"आपल्यातला चंद्र....!"


प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: एक किंवा अधिक लोक, संधिप्रकाश आणि महासागर


      आपलं मन ...अनेक त-हेच्या विचारांनी भरुन असतं...! सद्यपरिस्थीतीचा विचार केला की वाटते आज प्रत्येकजण आपल्या मनमस्तिश्काचा दरवाजा बंद करून बाहेरील विचार भिंतींवर वाटा शोधण्यासाठी डोके आपटीत आहेत.
आपल्या प्रत्येकाला सुख समाधान शांतीचा चंद्र हवा असतो आणि आपण सर्व तर पाण्यात पडलेल्या चंद्रबींबाकडे धावत आहोत आणि तो चंद्रबींब ज्या पाण्यात आहे त्या पाण्याच्या मोहात अडकून त्यामध्ये अविचाराने बुडत आहोत ....पण ते पाणी जेव्हा संपूर्ण वाहून जाईल तेव्हा तो चंद्रबींब तिथे असेल ...?अर्थातच नसेल...!आणि तेव्हा आपले लक्ष वर आकाशाकडे जाईल तिथे ख-या चंद्राचे दर्शन होईल .
 
      अगदी तसंच बाहेरील विचार आचारांमधील संक्रमणात स्वत:ला भिरकावून देण्यापुर्वी आपल्या आतल्या अंतरमनातील अनुभूतीला एकदा पहा!
 
      आपण जे , ज्यांना वाचतो ,पहातो , ऐकतो हे सारं काय आहे...?ही सारी बोटं आहेत....!ज्यांना धरून आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गांनी चालत असतो आणि ती बोटं धरून चालतच रहातो..! आपण ती बोटं तर सोडत नाहीच उलट आपण त्या बोटांनाच पुजायला लागतो....त्यांचेच उत्सव करायला लागतो!
 
खरं तर त्या बोटांना मागे सोडून , त्या बोटांत बोटं न अडकवता आपल्या आंतरीक अनुभूतीच्या शक्तीला सोबत घेऊन जीवनानूभवाला पहायचे , ती आपल्याला खरा प्रकाश दाखवते , खरे ,ज्ञान देते...!
ज्या दिवशी मोहमयी पाण्यातला चंद्रबींब मिटून जाईल , अशाश्वत बोटांची साथ सुटून जाईल तेव्हाच अंतरातला अनुभव चंद्र आणि आंतरीक शक्तीची शाश्वत साथ सोबत असेल ! ही सोबत प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना!
 
© पुष्पांजली कर्वे

*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !

 प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: 1 व्‍यक्ती, मजकूर आणि जवळून

..
आत्मचरित्र - आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी - अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवाद - अर्चना मिरजकर 
 
 
*अर्धीमुर्धी कहाणी....* एक विलक्षण जीवनप्रवास !
 
       अर्धीमुर्धी कहाणी म्हणजे इंदिरा गोस्वामी या भारतीय ज्ञानपीठ विजेत्या आसामी लेखिका यांच्या जीवनाचा हा अर्धैमुर्धा परिचय आहे! त्यांचे आत्मचरित्र तीन भागात प्रकाशीत झाले आहे.
आधालेखा दस्तावेज या आसामी आत्मचरित्राचा हा मराठी अनुवाद केला आहे आणि हा अनुवाद मराठी लेखिका अर्चना मिरजकर यांनी केला आहे!
सुविद्य प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या या मराठी अनुवादीत पुस्तकाचे मुखपृष्ठ शिरीष यांनी तयार केले आहे. 24 जानेवारी 2003 मध्ये ह्या पुस्तकाची पहिली आवृती प्रकाशीत झाली आहे!
मला स्वत:ला साहित्यातील आत्मचरित्र हा साहित्य प्रकार विशेष आवडतो! कारण प्रभावी व्यक्तिंच्या व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचून आपल्यातील न्युनता, कमतरता असल्यास त्यांच्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून एका अनोख्या उर्जेचे प्रेरीत होऊन पहाता येते!
आपल्यातील सृजनात्मक , आयुष्याकडील प्रोत्साहनात्मक खरा शोध आपल्याही नकळत सुरू होतो....!
अर्धीमुर्धी कहाणी या आत्मचरित्रातील इंदिरा गोस्वामी यांच्या आयुष्यातील अनेक घटनाक्रमांनी चकीत व्हायला होते, त्यांच्या कोलमडलेल्या मनस्थितीला समजून घेताना आपणही स्वत:ला त्या परिस्थीतीत मांडून पहातो... आणि वाटतं आपण कदाचीत संपूर्ण संपलो असतो... पण तरिही त्यांच्या आयुष्यातील जिद्द पाहून पुन्हा उभं राहाता येतं यावर विश्वास ठेवायला लागतो! 
 
या आत्मचरित्राताच्या सुरूवातीच्या मनोगतात लेखिका इंदिरा गोस्वामी यांनी हेआत्मचरित्र लिहावे यासाठी पहिली प्रेरणा देणारे आसामी लेखक होने बार्गोहाईन यांचं त्यांना एक पत्र आलं त्यातील हा मजकूर उदृ्धत केलाय त्यामधूनच या आत्मचरित्रातील घटना खुप प्रभावी असाव्यात याचा अंदाज येतो!
"* एखादा सामान्य पुरूष किंवा स्री दु:ख आणि वेदनेपुढे हार मानेल आणि मृतवत आयुष्य जगेल - पण तुझं दैव तसं नाही - कारण तू जन्मजात कलावंत आहेस आणि तुझी सर्जनशीलता हाच तुझ्या चिंतेवर, दु:खावर आणि अंशत: मृत्यूवर उपाय आहे!  *"म्हणजे (कलावंताची ) सर्जनशीलता माणसाला चैतन्य देते याचं हे आत्मचरित्र एक उत्तम उदाहरण आहे! तसं पहाता आसामी साहित्य विश्वात या आत्मचरित्राचं अतिशय निरूत्सहाने स्वागत झाले. कारण एका तरूण मुलीने लेखिकेने मग तिचे आयुष्य कितीही खळबळजनक असो तरी आत्मचरित्र लिहावं यावर त्यांनी टिका केली. 1986 मध्ये आसोमबानो या नावाने या आत्मचरित्राचा पहिला भाग आसामी भाषेत प्रकाशीत झाला. विशेष म्हणजे या आत्मचरित्राला "अमृता प्रितम " या पंजाबी सिद्धहस्त सुप्रसिद्ध लेखिका यांची प्रस्तावना लाभणं म्हणजे एखाद्या ज्वलंत आयुष्यातील निखा-यांना हाताळताना त्या त्या निखा-यांची तीव्रता केवळ अमृता प्रितम यांच्याशिवाय कुणाला जाणवावी... असा हा योग जुळून आला आहे! 
 
        जीवन म्हणजे सौदा नाही... या प्रकरणानं आत्मचरित्राची सुरूवात होते! किशोरवयीन असताना आसामच्या एका प्रसिद्ध ज्योतिषाने लेखिकेच्या आईला सांगितलं होतं "या मुलीचे ग्रह इतके वाईट आहेत की तिचे दोन तुकडे करून तिला ब्रम्हपुत्रेत टाकून दिलंत तर बरं होईल...!
आपल्या आजोबांच्या जहागिरीवर हत्तींबरोबर खेळणा-या या आसामी सौंदर्यवतीचं शिक्षण आसामचे शिक्षणअधिकारी असलेल्या तिच्या वडीलांच्या देखरेखीखाली शिलॉमगच्या पाईन माऊंट आणि गुहावटीच्या शाळेत झालं! पण बालपणापासूनच जणू तिच्यावर मृत्यूची सावली होती..!
वडीलांच्या प्रतिष्ठेमुळेच व तिच्या अंगभूत आकर्षणमुळे तिला रोज स्थळे सांगून येत पण त्यांच्या अकाली निधनामुळे ती स्थळं येणं बंदच झाले! आईची चिंता पाहून तिच्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, आणि तिने तो एक असफल प्रयत्न केलाही! एका प्रतिष्ठित घरातील सुंदर तरूण मुलीनं असं कृत्य करणं म्हणजे तीच्याकडून काहीतरी प्रमाद घडला असावा, लग्नाआधीच तिला दिवस गेले होते का? अशा शंका घेणं म्हणजे एखाद्या पवित्र कुमारिकेसाठी अग्निदिव्यापेक्षा भयंकर आपत्ती, समाजाच्या नरकरूपी ज्वाला! मग तिच्याच लक्षात आले जगायचं असेल तर प्रत्येक आपत्तीचा सामना करावाच लागेल! आणि तिने तो केला! याच मनस्थितीत तिनं चोरून लग्न केलं पण ते नांदायला न जाताच संपलं....! त्यावेळीही तिच्या मनस्थितीचा परिस्थितीचा तिनं केलेला सामना वर्णनातीत आहे! इथपर्यंतचा त्यांचा प्रवास वाचून सर्वच पुढचे सर्वच असंभव वाटत राहते! 

     तिचे पुन्हा लग्न जुळावे म्हणून आईने त्या बगळा देवीला बोकडाचा बळी द्यायला सांगितले, देवीला काळ्या बोकडाचा बळी देऊन त्याच्या रक्ताचा टिळा इंदिेरेच्या कपाळावर लावण्यास भटजीने सांगितले, तो गरम रक्ताचा टिळा त्यानंतर इंदिरेच्या कपाळावर त्याची उष्ण बोचरी जाणीव अनेक दिवस होत राहणं म्हणजे एका मृत्यूचा थंडपणा भोगण्यासारखे होते!त्यानंतर योग्य कालावधीनंतर एक दक्षिणी मधू नावाचा इंजिनीयर त्यांच्या आयुष्यात येतो... त्यांचे रितसर लग्न होते,त्याच्या सहवासातील आनंदात घालवलेल्या दिवसांच्या वर्णनात गुजरात आणि काश्मिरच्या अप्रतिम सौंदर्याबद्दल लिहलं आहे!मधू त्यांचे पती यांचा सहवास फक्त दोन वर्षे लाभला...!
त्याच्या मृत्यूच्या वेळचं त्यांच त्यांना भेटणं..." मधू गेले, मी किंचाळले, मला अनेक शतकांचा काळ उलटून गेल्यासारखं वाटलं....आयुष्याची मुळं उखडली गेली होती...! माझ्या पायखालची विश्वासाची जमीन अचानक सरकली होती...! 
 
       मधूच्या अस्थी त्यांनी कायम त्यांच्या जवळ ठेवल्या ...अस्थिंचा रंग बदलला नाही फक्त पेट्या बदलल्या!
हे वर्णन वाचताना नकळत डोळे पाणावतात!
त्यानंतर त्यांनी वृंदावनात जाऊन तिथे घालवलेल्या दिवसांचं यथार्थ वर्णन करताना त्यांनी तिथे राधेश्यामी म्हणून विधवा जख्ख वृद्ध स्रीयांना सोडून दिलेलं असं त्यांची जीवनपद्धतीचं वर्णन म्हणजे स्रियांना समाजापासून कसं दूर वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीसाठी येत असत पण अत्यंत एकाकी आयुष्य जगत होत्या! हे वर्णन प्रत्यक्ष वाचल्याशिवाय या राधेश्यामींच्या आयुष्याचे ध्येय म्हणजे केवळ प्रियकर पिता सखा म्हणून श्रीकृष्णाला वाहिलेले आयुष्य होते! इथे राधेश्याीमच्या ठायी पौराणीक श्रीकृष्णाचे अस्तित्व होते... पण ऐतिहासिक पराक्रमी श्रीकृष्ण खरा होता असं लेखिका म्हणते तेव्हा ती किती वास्तववादी जीवनाचा स्वीकार करणारी होती याची झलक पाहायला मिळते?
याच राधेश्यामींच्या वृंदावनातील जगण्याचं दारूण दर्शन या आत्मचरित्रात त्या घडवतात तेव्हा जगणं इतकंही भयानक नसावं अशी आपलीही भावना होते!
पुढे आपल्याला त्यांचा विद्वतापुर्णतेमुळे त्यांनी केलेला रामायणाचा अभ्यास यात वाचायला मिळतो... !
रामायण ग्रंथातील सिता या व्यक्तीरेखेचा त्यांनी केलेला अभ्यास खचितच आपल्या विचारतील सर्व अध्यात्मिक परिमाणं बदलून टाकते . !
 
     आपली संकुचित विचारक्षमता आणि दृष्टीकोन व्यक्त करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या व्यक्तींनी आणि समाजांनी या अद्वितीय व्यक्तिरेखेचा कसा सोयिस्करपणे उपयोग करून घेतला आहे ते लेखिका सहज लक्षात आणून देतात...!
यात त्यांनी फिरदौसी या पर्शियन कवीच्या ओळी सांगतात..
" उस के मरने पर होंठ वह बात कह नहीं सकते
उसका बताना तू होता हैं, जब वह जल जाती है
कहने को स्री है, लेकीन बडे बडे बहाद्दरोंसे बढकर है!
सिताजीके के शरीर को किसीने वस्रहीन नहीं देखा
जैसे आत्मा शरीर के अंदर रहती है,
परंतू आत्माको किसीने नही देखा! 
 
      प्रस्तावनेच्या शेवटी अमृता प्रितम यांनी एक कथा सांगितली आहे, ती कथा वाचल्यानंतर ही कथा ज्या लेखिकेने लिहीली आहे तिचा समाजव्यवस्थेवरील अभ्यास आणि जातीव्यवस्थेचा तिने केलेला सर्वांगीण विचार किती अद्भूत अद्वितीय आहे याचा प्रत्यय येतो....! त्या दिर्घकथेची लेखिका अर्थातच इंदिरा गोस्वामी आहेत! एका विधवा ब्राम्हण युवतीने अगदी गरज म्हणून एका बटीकेचे कर्म स्वीकारले तरी तिने तिच्या जातीपेक्षा हलक्या जातीच्या व्यक्तीने लग्नाची मागणी घातली असूनही तिनं त्याला नाकारलं....!
नकाराचं कारण सांगताना ती म्हणते *" शरीरविक्रय करावा लागला तरी अर्थार्जन करणं माझं कर्तव्य आहे. मी नीच जातीच्या पुरूषाची शय्यासोबत करू शकते पण त्याला पुत्र देण्यासाठी मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही!*
जातीव्यवस्थेची इतकी प्रभावी आणी प्रखर परिस्थिती मांडणा-या ह्या सशक्त लेखिकेचे मामोनी रायसम गोस्वामी यांचे हे भानक्षुब्घ अनुभव व कारूण्य यांनी भरलेलं आणि भारलेलं आत्मचरित्र आहे!
अवघ्या सत्तावीस वर्षाच्या जीवनानुभवात जीवनाच्या अनेक पैलूंना आंतरीक संवेदनांनी स्पर्श करणारी अशी ही अर्धीमुर्धी कहाणी! ❤
🌹
© पुष्पांजली कर्वे ✍️
साहित्य प्रकार - आत्मचरित्र ( आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी)
आत्मचरित्राचे नाव- अर्धीमुर्धी कहाणी
मराठी अनुवादीका- अर्चना मिरजकर
प्रकाशन संस्था- सुविद्य प्रकाशन
प्रकाशन साल - 2003
मुळ आसामी आसोमबानो आवृती प्रकाशन साल- 1986

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......