(माझे सासरचे गोव्याचे घर)
आपली मनं जिवंत सजीव असतील तर निर्जीवतेतही चैतन्य येते …!! निर्जीव वस्तुत आपल्या भावना गुंतने म्हणजे काय याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असेलच !
मध्ये एका स्रीचा अनुभव वाचनात आला होता. जुने घर विकून ती नवीन घरात रहायला जाण्याचा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय पक्का झाला होता ! त्याच आनंदात ती नवीन घर कसे सजवायचे त्याला रंग कोणता द्यायचा फर्नीचर कसे घ्यायचे ? अनेक गोष्टींचा विचार सतत तिच्या मनात असायचा ! कुठे बाजारात गेली तरी नविन घरी आपण हे घ्यायचे का ते घ्यायचे का स्वतशीच तिची सल्ले घेणे देणे चालू असायचे , कुणा मैत्रीणीकडे गेली तरी तिच्या न घेतलेल्या नवीन घराबद्दलच बोलत रहायची। ..! जुन्या राहत्या घराला ती जणू विसरुनच गेली होती ....!
एक दिवस तिची एक मैत्रीण खुप दिवसांनी तिच्या घरी आली . तिने घरात प्रवेश करताच म्हणाली "काय ग काय हा अवतार केला आहेस ...?" हिने लगेच आपल्या केसांवरुन हात फिरवत साडी वगैरे नीट केली . तर मैत्रीण हसून म्हणाली " अगं
तुझा नाही .... तुझ्या घराचा म्हणते मी ." ती स्री चपापलीच तिने
आपल्याच घरातून सभोवर नजर फिरवली ... घरात वर कितीतरी ठिकाणी जाळी लोंबत
होती , भिंतींचे पोपडे निघाले होते , रंग फीका पडला होता , कोप-या कोप-यात
वस्तूंचा नुसता खच मांडून ठेवला होता ! आज ना उद्या हे घर बदलायचेच आहे या
विचाराने तीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते ! मैत्रीण निघून गेली
पण त्या स्रीच्या तिच्याच नजरेत एक लाजिरवाणी जाणीव ठेवून गेली !
तिने लगेचच रंग काम करना-याला सांगून घराला रंग काम करुन घेतले , नको त्या वस्तूंना भंगारात काढले , पडदे स्वच्छ धुउन खिडक्या दरवाज्याना लावले , घरचा एकदम काया पालट झाला जुंनेच घर पण पुन्हा एकदा जिवंत नवा श्वास घेऊन तरतरीत झाले ! तिचे तिलाच कितीतरी समाधान मिळाले ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?
माझ्या बाबांची नोकरी निमित्त बदली होत असे . पण आम्हा मुलांच्या
शिक्षणा साठी त्यांनी स्वत: प्रवास केला पण रहाते घर सोडले नाही ! पण काही
वर्षांनी आम्हाला आमचे दहा वर्षे ज्या घरात राहिलो ते घर सोडणे आवश्यक
होते ! नविन जागी, नवीन घरात , नविन माणसांत जाण्याची उत्सुकता मनात होतीच
पण त्या पेक्षा जुने घर आणि त्या भोवतीचं आमचे बालपण सारे इथेच राहणार होते ! घर आणि त्या भोवतीचं मोठ्ठ अंगण , अंगनातली झाडे आणि झाडाला बांधलेला
झोपाळा सारे कायमचे मागे पडणार होते , मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून
आली होती , आज खुप काळ पुढे आलो आहोत पण ते बालपणीचे घर मनात कायमचे घर
करुन राहिले आहे ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?
माझ्या लग्नानंतर मला माझ्या जाऊबाईनी सांगितले आमचे घर पुनर्बांधणी साठी
काढायचे ठरले तेंव्हा आमच्या आदरणीय कै . आई (सासुबाई हा शब्द त्यांच्या
साठी उच्चारणेही शक्य नाही ) त्यांनी अतिशय प्रेमाने पण निग्रहाने
मुलांना सांगितले की , " तुम्हाला घराचा बंगला करायचा करा … महाल
बांधायचा बांधा … पण या घराची एकही भींत तोडायची नाही ! या भिंतींची एक न
एक विट तुमच्या स्वर्गवासी बाबांनी घमेल्याने स्वत:च्या डोक्यावर वाहीली
आहे … !! त्यांच्या भावनेचा मुलांनी सर्वानी आदर राखूनच घर बांधले …! मग
सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?
निर्जीव वस्तुत आपल्या चैतन्यमयी भावना गुंततात तेंव्हा निर्जीव वस्तुला आपोआप जिवंत करतात !!
(टिप : सदर लेख मा. श्री अविनाश दुधे यांच्या " घर खरंच निर्जीव असते का ..?" या लेखामुळे प्रेरित आहे ! )
" समिधा "
अलीकडे निर्जीव गोष्टी सजीव होत चालल्या आहेत पण माणसे मात्र निर्जीव होत चालली आहेत
उत्तर द्याहटवाकण कण मे है भगवान!
उत्तर द्याहटवा