तिला माझ्याशी काय खुन्नस होती कोण जाणे ? ऑफिसात आम्ही सा-याजाणी लंच टाईम मध्ये एकाच टेबलवर एकत्रच जेवायला बसायचो ! तिच्याकडे रोज एक नवा मेनू , ती स्वैपाकात सुग्रण होती , ( तर मी बा-याचदा फोडणीचा भातच टिफिनला आणायची फक्त कधी तो पिवळा कधी लाल एवढीच काय ती व्हारायटी ) तिची रोज एक नवी साडी ( माझी आठवड्यातून एक साडी दोनदा रिपीट व्हायची ), प्रत्येक सणाला तिचा नवरा तिला एकतरी नवा दागिना तिला गिफ्ट द्यायचा …! ( मी जुनेच पॉलिश करून घालायचे ) तिच्याकडे चपला , सैंडल , सपाता , शूज नुसता खच ( मी खचलेल्या तुटलेल्या चपला जुळवून शिवून वापरायची ), तिच्या नव-याचं तिच्यावर खुप प्रेम आहे असं सतत सांगायची ( माझे माझ्या नव-यावर खुप प्रेम आहे असं कधी नव-याला पण सांगितले नाही) तिला एक छान उमदा मित्र होता . ( मी नव-यातच तो शोधत होते ) तिला छान मेकअप सेन्स होता , ( माझ्या कड़े मेकअप सेन्स म्हणजे मीना पाउडरच माझ्या साठी कॉम्पेक्ट होता ) खरं तर आम्हाला तिचा हेवा वाटावा असे , ती जगत होती ....! मलाही तिचे कौतुक होते ! पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय होती … कोण जाणे …??
एक दिवस जेवणाच्या टेबलवार तिने जेवण झाल्यावर " प्लीज अटेंशन प्लीज़ म्हणत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले , मी आज एक शेर ऐकवते ! माझ्याकडे बोट दाखवून हं, तू ऐक हं this is specialy for u …! आणि तिने शेर ऐकवला ....
" अगर तुझमें है हिरेकी सिबत
तो उजालेमें चमक कें दिखा …!
अंधेरेमें तो शिशेभी चमकतें हैं …!!
माझ्यासह सर्वांनीच या शेरवर टाळ्या वाजवल्या … तिही खुश झाली …!! पण मी मात्र आतून फारच दुखावले …! मी कधी कुठे पुढे पुढे करायला जात नाही .... ! फक्त मी वाचन करते, गाणं छान गाते , सूत्रसंचालन करते , थोड़े फार लेख लिहीते , माझ्या आनंदासाठी कविता करते …! कधीतरी एखाद्या मासिकातून छापून आलेली कविता कौतुकाने मैत्रिणींना वाचून दाखवते …! या पलीकडे माझ्याकडे कौतुक करण्यासारखे काय होते …? पण तरीही तिला माझ्याशी खुन्नस काय होती कोण जाणे …?
मी खुप अस्वस्थ झाले होते . तो शेर फ़क्त माझ्यासाठी का होता ? हे मला तिला विचारावेसे वाटत होते …!
पण असे सरळ भाषेत प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या " शेर " ला " सव्वाशेर " नेच उत्तर द्यावे असे ठरविले . एका कागदावर मी त्यांच्या शेर वर प्रतिशेर लिहिला …!! शिपायाला बोलवून सांगितले , मैडम जिथे कुठे असतील तिथे त्याना हा घडीचा कागद दे …!!
थोड्याच वेळात मला उपायुक्तांच्या केबिन मध्ये बोलावल्याचा निरोप घेऊन शिपाई आला … !! बाई साहेबांकडे गेली की काय माझा कागद घेऊन ? मनात विचार करतच मी आत केबिन मध्ये गेले . साहेबांच्या समोरच ती वरिष्ठ मैडम बसली होती . आणि मघाशी मी शिपयाकडे पाठवलेला कागद उपायुक्तांच्या हातात होता .…! " हे तुम्ही लिहिले आहे ? मी चाचरतच हो म्हणाले … ! " छान लिहिले आहे ! मी खालची नजर वर केली . साहेब आणि ती छान हसत होते ! मैडम सांगत होत्या तुम्ही कविता करता ! keep it up ! आधीचा वृत्तांत मैडमनी स्पष्ट केलेला दिसत होते …!
मी त्या कागदावर लिहिले होते ....
(तिला चश्मा होता )
" तेरी आँखे हैं चश्मेबद्दूर …
पर हाय ! उसमें ना हो अगर वों नूर
जो हिरे को हिरा नहीं , शीशेकोभीं पत्थर समझें …!! "
"समिधा "