदार होणार आहे........!
शुभंम भवतू......!!



  




लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......