प्रिय ....,
तू लिहिलेल्या "त्या " ओळींवरून प्रेमळ नजर फिरवली .... अलगद हात फिरवून त्यांना स्पर्श केला तेंव्हा खुप दिवसांपासूनची तुझी अक्षरं मायेच्या , प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली वाटली .... माझ्यासारखीच …!!
तू दिलेले घडयाळ जपून ठेवलय ....! त्या वेळेसारखंच जेंव्हा तू अनं मी वेळेचे भान विसरून बोलत असू …
ते शब्द आणि त्या मागील अर्थ जे तेंव्हा समजले अनं काहींचे अर्थ जे अजूनही वेगवेगळ्या संदर्भात शोधून लावत असते .... तुला पुन्हा पुन्हा नव्याने भेटत असते … पारखत असते .... शोधत असते ....!!
तू दिलेले पेन जपून ठेवलय … ! पेनातली शाई कधीच संपलीय … पण त्या शाईने तू गिरवलेले माझे नांव अजूनही तसेच ताजे … टवटवीत आहे , त्या कवितेच्या ओळी सारखेच … " गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "
तू दिलेल्या गज-याला जपून ठेवलय .... ! फुलं , पाकळ्या गळून गेलेत … पण फुलं गुंफलेली गुंफण अजुन तशीच आहे … फक्त फुलांच्या जागी तुझ्यात अडकलेल्या प्रत्येक क्षणांच्या स्मृतीं गुंफल्या आहेत …!
काळ पुढे सरकलाय पण तुझ्यासोबतचे क्षण काळासोबत माझ्याजवळच घुटमळत आहेत …! त्या क्षणांना मुक्ती मिळावी असं मलाही वाटत नाही … !! कारण जेंव्हा जेंव्हा जगण्याच्या मुळाशी ते क्षण मी शिंपडते जगणे ताजे , टवटवीत होते …!
हो मी हे सारं सारं जपून ठेवलय निर्मळ , निरागस , उत्फुल्ल जगण्यासाठी …!!
" समिधा "