जाणीव .....!!!


      नोकरी निमित्त माझा रोजचाच ट्रेन चा प्रवास  …!! मुंबईच्या लोकल ट्रेन्सला कधीही जा खच्चून भरून वहात असतात  …!!  बायकांसाठी तर मोजून तीन डबे   …!!  आणि फर्स्ट क्लासचे डबे  म्हणजे  "एक किचन"  नाव  पण अगदी परफेक्ट दिले आहे  … ! या डब्यात मोजून तेरा सीट असतात  …!! त्यामध्ये चौथी सीट नो अलाउड   …! अश्या ह्या किचन मध्ये एका वेळी आम्ही पन्नास बायका घुसतो  ....!!  एकमेकींच्या पायावर पाय देत  !! खांद्याला खांदा भिडवून शाब्दिक चकमकी घडवून  … प्रवासाचा महामेरु सर करीत घराचा गड गाठत असतो   …!!

      त्यादिवशी  नेहमी प्रमाणे ट्रेनला गर्दी होतीच  … पण जरा जास्तच होती  …!!   ट्रेनमध्ये चढण्याचे दोन प्रयत्न फेल गेले  …!  पण मला  काही डब्यात घुसता आले नाही  !! माझ्यासारखी डब्यात  चढण्याची धडपड   रिटायरमेंटला आलेल्या  अजुन दोन काकू करीत होत्या   .  शेवटी त्यातील एक जण  म्हणाली " आज काय मेलं  आपल्याला गाडीत चढ़ता येईल असे वाटत नाही …!" लेडीज फर्स्ट क्लास ला लागूनच "अपंगांचा " डबा असतो  … ! तुलनेने त्यामध्ये एव्हढी गर्दी नसते    . लगेचच दूस-या काकू म्हणल्याच चला गं आपण त्याच डब्यात चढू   … मी  मात्र काकू काकू  करायला लागले   …  कारण  त्यांचं ठीक होतं   । त्या दोघी वयस्कर होत्या   … पण मी  मेली तरुण तुर्क त्यांच्या बरोबर अपंगांच्या डब्यात चढायचे म्हणजे फारच गिल्टी वाटत होते  …!! गिल्टी वाटण्यापेक्षा भितीच  जास्त …!! पण शेवटी मनाचा हिय्या करून एक काकू पुढे आणि दुस-या माझ्या मागे  . अश्या एकदाच्या "त्या " डब्यात चढ़लो  … पण आम्ही जेमतेम आत घुसु शकलो होतो  … माझ्या मागच्या काकू मागून बोंबलायला लागल्या " अगं जरा पुढे सरका मी  दाराशी लटकतेय   … ! पण माझ्या पुढच्या काकू  का कोण जाणे पण पुढे काही सरकतच नव्हत्या  …!!  " काय  झाले काकू पुढे सरका  नं  …" अगं  कशी सरकू   ......... माझ्या पुढे खाली एकजण बसला आहे  … !"   खाली बसला आहे  ……… ?"  माझी सटकलीच  … मागे त्या  काकू लटकतायत  आणि हा पठ्या खाली बसलाय  … !! काय माणुसकी बिणुसकी आहे की नाही  …? " ओ भाऊ जरा आत सरको   … दिखता नही लोक लटक रहे  है   …!  थोड़ी बी माणुसकी नहीं है   … !!  माझ्या  मराठी मिश्त्रित हिंदीला त्याने जोरात धक्का दिला " ओ मॅडम मै  "अपंग " हूँ  दिखता नहीं  …? मला  काय बोलावे सुचलेच नाही  त्या  गर्दीच्या भाऊगर्दीत मी अपंगांच्या डब्यात घुसून हुशा-या मारत होते  …!!! मागच्या काकूंचा आवाज आपोआपच बंद झाला   …!! 
  
     कुठले तरी स्टेशन आले ( गर्दीत बाहेरचे काहीच समजत नव्हते ) गर्दी थोड़ी कमी झाली आम्ही लगेचच आत सरकलो   …  तेव्हढ्यात डब्यातली माझ्या जवळची एक बाई  माझ्याकडे पायपासून  वरपर्यंत  पाहत होती   । तिच्या नजरेला मी वाचवत होते  । तेव्हढ्यात  " तुमचं काय मोडलय  …? "  तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नाला काय  उत्तर दयावं   ?  काही  नाही मोडलं  … काही मोडु नये  नं म्हणून इथं आलो  ! माझ्या बरोबरच्या काकू आधीच तत्परतेने आपला डावा हात खाली वर करून माझ्या हातात रॉड घातला आहे  बरं …!! विचारणारी बाई पण धड़ धाकटच  दिसत होती  । मी पण लगेच सूडाने विचारले तुमचे काय मोडलय   …?  तिने तिच्या जवळ बसलेल्या तिच्या अपंग मुलाकडे बोट दाखवले  … ! ह्याला पाय नाहीत  …!!  मी  पुन्हा एकदा  पार ख़जिल  खल्लास  !!

     मी सुन्न दारात  उभी राहीले  । डब्यात  सभोवर नजर फिरवली  .  प्रत्येक सीट वर कुणीतरी आंधळे बसले होते, कुणाला पाय नव्हते , तर कुणाला हात नव्हते   !!  कुणाच्या डोक्यावर केस नव्हते ते  फडकी गुंडाळलेली कॅन्सर  पेशंट होते   …!!  ते माणसाच्या जीवनाचे वास्तव चित्र होते  …!! त्या तश्या अवस्थेत प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत  होता  …!!   डबाभर ते दुःख असले तरी मला ते जगातील दुःखाची जाणीव करून गेले  …!! माझ्या पूर्णत्वाची जाणीव करून देणारा तो  अपंगाचा डबा त्याने मला माझा आरसा दाखवला   !! छोट्या छोट्या अडचणींना दुःख समजून कवटाळायचे आणि मिळालेल्या ह्या पूर्णत्वाला नकारुन सुखी जीवनापासून स्वतःला दूर ठेवायचे  …!! मला हे सत्य माहित नव्हते असे  नाही  पण आज मला सत्याची प्रखर जाणीव झाली  …!!  



     माझे स्टेशन आले मी  उतरले   आणि  खटकन माझी चप्पल तुटली मी  तीला तिथेच सोडले  आणि माझ्या मोकळ्या पायांनी चालायला लागले न लाजता  …!!


                                                                                           "  समिधा  "


लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......