आज सावित्रीबाई फुलेंची १८३ जयंती …!! आम्हा आया बायांची मूली बाळींची ज्ञानाई माउली …!
प्रतिगामी म्हणवणा-या समाजाच्या शिव्या शाप झेलुन न डगमगता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले नसते
तर आज मी हा त्यांच्यावरील कृतज्ञतेचा लेख लिहु शकली नसती !
मुलींना शिकवणे म्हणजे सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे
सांगून सनातन्यांनी विरोध केवळ विरोध केला नाही तर . अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी
तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा
उपक्रम चालूच राहिला. हा सनातन धर्मांधळा समाज किती क्रूर होऊ शकतो याचे आज आपण साक्षीदार आहोत …! त्या सनातनी कर्मठ काळात महनीय सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेणाचे गोळे खाल्ले आणि आज पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी "मलाला युसफजई " कर्मठ जिहादी तालिबनियांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलत आहे .!
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती आणि महती सर्वश्रुत आहे . त्या काळात बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा
व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.त्यांच्या पुढ्यात समजाने सती किंवा केशवपन हे दोन मार्ग ठेवले होते .! जीवंतपणी मरणयातनाना रोज सामारे जात जगणे नाहीतर कुणाच्या तरी भोगाचे बळी ठरुण गरोदर रहाणे
मग आत्महत्या नाहीतर भ्रूणहत्या .... ! समाजाच्या या क्रुरतेला ब पडलेल्या बाळींना या माउलीने पदरात घेतले त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.
फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत.
गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप
घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे
सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली हे सर्व सनातनी कर्मठ समाजाच्या चालीरिती , परंपरा याच्या विरोधी जाऊन तेही स्त्रीने हे काम करणे म्हणजे डोक्यावरून पाणी ! पण हे कार्य केले नसते तर मुलींच्या शिक्षणाची मुहर्त मेढ रोवली गेली नसती .
आज आम्ही तिच्या लेकी लिहुवाचू शकतो …! तिच्यामुळे आमच्या पंखात बऴ आले …! आमच्या
विचारांना , आमच्या अस्तित्वाला अर्थ आला आहे. " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय , मी सडून होतो , पडून होतो , कुढून होतो …! नाहीतर माझे आयुष्य एक पोतेरे झाले असते .! आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय …!! ही जाणीव या माय ने आमच्यात जागवली !! तिचे आम्ही ऋण कधीच फेडू शकणार नाही .!
आजही सवित्रीच्या आत्म्याची नितांत गरज आहे .! आजही आम्ही नागवले जातो , पुरुषी मानसिकतेपुढे नमवले जातो …! आजही आम्हाला प्रश्नांची उत्तरे मागताना संघर्ष करवाच लागतो …!
तुला आमच्यातले विझलेले निखारे नकोत , हुंदके नकोत आसवांचे झरे नकोत , तुला हवेत आमच्यातल्या पेटत्या मशाली , आन्यायाच्या छाताडावर नाचना-या वीरांगनी …!! तुझ्या प्रेरणेने आम्ही उभ्या राहु , आमच्या छाटलेल्या पंखाना नवे बळ मिळवत राहु ....!हीच आमची ज्ञानाई माउलीतुला श्रद्धांजलि …!!
"समिधा"