नको देवराया अंत असा पाहू .... !!!

very old indian couple in sadness के लिए चित्र परिणाम

      आज ऑफिस मध्ये निवृत्त झालेल्या एक सफाईकामगार रुक्मिणी मावशी आल्या होत्या, माझ्या टेबल जवळ येऊन उभ्या राहिल्या , मी कामात होते त्यामुळे माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते , पण मला जाणवले कुणीतरी माझ्या टेबल जवळ उभे आहे, मी मान वर केली तर रुक्मिणी मावशी ... ! मी हसून विचारले काय मावशी कश्या आहात ? झाले ना सर्व पेन्शनची , ग्रॅज्युइटीची कामं .... हो गं लेकी  तुज्यामुळं सगळं यवस्थित मिळालं पैसं ... ! मलाही ऐकून बरे वाटले , आता या वयात त्यांना जास्त फे-या माराव्या लागू नयेत म्हणून खूप कमी दिवसात कागदोपत्री सा-या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांची पेंशन चालू केली होती . ऑफीसचा लंच टाइम झालाच होता , मावशी जेवणार नां आमच्या सोबत , चला जुन्या आठवणी जरा ताज्या करू ... मावशींना माझ्या सोबत घेऊन मैत्रिणींच्या टेबलाकडे निघाली तर मावशी थबकल्या , म्हणाल्या नको मॅडम , तुमी जावा , तुमी येवतर  मी हतच बसते ...! मला वाटले मावशी उगीचच  इकडे आलेल्या नाहीत . 

     रुक्मिणी मावशी रिटायर्ड होऊन दोन वर्षांनी आज ऑफिसला आल्या होत्या .... का बरं आल्या असतील...?  मी लंच आटपून आले तोवर मावशी माझ्या टेबलपाशी बसल्या होत्या,  मावशी चहा मागवते थांबा ... नका नका मॅडम सुरेशनी आताच दिला , सुरेश आमच्या ऑफिसचा प्रेमळ पिऊन , मग मीही हसले , हं बोला मावशी सगळं ठीक आहे नं ...? मालक कसा आहे तुमचां ....?  रुक्मिणी मावशींनी डोळ्याला पदर लावलां .... न्हाही वो ,मालक माजा मागल्या वर्षीच आजारानं गेला .... ! अरे बापरे ... काय सांगता मावशी ..? मी . हो नं ... त्याच्या जागंवर मोठया लेकाला लावलाय ,  तुम्हाला दोन मुलगे आणि एक मुलगी नां ? मी मध्येच विचारले . हो  लहान्याला माज्या  जागंवर लावलाया आणि लेकीचं लगींन आगुदरच झालया !  आता मी तिच्याकडंच असतुया ...! का तिच्याकडे का रहाता ? इथं असतानाच तुम्ही नवं  घर बांधलं होतं नां ? हो पन तिथं थोरला ल्योक आनि त्याची बायकापोरं राहत्यात आनि धाकालाबी येगळीकडं ऱ्हातोया .  पण मग तुम्ही का नाही राहत तिथे ? मी .  माजं त्यांच्या बायकांशी पटत न्हाय म्हून पोरांनी बायेर काढल्यान मला . , बापाची पेंशन थोरला घेतोया आनि माजी पेंशनितलं पाच हजार लेकिला देती , तिला कशाला ...? तिच्याकडं  राहती नव्हं मी ...!अर्ध्या पेंशनीत भागवते   हे ऐकून माझ्या काळजाला पीळ बसला ....! आयुष्यभर ज्या माउलींनी पोरांसाठी घाणी घुणीत कामं केली , स्वतःची काही हौस केली नाही ती माउली आज तीन मुलं असून बेघर आणि अशी लाचार होऊन जगते आहे ....! मुलांच्या सा-या हौशी , शिक्षण आणि लग्न करून दिली त्याचा मोबदला काय तर हे असे बेघर आयुष्य ...?
स्वतःच्या कष्टाचंही तिला खायला देत नव्हते ... एक भार म्हणून तिला तिच्याच पैशाने पोसत होते. लेकीनं तरी पैसे घेऊन तिला आसरा दिला ती कमावती नव्हती पण मुलांनी असं वागावं...? मी हे सारं ऐकून सुन्न झाले होते  ...! माझ्याकडून काही मदत पाहिजे का  मावशी  ..... ? मी विचारले !  पोरी मला कुटं काम मिळल का। ..?  काम   ...? मी  प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहीले  .  काम म्हंजी  धूनी भांडी कचरा लादी काय पन करीन  .....!  मावशीकडे  मला पहावत नव्हते  ...!  हाडाची काड करून पोरांना वाढवलं आणि आज एवढे कष्टांनंतरही तिच्या वाटयाला कष्टच  होते ...!!

          आमच्या शेजारी एक वयोवृद्ध जोडपे रहाते  ! दोघेही पेंशनर  ...!  मूली लग्न होऊन  सासरी गेल्या आणि मुलगा सून  नोकरी निमित्त बाहेर  गावी  ...!  मूली जावई तरी अधूनमधून आईवडिलांना भेटायला विचापूस करायला येतात , राहतात पण मुलाने जणू त्यांचे श्राद्धच घातल्या सारखे नाव गांव टाकले आहे  ...!  ह्या आईवडिलांना आर्थिक गरज नाही पण एकुलता एक मुलगा पण  त्याच्या भावनिक आधाराची त्यांना गरज असतांना मात्र तो मुलगा कुठेच नाही  ...!  इकडून आईवडिलांनी फ़ोन केला तर उचलत सुद्धा नाही   ...! अश्यावेळी ह्या आईवडिलांच्या मनाची अवस्था काय होत असेल...?  आज आहेत तर उदया   नाहीत अश्या अवस्थेत डोळ्यामध्ये सतत मुलाला  पाहण्याची आस दाटुन असते  ....! त्यांच्याकडे पाहिले की डोळ्यांच्या जागी अश्रुंचा समुद्र दिसतो  .... भरतीला आलेला  ..... पण  ओसंडून वहायला  त्यांच्याकडे किनाराच नाही....!!


           मी  आजूबाजूला असेही  वयोवृद्ध पाहिलेत की मुंबईची घरे वन रूम किचन अथवा टू रूम किचन  मग त्या वाढत्या पीढ़ी मध्ये सर्वात वयो वृद्ध माणसांची अडचण होउ लागते  ...!  एक सम्पूर्ण रूम त्यानी अडवल्या सारखीच  ..... मग त्यांची रवानगी बिनदिक्कत चांगल्या सेवेच्या नावाखाली वृद्धाश्रमात केली जाते  .....!!


         असे  हे दुःख  आणि अशी ही माणसे पाहिली की वाटते हीच माणसे कधी काळी  डेरेदार वृक्ष होती   ...!   कष्टाने आपल्या लहान वेली फुलांना जपले मोठे केले सावली दिली   ...!  आज  त्यांना सावलीची आधाराची गरज पण ती  उघडयावर पडली होतीं   ....!! मृत्यु येत नाही म्हणून जगत राहायचे आणि हताश होता होता पुनः पुनः स्वतःला सावरायचे  हा जीवनाचा खेळ त्यांनाही नकोसा असतो   .....! आम्हाला हे आयुष्याचे दान नको  ... मृत्यु आला तर बरे असे  डोळ्यातले आधीच सुकलेले पाणी ओघळत कोरडे निश्वास सोडत नको देवराया अंत असा पाहू  .... असे विधात्याला विनवत असतात  ....!!  आणि हेच हात आपण त्यांना नमस्कार करायला वाकल्यावर   "शतायुषी"   हो  असा आशीर्वाद देताना   थरथरत  असतील का    ....?   त्यांचे मला ठावूक नाही पण असा आशीर्वाद मला कुणी दिला तर माझे मन मात्र  थरथरते   ....!!



                                                                                                                 *** समिधा 


        


         




लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......