माझा आनंदाचा ठेवा …!


     खुप महिन्यांपासून मी ऑफिसच्या वाटेवर असलेल्या त्या फुटपाथ वरुन जात येत आहे  . फुटपाथवर चने शेंगदाने वाला,  फळवाला , पेपरवाला ते अगदी चप्पल दुरुस्त करणारा यांची रोजचीच जागा ठरलेली होती  ! कधीतरी मी वर्तमानपत्र विकत घेत असे तर कधी शेंगदाणे , फळ तर कधी माझी तुटलेली सैंडल शिवून घेतली आहे ! पण एक दिवस सकाळी तिथून जाताना  त्यांच्याच रांगेत फुटपाथ लगत असलेल्या ग्रील बसवलेल्या कठड्यावर आता  एक मोठा अल्युमिनियमचा पेटारा ठेवलेला दिसला ! पण त्याच्या आसपास कुणीही बसलेले अथवा उभे नव्हते   माझे कुतुहल चाळवले ,  मी मुद्दाम त्याच्या जवळून गेले , पेटारा मोठ्या दोरानी गच्च बांधून व्यवस्थित ठेवला होता  . आणि त्यावर एक कागद चिटकवला होता  . त्यावर मराठीत लिहिले होते , येथे जुनी नवी पुस्तके विकत मिळतील तसेच अल्प डिपॉज़िट मध्ये पुस्तके घरी वाचण्यासाठीही मिळतील . वां  !!! मनातल्या मनात मी माझा आनंद व्यक्त केला ! मी इकडे तिकडे पाहिले पण कोणीच त्या पेटा-याचा मालक दिसला नाही  मी जवळच्या मोचिला  विचारले इसका मालिक किधर है  ? त्याने नुस्तीच नकारार्थी मान हलवली , मलाही ऑफिसला जायला उशीर होत होता , मी तो नाद सोडून ऑफिसला निघून आले  . 

     संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्याच फुटपाथवरून जात असतांना सहज नजर पुढे गेली , तर तो पेटारा आता उघडलेला दिसत  होता आणि ग्रिलवर पुस्तकेच पुस्तके मांडलेली दिसत होती  .  माझी चाल नकळत वेगात आली आणि तिथे पोहचले, एक व्यक्ति ( पेटा-याचा मालक ) त्या ग्रिलवरील पुस्तके व्यवस्थित लावत होता। . भराभर डोळ्यात भरतील अशी पुस्तकांवर नजर फिरवली ,घड्याळात पाहिले गाडीला काही मिनिटेच उरली होती , थांबून पुस्तके चाळण्याचा मोह आवरला उद्या ऑफिस मधून जरा लवकर निघावे ऐसा विचार करून गाड़ी पकडायला धावले  .  जुनी , जुन्या लेखकांची प्रथम आवृतीतील पुस्तके मिळण्याचे हमखास ठिकाणम्हणजे फुटपाथ , असे मी अनेक मोठ्या लेखकांच्या लेखनातून वाचलेले होते , त्यामुळे मलाही एक दिवस हा खजिना मिळेल अशी आशा पल्लवित झाली .  तो विक्रेता संध्याकाळीच उन्हें उतरल्यावर आपले पुस्तकांचे दुकान इथे थाटत असे त्यामुळे मला गाड़ी पकडण्याच्या घाइगड़बड़ित मनसोक्त पुस्तके पाहताच येत नव्हती  . 

     दुस-या दिवशी ऑफिस मधून लवकर निघणे झालेच नाही।   आठवडा असाच निघून गेला , एक दिवस अगदी ठरवून लवकर निघाले , पण तो पुस्तक विक्रेता तिथे नव्हताच फ़क्त तो पिटारा त्या दिवसा सारखाच दोरान  गच्च बांधलेला  . हिरमुसुन गेले मी , पण पुढे दोन तीन दिवस असेच गेले  . मात्र त्या दिवशी तो पिटारा ही होता आणि तो  विक्रेता ही आज नेहमीची गाडी घालविण्याचे ठरवून त्या पुस्तकांजवळ थांबले , पुस्तके मनसोक्त पहिली, थोड़ी थोडक्यात वाचून  नजर फिरवली , पण एकहि घ्यावेसे असे पुस्तक मात्र वाटले नाही  . 

    त्यानंतर मी फ़क्त येता  जाताच त्या पुस्तकांवर नजर फिरवित असे , आणि पुस्तक विक्रेता आशेने माझ्याकडे पाहत असे।   पण एक दिवस मात्र थांबून त्याला विचारले जुनी चरित्र, काव्यसंग्रह नाहीत का  ? हो आहेत ना उद्या मी आणून ठेवतो , मी पण खुश झाले  . दुस-या दिवशी थोड़ी लवकर निघाले पण मला काही त्याने आणलेले पुस्तक पटले नाही  .  पुन्हा दोन तीन आठवडे असेच गेले . त्या पुस्तक विक्रेत्यानेही माझ्याकडे आशेने पहायचे सोडून दिले. 
                                                              V.H.Kulkarni 2
                                                              प्रा. वि. ह. कुळकर्णी   
     पण एक दिवस मात्र माझी मीच तिथे थबकले , एका पुस्तकावर माझी नजर गेली।  ते चरित्र होते, मधल्या काळातील, जुने वाटत होते , पुस्तक हातात घेऊन थोड़े चाऴले , पुस्तकाचे नाव होते "अच्युत बळवंत कोल्हटकर , चरित्र आणि वाङमय" आणि लेखक होते वि  . ह  . कुळकर्णी पुस्तक तसे जुने असले तरी चांगल्या स्थितीत होते , मुळातच मला चरित्र, आत्मचरित्र वाचायला खुप आवडतात, त्यामुळे अच्युत बलवंत कोल्हटकर यांच्या बद्दल मी  यापूर्वी कधीच वाचले किंवा ऐकलेही नव्हते पण तरीही त्यांचे चरित्र थोड़े चाळल्यावर आपल्याला ते नक्की आवडेल म्हणून ते मी  घेतले।   लेखक वि. ह. कुळकर्णी यांचेबद्दलही मला विशेष माहिती नव्हती पण त्यांचे नाव ऐकून होते  . पुस्तक विक्रेत्याने १०० रु. सांगितले मी  घासघिस करून व एक  "वसंतवीणा " हा  अतिशय जुना  काव्यसंग्रह रु. १० /- स घेऊन ते चरित्र रु. ६० /- घेऊनएकूण  ७०/ रुपयात   सौदा करून ते पुस्तक घरी आणले   .

     घरी येताच नेहमी प्रमाणे पुस्तकाची कितवी आवृत्ति पासून पाहायला सुरुवात केली ती पुस्तकाची १९७९ ची प्रथम आवृत्ति होती आणि सर्वात महत्वाचे आणि माझ्यासाठी सुखद  आश्चर्यकारक धक्का म्हणजे त्यावर या पुस्तकाचे लेखक  उत्तम ज्येष्ठ समीक्षक, लेखक प्रा. वि. ह. कुळकर्णी   (१४ एप्रिल १९०२ – ९ डिसेंबर १९८२) यांची स्वाक्षरी होती   . त्या प्रतिवर " श्री बापूराव नाईक  यांस  स्नेहपूर्वक भेट " असे  स्वहस्ताक्षरात लिहून त्या खाली त्यानी स्वाक्षरी केली होती ,  व दिनांक होती २९ नोव्हेंबर , ८०  .  त्यांच्या ओरिजिनल स्वाक्षरीची ही आवृत्ति माझ्यासाठी अमूल्य आहे  !   थोरा मोठ्यांची स्वाक्षरी आम्हा पुस्तक वेडयांसाठी अमूल्य ठेवा असतो  . प्रख्यात बॉलीवुड सीने नट नटयांचे ऑटोग्राफ मिळाल्यावर जेव्हढा आनंद आजच्या कॉलेज तरुण  तरुणींना होतो अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्हा साहित्य प्रेमींना होतो ! आमच्या साठी  तो खजिना असतो आनंदाचा ठेवा असतो   तेंव्हा मनातून उगीचच स्वतःला आम्ही  विशेष भासतो  !     
       

  
   
      वेब नेट मुळे सारेच जग अगदी आपल्या कवेत आले आहे त्यामुळे  फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क मुळे चांगले लेखक , कवी आपल्या संपर्कात येतात तेंव्हा त्यांच्याबद्दलचा आदर प्रत्यक्ष भेटीपेक्षा इथे अधिक वाढतो कारण एवढे थोर , श्रेष्ठ असूनही समान्य वाचक साहित्य प्रेमींशी ते थेट संपर्क ठेवतात. यात त्यांचा व्यावसायिक स्वार्थ असेल नसेल पण तरीही त्यांची आपल्या भिंतीवरची दखलही अशीच त्यांच्या औटोग्राफ मिळाल्यावार होणा-या आनंदासारखी असते   .!! आणि तो आमच्या भींतीवरचा "मास्टरपीस " असतो !



                                 
                                                                                                             "समिधा "


     







     

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......