द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज , लेखिका : अरूंधती रॉय

May be an image of flower and text


*पुस्तक : द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ( कादंबरी लेखन काल 1969 ते 1997)*
मुळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका : अरूंधती रॉय
लेखिका प्रशिक्षित वास्तू रचनाकार, पटकथा लेखिकाही आहेत*
प्रकाशन- 1997
मराठी अनुवाद : *अपर्णा वेलणकर*

मानवी प्रेमाचे कायदेकानून तयार केले गेले तेव्हापासून ....
*या कायद्यांनीच तर ठरवलं सगळं*
*प्रेम कुणावर करावं ?.....कसं करावं ?....*
*आणि किती?*
*हे सुद्धा*

द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज मधील हे वाक्य सर्वार्थाने मानवी संबंधांच्या मुळाशी असलेल्या प्रत्येक भावनेचे पृथ्थकरण करून स्वतंत्र, भिन्न अस्तिव असलेल्या प्रत्येक मानवाच्या *मौन* संवेदनांना व्यक्त करते!

*द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज* अरूंधती रॉय ह्यांची पहिलीच साहित्यकृती आहे! 14 ऑक्टोबर 1997 ला प्रकाशीत या कादंबरीला मानाचा आंतरराष्ट्रीय *बुकर पुरस्कार* लाभला आहे!
बुकर पुरस्काराच्या मानपत्रात या साहित्यकृतीचा सन्मान करताना *स्वत:च निर्माण केलेल्या उत्तुंग अपेक्षांना आणि कसोट्यांना उतरणारी अद्वितीय साहित्यकृती* अशा शब्दात या कादंबरीचा सन्मान करताना तिची उत्तुंगता लक्षात येते!

आंतरराष्ट्रीय लेखक समिक्षक यांच्याच शब्दात सांगायचे तर * यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितली जाणार नाही.
हीच पहिली
....आणि एकमेव!

ही कथा घडते आहे केरळ मधील आयमेनेम गावात. निसर्गाने ओतप्रोत भरलेले भारलेल्या गावात एक ब्राम्हण कुटुंब पण त्यांनी धर्मांतर करून ख्रीश्नन धर्म स्वीकारला आहे! मुळातच एक उच्चभ्रू समाजातील कुटुंब !
या कुटुंबात राहेल आणि इस्था अशी दोन जुळी मुलं आहेत , आणि संपुर्ण कथानक या लहान जेमतेम सात वर्षाच्या मुलांच्या दृष्टीने, साक्षीने आपल्यासमोर येत राहते!
आणि म्हणूनच ते जास्तीत जास्त निष्पक्ष , तटस्थ आणि निष्पाप वाटते! ते कसे ते या कांदबरीतील एक एक पात्र यांच्याद्वारे आपल्याला जसजसे भेटत जाते तेव्हा आपसुक कळते!

अम्मू , ही इस्था आणि राहेलची आई, जीने स्वत:च्या मर्जीने बाबा नावाच्या एका चहाव्यापा-याशी लग्न करून आपल्या कुटूंबाचा रोश ओढवला होता, पण त्याच बाबाने तिचा विश्वासघात करून व्यापार वृद्धीसाठी तिला दुस-या व्यापा-यासोबत शय्यासोबत करण्याची जबरदस्ती केली, तेव्हा तिच्यातील बंडखोर स्री मात्र त्याला घटस्फोट देऊन आपल्या पापाजी आणि मामाजी या मातापित्याकडे परत येते
तेव्हा अर्थातच घरात एक घटस्फोटीत स्री त्यात दोन मुलांची आई असून तिनं असं पाऊल उचलणं म्हणजे समाज नियमांना तिनं डावललं आहे हा आरोप तिच्यावर होत राहतो!
अम्मू आपल्या विफल लग्नाचे फोटो पहात असतांना लेखिकेने ज्या शब्दात वर्णन केले आहे ते शब्दातीत आहे.. वर्णनात ती म्हणते
स्वत:च्या लग्नातले फोटोही अम्मूला परके अनोळखी दिसायला लागले होते, दागीन्यांच्या ओझ्यानं वाकलेली मुर्ख बावळट मुलगी, किती सजवलं होतं आपण स्वत:ला ....
*चुलीत जाळायच्या सरपणाला तेल पाजून चमकवण्याची ही व्यर्थ उठाठेव कशासाठी..?

अम्मुचं व्यक्तित्व आईपणाच्या ओझ्याखाली दबलेलं होतं खरं! ती तर मनमुक्त होती, तिला मुक्तीची स्वचछंदी ओढ होती, पण ही ओढ तिचं आताचं आईपण हे अस्तित्व उधळून टाकणारी होती पण तरिही समाज आणि रूढी परंपरांच्या खाली ते दबलेले , स्वत:च दाबलेलं अस्तित्व घेऊन ती आपल्या पापाजी ममाजी कडे आली होती !
पापाजी जे किटकशास्रज्ञ होते आणि जे पुरूष म्हणून स्वत:ला सिद्ध करतांना मामाजी आपल्या बायकोला मारहाण करीत , अपमानीत करीत! मामाजी जी स्वत:चा लोणचे आणि जैमचा व्यवसाय करून आत्मनिर्भर होती आणि सन्मानाने जगण्याची धडपड करीत होती तिचा तो आत्मसन्मान पापाजीमधील पुरूषाला मात्र अपमानाची जाणीव अधिक गडद करायचा आणि त्या कटू जाणीवेने ते तिला मारहाण करीत.
पापाजीं मेल्यानंतरही मामाजींचे त्यांच्यावर प्रेम नसतानाही शोक करणे म्हणजे एखाद्याच्या सवयीचे परिणाम , जसे की पितळेच्या फुलदाणीनं मारहाण करणं सतत अपमान करणं याचीही एक सवय मामाजीला एक सवय होऊन गेली होती. ...लेखिकेने केलेले हे वर्णन वाचल्यावर
*गुलामाला गुलामीची सवय झालेली असल्यावर मुक्त होणंही कसं जड जातं याची सल देऊन जाते!*

पण हे सारं पहाणा-या इस्था आणि राहेल यांच्या भावविश्वाला जे स्रीपुरूष संबंधाबाबत धक्के बसत होते त्याचा परिणाम त्यांच्या एकमेकांशी वागण्यातून बोलण्याच्या प्रतिक्रीयेतून बाहेर पडते होते! आणि इथेच पुरूष हा दमन करणारा असतो त्याला रोखले पाहिजे अशा भावनेने राहेल स्वत:ला घडवत गेली, आणि इस्था तिचा पहिला समवयस्क पुरूष होता!

याच कुटूंबातील बेबी कोचम्मा ही पापाजींची धाकटी बहिण जिचे एका मिशनरी पाद्री यांच्यावर एकतर्फी प्रेम होते जे विफल झाले, आणि क्यामुळे त्या दु:खात बेबी कोच्चम्मा आयुष्यभर अविवाहीत राहिली, पण आयुष्यातील हे रिकामपण ती दुस-यांच्या आनंदी, स्वच्छंदी आयुष्यात कडवटपणा पसरवून भरत राहिली...आणि त्याचे बळी अर्थात राहेल आणि इस्था आणि अम्मू होते!

चाको हा अम्मूचा मोठा भाऊ जो ऑक्सफर्ड युनिव्हरसिटीतून शिकून , मार्गारेटबरोबर लग्न करून तिकडेच स्थायिक झालेला, पण तोही आता घटस्फोट घेऊन त्याच्या सोफी मोल या मुलीला बायकोकडे सोपवून आयमेनेम परतला होता! पण तो पुरूष आणि घराण्याचा एकुलता एक वारस म्हणून त्याचे घरातून मात्र स्वागत झाले, अम्मूसारखी त्याला परकेपणाची अपराधीपणाची वागणूक दिली गेली नाही, पण तो आल्याने पापाजींचे मामाजींवर हात उचलणे मात्र बंद झाले, एकदा चाकोने मामाजीला मारण्यावरून त्यांना चांगलेच खडसावले होते, पण त्याचा परिणाम पापाजींनी मामाजींसोबतचे उरलेसुरले सर्व संबंध तोडून टाकले, अगदी श्वासांच्या अंतापर्यंत ते तिच्याशी बोलले नाहीत!

अशा हे एकत्रीत संपुर्ण वाटणारे कुटुंब पण तरिही विखुरलेले विखंडीत कुटुंब ! यातील प्रत्येकजण स्वतंत्र, भिन्न व्यक्तित्वासह जगत असला तरी वेदनेच्या, दु:खाच्या एका नाळेनं परस्परांशी जोडलेले होते!
प्रत्येकाच्या वेदनेचा, दु:खाचा गाभा वेगळा असला तरी तरी ठसठसणारे भोग सारखेच होते!
सुरूवातीला कथानक सहज स्वीकारार्ह्य वाटत जाते, कथानकात तेच घडते जे सामाजीक नितीनियमांत, रूढीपरंपराच्या अधिन आहे पण कथानक पुढे अतिशय बिभत्स वळण घेते , जेव्हा कथानकात वेलूथा या पात्राचा प्रवेश होतो, *वेलूथा* एक दलित तरूण जो कम्युनीस्ट चळवळीतील तरूण आहे, जो दलित आहे पण तरीही त्याच्या संपुर्ण स्वभावात, व्यक्तित्वात ते दलितपण दिसत नाही,तो आत्मविश्वासेने सर्व छोट्यामोठ्या समस्यांचे समाधान शोधतो आणि त्याच्या प्रेमात दोन मुलांची आई इस्था आणि राहेलची आई अम्मू प्रेमात पडते, त्याच्या अगदी जवळ येते! हे मात्र समाजाच्या रूढी परंपरा नियमांना जबरदस्त धक्का देणारे होते, तो काळ 1969 ते 1997 चा काळ ! समाजमान्य प्रेमाच्या, मानवी नातेसंबंधाच्या परिघांना भेदून जाणारी ती घटना अम्मूच्या कुटुंबाला सामाजीकदृष्ट्या उध्वस्त करणारी होती, आणि दलिक वेलूथाचा समाज नियमांच्या स्थापनेसाठी , सांप्रदायिक भेद बरकरार ठेवण्यासाठी पोलिसांकरवी खोट्या आरोपांमध्ये अडकवून ठार मारण्यात आले!
चाकोची मुलगी सोफी मोल हिच्या आकस्मित मृत्युचे कारण इस्थाला ठरवून त्याला त्याच्या वडीलांकडे बाबाकडे परत पाठवण्यात येते , सात वर्षाची जुळी भावंड या मोठ्यांच्या उलथापालथीत कुठल्याकुठे फेकली गेली! त्यांच्या भावविश्वांचा नुसता चिखल झाला होता! इस्था अम्मू राहेलपासून दुर गेला, इकडे वेलूथा प्रकरणाने अम्मूला घराबाहेर काढले आणि राहेलला दुर हॉस्टेलमध्ये पाठवले तीन आयुष्य एकमेकांपासून कायमचे दुर झाले,

31 वर्षानंतर ...31 साव्या वर्षी अम्मूच्या मृत्यूनंतर जेव्हा राहेल आयमेनेममध्ये परतली तेव्हा ती फक्त इस्थाला भेटायला आली होती, तो इस्था जो परत वर्षानंतर 31आयनेममध्ये परतला होता!

31 वर्ष..हा काळाचे वर्णन लेखिका करते..!
*बघता बघता दोघांचं वय झालं
अम्मूएवढं.
त्याच वयात मृत्यूने गाठलं होतं अम्मूला...
एकतीस वर्ष .
ना धड म्हातारपण आलेलं,
ना धड तारूण्य उरलेलं,
मधलंच राहीतरी.
कदाचीत जगणं पूर्णाशानॉ उमलेलं...
कदाचीत मृत्यू झडप घालील...
काहीही... कधीही....
असं वय.

पण आयमेनेममध्ये परतेला इस्था आता मौन होता...!

लेखिकेने त्याच्या शांततेचं मौन होण्याचे वर्णन ज्या शब्दात केले आहे ते शब्द म्हणजे मौनाच्या हुंकारांना हुंदके फुटावेत असे आहेत!
*त्याचं हे मौन विचीत्र, अवघडलेले नव्हतं ...काही नं बोलता कशाकशात नाक खुपसण्याएवढं धुर्त नव्हतं...न बोलून धुमसता आरडाओरडा करणारं आक्रस्ताळंही नव्हतं ...कुणावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता अगर कशाबद्दल मुक निषेधही नव्हता ! काहीच करू नये, कीहीच बोलू नये अशा शाररीक मानसिक निष्क्रीयेतून स्रवलेला एक प्रत्यक्ष अविष्कार...एवढाच होता इस्थाच्या मौनाचा अर्थ!
उन्हाळा रणरणू लागला की आटलेल्या तळ्यातले छोटेछोटे मासे आपलं अस्तित्व गुंडाळून निपचीत पडून राहतात , तसंच इस्थाचं मौन!

* जिभेच्या आसपास रेंगाळणा-या शब्दांच्या झुंडी त्याच्या शांततेने हुसकावून लावल्या, वाक्यांची वस्र फेडून इस्थाचं मन सोलून काढलं आणि "विचार" केले संपूर्ण नग्न ! इतके स्थिरचीत्त , की, शब्दांची मुळी काही गरजच उरू नये ! त्यानं भुतकाळ पुसून टाकला, लख्ख वर्तमानाची चूळ भरून चिळकांडी उडवावी झाल्यागेल्यावर, इतक्या सहजतेने ! त्याचं मौन सहज सवयीचं झालं!*

या कांदबरीचा शेवट दु:खांताचा कडेलोट असला तरी सुखांताची सुरूवात असावी असा आहे! अम्मू वेलूथाच्या मनोमिलनाचे सुखांत वर्णन म्हणजे कादंबरीला पुन्हा पुन्हा ह्रदयाशी कवटाळून या संपुर्ण जगण्याशी तादात्म्य पावण्याचा अद्भुत अनुभव!

अपार यातनांनी भरलेल्या बालपणातील गंमतीजमती जादुई दुनिया उभी करता करता अरूंधती रॉय यांनी भाषा आणि कल्पनाशक्तीचा अद्भुत विस्तार घडवला आहे , तोच अनुभव देणारा हा अपर्णा वेलणकर यांचा मराठी अनुभव साध्या अनलंकृत शैलितला थेट, तिक्ष्ण बोचरेपणा घायाळ करतो!
मुळात लेखिकेनेच भुतकाळ आणि वर्तमानाचे चक्र सतत फिरते ठेवून , विलक्षण प्रतिभासामर्थ्याने अतिशय गुंतागुतीचे गहन कथानक अरूंधती रॉय यांनी आपल्या कथनशैलीतून बांधले आहे!

अखेरीस द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीविषयी एवढेच म्हणता येईल की ही कहाणी आहे

*एका स्रीने स्वत:ला मुक्त करण्याची,*

*एका दलिताने स्वत:ला मनुष्य म्हणून स्वीकारण्यासाठी केलेल्या आकांक्षेचा समाजनियमांनी केलेल्या दमनाची,*

*स्रि पुरूष भेदातून जन्म घेणारा सामाजीक द्वेष आणि अपमानाचा लेखाजोखा सांगणारी!*


*समाज नितीनियम रूढीपरंपरा यांच्या पारंपारिकतेत स्वत:च्या स्वभाव प्रकृतीच्या विरूद्ध असूनही स्री-पुरूष सहजभावनेने स्वीकारत असेले *जीवन पद्धतीची*

वाचकाच्या जाणीवांना संमोहन घालणारा अनुभव , "द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जने" आपल्या विपुल शब्दसामर्थ्याने, अपरिहार्य शोकांतिकेचा अनाहत नाद अचूक गाठला आहे!
हा नाद अनुभवायचा असेल तर हा मराठी अनुवादही अतिशय सुंदर एक स्वतंत्र कलाकृती इतकाच झाला आहे याचा अनुभव वाचकांना यावा!

मराठी अनुवाद - अपर्णा वेलणकर
प्रकाशक - मेहता पब्लिशर्स
प्रथमावृत्ती- 2001
किंमत : 300/-

©® पुष्पांजली कर्वे

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......