भेट............!

 pascal painting meeting romantic  girl and boy साठी इमेज परिणाम


 हेलो.........
 बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
आमचं असंच असतं..... काही वेळेवर नसतं..... तू बोल..... जेवलीस....?
हो..... आमचं मात्र सारं वेळेवर असतं....
इकडे  सुमेधा हसली..... तिकडे सौमेशही हसला.............
तू म्हणाला होतास नां भेटशील तेव्हा काहीही माग, मी तुला देईन.....!
हो.... मग.... सांग नं काय पाहिजे .....?
बघ हं .... नक्की मागू ....? खरंच नं...?
एका तपानंतर, बारा वर्षांनी आपण भेटतोय ..... माग काय हवय तुला...?
मग.... उद्या येताना तू सर्व घेऊन ये....!
काय...?
मी तुला लिहीलेली सर्व पत्रं.....!
अरे..... ती नाहीत आता माझ्याजवळ!
म्हणजे काय झाली ती....?
आता ती नाहीत......!
तू ती  फेकून दिलीस  नं....!
तसं नाही.... घराचं दोनवेळा रिन्युव्हेशन झाले त्यामध्ये कुठेतरी  हरवली ती....! म्हणजे ती गंगार्पंण झाली नं माझी पत्रं.  मला वाटलं ..... जेव्हा आपण भेटू तेव्हा तू ती पत्र आणशील आणि मग प्रत्येक पत्र आणि त्यामागील आठवण रिफ्रेश केली असती आपण....
हं
तरी मी तुला सांगत होते मला ती पत्रं परत दे...... पण तेव्हा तू  म्हणालास तू नाहीस तर निदान ती पत्रं तरी असू देत माझ्याजवळ....!
हं.....
मी तरी जपून ठेवली असती ती  तुला एक एक पत्र लिहीताना जे जे म्हणून अनुभवलं ते ते तुला सांगायचं होतं!
हं....
तुला दिलेलं शेवटचं पत्र आठवतंय......? ते पत्र लिहीतांना कित्ती कित्ती रडले होते.  काही शब्दांच्या पुंजक्यांवर माझे अश्रू ओघळले होते.
हो ... ती अक्षरं पुसट झाली होती..... मी त्या अक्षरांना भरल्या डोळ्यांनी पहात राहिलो.... त्यांच्यावर ओठ टेकून त्यांना पित राहिलो.....
इकडे सुमेधा स्तब्ध झाली...... तिच्या डोळ्यात अमाप अश्रू दाटले होते....!
हेलो...... एेकतेस नां....... त्या आठवणी   माझ्या आत आत अजूनही फ्रेश आहेत....! अरे एवढा लाईव्ह तुझ्याशी बोलतोय ..... तुझ्याजवळ अाहे.... अजून काय पाहिजे तुला.........?
हं..... हे पण बरोबर आहे..... एवढया वर्षांत सर्व बदललं अगदी आपल्या अस्तित्वांसकट सर्व  .   फक्त बदलले नाहीत ते आपले मोबाईल नंबर ...!  पण व्हट्सऐप वर  भेटलो त्याला वर्ष झाले.  आणि मग आपण एकमेकांशी फक्त सेल वर बोलू लागलो ..... तेही दोन तीन आठवड्यातून एकदाच...... कधी  पाच मिनीट  तर कधी दहा मिनीट ....!
सुमेधा आतल्या आत खुप अस्वस्थ झाली होती.... पण तरी काही  अधिक बोलू शकली नाही.
तू एक काम कर तू आण तुझ्याकडे जे काय असेल ते......
मी...?  सुमेेधाने वैतागून विचारले.... मी काय आणू...? तू कधी काही दिलंयस का मला...?
का.... काहीच दिलं नाही ? सौमेशने आश्चर्याने विचारले.
घड्याळ गजरे,चौकलेट,बद्दल नाही म्हणत मी.... दोन ओळीचं पत्र तरी दिलंयस का कधी....?
एक सांगू ..... सौमेशने अतिव प्रेमानं विचारले.....
काय...... सुमेधानं कुतूहलाने विचारले..
आपलं हे नातं आहे नं तेव्हाही आणि आताही देवाणघेवाणीच्या  फार फार पलिकडले आहे. आपण एकमेकांसाठी आजही असणं हे आपल्या नात्याचं सर्वांग सुंदर देखणं रूप आहे.
सुमेधा क्षणभर स्तब्ध झाली.  काय बोलू यावर.... तुझं हे नेहमीचच आहे.... असं काही बोलतोस....आणि मग तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
मग.... भेटतोय ना उद्या आपण .....?  सौमेशने हसून विचारले......
हं.... सुमेधाही हसली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हेलो.........
बोला.......
जेवलास.......
नाही.....अजून ...
लंच टाईम तर होऊन गेला नं.....
तुला तर माहित आहे नं आमचं हे नेहमीचंच
सुमेधा क्षणभर शांत झाली......
हेलो........ कुठे हरवलीस.......
आपलं काल भेटायचं ठरलं होतं नं..... ?
हं
पण तू स्थळ, वेळ काहीच कळवलं नाहीस
अरे फार बीझी होतो , भेटायचं होतं पण ......ठरवून कैन्सल नको करायला म्हणून कामं आटपत राहिलो...
मग कामं आटपल्यावर तरी .....
अरे कामं संपलीच नाहीत........ मग तू नाराज होशील म्हणून कळवलेच नाही.
असा कसा रे तू......!
सौमेश हसतो..... मध्येच उसासा टाकतो
काय झालं.....?
काही नाही.... तुम्ही बोला....
किती विलक्षण आहे.....
काय
कालच म्हणालास नां मी तुझ्याजवळ लाईव्ह आहे, मग बाकी कशाची गरज नाही.
हं मग आहेच नं.....
सुमेधा उदास हसते....आपण बारा वर्षांनी एकमेकांच्या संपर्कात आलो त्यालाही वर्ष होत आले  पण या तीनशे पासष्ट दिवसांतून एक दिवस, एक तास, एक मिनीट एक सेकंदही  मला प्रत्यक्षात भेटला नाहीस.
 भेटू..... नक्की भेटू..... सौमेश भावूक होऊन म्हणाला. *(त्याला सुमेधाची तगमग कळत होती पण तो स्वत:ला समजावत होता, भावनेच्या भरात भेटून नको तो गुंता पुन्हा वाढणे वाढवणे योग्य नव्हते, त्याचाही संसार होता आणि सुमेधाचा सुखी संसार हा त्याचा आता आनंद होता.   त्यांच्या नात्याचं निर्मळ पावित्र्य राखणे दोघांची जबाबदारी होती. तो पुरूष होता पण सुमेधाच्या अस्तित्वाचा अभिमान राखणे ही त्याचीही जबाबदारी होती.... त्यालाही तिची प्रचंड ओढ होती आणि  तिलाही हे तो जाणून होता.....!)
आता कळलंय मला...... !  अगदी नक्की कळलंय मला !
काय.... सौमेशने आश्चर्याने विचारले.
एकदा का प्रेम आपल्या आत उतरले की , दुरावा.... विरहं.... या जाणीवांना शब्दश: काय , पण अक्षरश: काहीच अर्थ उरत नाही. आणि सौमेश तुला हे कधीच समजले आहे.
हं  .....
म्हणूनच तू असा शांत निश्चिंत आहेस . मलाच समजायला उशीर झाला.
सुमेधा..... सौमेशने  खुप आर्ततेने तिचे नांव घेतले..... आपण एकमेकांत जीतकं खोल अथांग उतरत जाऊ नं तितके अधिकाअधिक जवळ येऊ मग आपण शरीराने कितीही दुर असलो तरी ! मग ते हे  अंतर, वेळेचं असो नाही तर स्थळाचं असो....!
खरं आहे सौमेश.... आणि तेव्हा तू माझ्या समोर असशील आणि मी तुझ्या जवळ असेन. आणि याचा अनुभव घेतला मी.  तुला कालचा अनुभव सांगितला तर  खरं नाही वाटणार .
काय .... कुठला अनुभव?
काल मी सकाळपासून तुझ्या फोनची निरोपाची खुप खुप वाट पहात होते .
मग तु तरी फोन करायचास नां
मनात म्हटले भेटायचेच आहे  तर तूच फोन करून सांगशील आणि तसेच काही नसेल तर तुला फोन करून उगीच धर्मसंकटात का टाकू..... म्हणून खुप ईच्छा असुनही नाही केला.
मग...
संध्याकाळ झाली आणि समजून गेले .  आफीसमधून स्टेशनवर आले....आणि तुझ्याच विचारात गाडीची वाट पहात उभी होते
मग....
आणि तुझा गंध.... तू माझ्या अगदी जवळून अगदी जवळून गेल्याचा भास झाला. मी त्या क्षणभरात तुला अनुभवलं.... त्याक्षणी तू माझ्या जवळ होतास....!सुमेधाच्या आवाजात कंप होता. तिनं कसातरी आवंढा गिळला ,  तुला आठवतंय हा असाच अनुभव मी बारावर्षापुर्वी घेतला होता. आणि तुला मी सांगितले त्यावेळी तू माझी खुप तीव्रतेने आठवण काढत होतास असं मला सांगीतलं होतंस.....!
आणि कालही काही वेगळं नव्हतं गं.....!  सौमेशही भावनाविवश झाला होता.
मला  खात्री आहे...
कसली......
आपण नक्की एक दिवस भेटू.............खुप वर्षांच्या घड्या आता आपल्या भेटींवर पडल्या आहेत , भेटी तरी किती ? हसते, आता आठवावी तर सारी स्थळं, आणि रस्ते हुबेहुब नजरेसमोर आली तरी... त्या रस्त्यांची नावं बदललेली आणि स्थळाैंची कळाही गेलेली असेल..... तू पुन्हा भेटू नकोस असं मी कधीत म्हणणार नाही , पण भेटण्यापुर्वी त्या रस्त्यांची नावं आणि स्थळांची कळा बदलल्या तरी चालतील पण तुझ्या चेह-यावरच्या सुरकुत्यांच्या घड्या त्या वर्षांच्या घड्यांखाली लपवू नकोस .   राजा तुला सुर्यास्ताची शपथ एकमेकांना न भेटल्याशिवाय जायचं नाही सुरकूत्यांची कुंपणं ओलांडून ह्रद्याशी ह्रद्याची चाहूल घेऊन आपण नक्की भेटायचं.... आपण नक्की भेटायचं.....................!!


@ समिधा





कवडसे......

    " कवडसे..."

     दि. 13/5/2018 वेळ संध्याकाळी सहाची आणि आम्हा पाच नवोदीत कवी कवयित्रींच्या परिक्षेचीही.....! कल्याण काव्यमंच प्रस्तुत" कवडसे" या बहारदार काव्यवाचनाच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आम्हा सर्वच सहभागी कवी मडळींची तयारी सुरू झाली होती.  

     कल्याण काव्यमंच ची स्थापनाच नवोदीत कवी कवयित्रींना त्यांच्या काव्यलेखनाला रसिकश्रोत्यांसमोर आणून त्यांना प्रोत्साहन देणे आहे.  कल्याण काव्य मंच ही जशी एक साहित्य साधनेची कार्यशाळा आहेत तशीच ती एक साहित्य चळवळही आहे.

     13 मे ची संध्याकाळ कल्याण काव्य मंच प्रस्तुत कवडसे  च्या निमीत्ताने आम्हा सहभागी सर्व कवीमंडळींसाठी अतिशय महत्वाची होती.  यात सहभागी माझ्यासह सर्वच कवी कवयित्री नवोदीत होतो, त्यामुळे प्रथमच कवडसे या कार्यक्रमामुळे रसिकप्रेक्षकांसमोर जे खास आमच्यासाठी आमच्या कवितांना एेकायला येणार होते त्यांना कवितेतून आनंद देणे ही आमची फार मोठी जबाबदारी होती. आणि जबाबदारी पेलण्याची उर्जा आम्हाला कल्याण काव्य मंच च्या  प्रत्येक सदस्याकडून मिळत होती. सुधा पालवे, अपर्णा ताई, निचीता झुंझारराव  , चित्ते सर, प्रशांत वैद्य सर यांच्या उपस्थितीने ती कार्यक्रमाच्या दिवशीही आमच्या सोबत होती. 

     कार्यक्रमाची सुरूवात श्री. सुधीर चित्ते सरांनी सुत्रसंचालन करून नेहमीच्याच उत्साही आणि आंतरीक आत्मविश्वास वाढवणा-या शब्दांनी केली..... आणि सुरूवातीलाच....
"शब्दानी प्रसन् व्हावं 
मनाचा कोपरा चिंब भिजावा
सुख आणि शांती नांदावी 
शब्दांनी शब्दांशी गोड
होऊन एकजुटीनं नांदावं....!"

असा शब्दांचा गोडवा रसिकांपर्यंत पोहचवणा-या सीमा झुंझारराव यांनी प्रथम काव्यवाचन करून रसिकांना आपल्या शब्दकाव्यातून आनंद दिला...! सुरूवातीला केवळ वाचक असणा-या पण वाचनातूनच फुललेले त्यांचे हे काव्य कौतुकास्पद आहे.

     व्यवसायाने डेन्टीस्ट अगदी तरूण ताज्या दमाचा कल्याण काव्य मंचचा तरूण चेहरा......
"प्रेमाचा अनेक व्याख्यांवरूनही प्रेमाचा 
अर्थ सांगणं भल्याभल्यांना नाही जमलं
प्रेम म्हणजे काय असतं हे मलाही 
ख-या अर्थाने प्रेम झाल्यावरच समजलं.....!"

सहज सोप्या सोज्वळ शब्दांतून क्ती मोठा अर्थ सांगणारा हा युवा कवी म्हणजे शुभम नाईक याने अतिशय सुंदर तरल ह्रद्यस्पर्शी कविता सादर करून उपस्थित सर्व कव्यरसिकांची दाद मिळवली.....!

     "अंकिता डोंगरे"  हा कल्याण काव्यमंचचा आणखी एक तरूण सुंदर चेहरा आणि तिच्या काव्यातील भावही तसाच सुंदर तरूण आणि परिपक्वतेकडे प्रवास करणारा , आशावादी आणि कणखर वाटला. तीची स्वप्न ही कविता अशीच कणखर वाटली.

"त्यांनी समजावून पाहिले मला
मी नाही एेकले.....
त्यांनी आवाज चढवला 
मी नाही एेकले......
त्यांनी थोडा घातला धाक
मी नाही घाबरले 
मग त्यांनी अश्रूंचा घेतला आधार 
मी नाही विरघळले.....
त्यांच्या कोणत्याही कृतीचा
मला फरक पडला नाही
हे पाहून शेवटी
त्यांनी माझ्या स्वप्नांना स्वीकारले!

अशा प्रगल्भतेकडे जाणा-या युवा कवयित्रीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

     नवकविंचे नवखेपण असूनही काव्यरसिकांनी दिलेली दाद म्हणजे कवी- कवितेला नवा उत्साह देणारी असते याची प्रचिती वेळोवेळी येत होती...!  आणि त्यामुळेच कल्याण काव्यमंचने नवोदितासाठी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ म्हणजे " काव्यपंढरीच" आहे.  आणि या काव्यपंढरीचे आम्ही सर्व सदस्य "वारकरी" आहोत तर "कविता"  आमची "विठूमाऊली"  कार्यक्रम दरम्यान हेच भक्ती कृतज्ञतेचे भाव मनात येत होते.  

     सीमा झुंझारराव, शुभम नाईक, अंकिता डोंगरे यांच्या काव्यवाचनानंतर  सुधाकर वसईकर यांनी त्यांच्या कविता अतिशय उत्कटतेने सादर केल्या.

     "केसात माळलेल्या 
      गज-याचा सुगंध मी 
     धुंदणारा भुंगा मीच तो 
    झिंगणारा भुंगा मीच तो "

या प्रेमकाव्यापासून ते "रंगभुमी" सारखी गंभीर अंतर्मुख करणारी कविता सादर करून उपस्थित सर्वच काव्यरसिकांची मने जिंकली.

     या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की  पार्कातल्या कविता ही काव्यवाचनातील अतिशय सुंदर संकल्पना  यशस्वीपणे सादर करणारे , सुरेश पवार  हे राज्यस्तरीय नाट्यकर्मी  ,  अरूण गवळी  सारखे प्रगल्भ कवी  "कवडसे" या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.  तसेच आयोजकांनी प्रत्येक काव्यरसिक श्रोत्यांची दखल घेत प्रत्येकाचे प्रेमाने स्वागत केले जात होते.    त्यामुळे कवडसे हा कल्याण काव्यमंचच्या अंगणातून ते उपस्थित प्रत्यक रसिकांच्या मनात जाणारी प्रकाशाचा स्रोत होता.

     कवडसे मध्ये माझेही काव्यवाचन होते !  एवढ्या सा-या श्रोत्यांसमोर एक दोन नव्हे तर वीस मिनीटे काव्यवाचन करणे हे इतरांसारखे मलाही दडपण आणणारे होते, कारण माझाही हा पहिलाच होता.  पण सर्वच सन्मानीय सदस्यांनी आम्हाला आत्मिविश्वास दिला म्हणूनच काव्यवाचन, सादरीकरणाचा आनंद घेऊ शकलो.

     "तुझ्या श्वासांची ऊब 
       मला इथे जगवते
       अनं
      माझ्या आसवांची गाज
     तुला तिथे कळते

    काय फरक पडतो 
    तू तिथे 
    अनं 
    मी ईथे   

या कवितेने काव्यवाचनाला सुरूवात केली........ माझ्यासाठी हा एक प्रयोग होता आणि त्याचे माझ्यासाछी खुप होते.  या काव्यवाचनातून मला माझ्या कवितांची रसिक श्रोत्यांच्या मनाच्या ठायी किती झेप घेऊ शकते याची थोडी का होईना कल्पना येणार होती.... !  आणि "कवडसे" कार्यक्रमाने  काव्यरसिकांपर्यंत कवितेने पोहचणे म्हणजे काय याची खरी जाणीव करून दिली.    माझ्या आवडीच्या मिश्र भावनांच्या कविता सादर करतांना मला स्वत:ला सुद्धा खुप आनंद मिळाला.  

उगावावं म्हणते तुझ्यातून
म्हणजे तुझ्या वेदनेला
माझा सहनशीलतेचा देठ भिडेल
आणि तू मग सावलीतून फक्त शीतल
माया देशील ज्याची मला आता गरज आहे!
तुझ्या आतल्या पुरूषाला सांग ना
माझ्यातल्या अगणीत कवितांना तुझा
कोमल स्वर हवाय...!
देशील तू तुझ्यातल्या थोड्या अश्रुंना
माझ्या डोळ्यातल्या आसवांची साथ...!
फार नाही पण हसतांना तूला पहायचंय
तुडूंब भरलेल्या हंड्यातून उचंबळणा-या पाण्यासारखे
तुझ्या सुखाच्या कल्पना एकदा कैनव्हासवर उतरवून
त्यात रंग तूच भर
पण त्यामध्ये एखाददुसरी सुखाची नक्षी माझीही
सामील कर...!
तुझ्या जुन्या फोटोफ्रेममध्ये
अजुनही मला ब्लैकअँड व्हाईट
संदर्भ दिसतात....
काढू नकोस ते बाहेर ...
पण
तिथेच मलाही थोडे आत घे....
माझे सारे तूझ्यात सामावून जावे
असेच प्रयत्न करत आले
तरी मी अजुनही बाहेर आहे...
व्यवहार आणि विश्वास यात
तोलत ठेवून मला अजुनही तू
हिशोबात मांडतोस
पण ...
हिशोबात धरत नाहीस.....!!!!

 ही कविता सादर करतांना मला विशेष आनंद झाला. रसिकांनाही तो मिळाला असेल अशी अाशा करते.  कवडसे हा माझ्यासाठी सर्वच अर्थाने एक अविस्मरणीय अनुभव होता.   काव्यरसिकांपर्यंत आपली कविता पोहचवताना काय  व कसे  भान ठेवावे, काय टाळणे आवश्यक आहे  असे अनेक नवीन धडे मिळाले   कल्याण काव्य मंच ची यासाठी मी कायम ऋणी  असेन . 

     या निमीत्ताने   आमच्या मनातले काव्य'कवडसे' काव्यरसिकांच्या मनामनात प्रकाशाची एक तिरीप जरी सोडून गेले असतील  तरी आम्हाला खुप समाधान मिळेल....! पण ही तर आमची सुरूवात आहे.  अजून खुप अनुभव येणार आहेत.... आणि मला खात्री आहे " कल्याण काव्य मंचच्या" अभिमानास्पद विस्तारासोबत आम्हा सर्व काव्यवारक-यांचा प्रवासही दिमाखदार होणार आहे........!
शुभंम भवतू......!!



  




तुला कळतंय ना .......!!







प्रिय............
     तुझ्याशी खुप खुप बोलायचे असते म्हणून मोबाईल आॅन करते.  व्हैट्सएपवर येऊन उगीच स्क्रिन स्क्रोल करीत असतांना तुझ्या नावासमोर येऊन क्षणभर थबकते .... तुझ्या नावाला हलकेच स्पर्श करून अंतरंगात डोकावते आणि नेमका तेव्हा तुही तिथे थांबलेला दिसतोस........

     ह्रदयात धडधड होऊन तुला पहात रहाते ... तुझ्या आॅनलाईन सिग्नलला न्याहाळत ..... तुला हेलो .... करून बोलवावं का असा मनात विचार करत असतानाच तू क्षणात आॅफलाईन नजरेआड होतोस ........!  आॅफलाईनची ती रिकामी पोकळी पाहून हिरमुसली होऊन स्वत:ला निमुटपणे आत ओढून घेते.....!  तरारून फुलायला आलेले शब्द न शब्द फुरगंटून स्वत:ला मिटून घेतात,  डोळ्यांच्या काठावर आलेलं पाणी ..... तसंच तरळत रहातं..... आधाराशिवाय...! 

     असा कसा तू ....?  मला न पहाताच न भेटताच ..... न बोलताच कसा  निघून गेलास.....?   किती नाही म्हटलं तरी थोडासा राग..... थोडासा रूसवा..... थोडीशी बेफीकीरी मनात उमटतेच....!  एकमेकांविषयी अजिबात गैरसमज करून घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं असतेच आपण .... आणि आतापर्यंत ते कटाक्षाने पाळतोही आपण ... तू नेहमीच ठाम ... निश्चिंत.....!  पण कधी  हे असं होतंच माझं.....!  ज्याची त्याची स्पेस, ज्याचं त्याचं आयुष्य आहे हा डंका कितीही  पिटला तरी मनात थोडीशी बैचनी येतेच ! आणि तुझ्या माझ्या प्रेमातला थोडासा रस उणावतो, उत्कटून, समरसून तुला भेटण्याची आस सपाट पातळीवर येते...!

     आपलं नक्की नातं तरी काय?  या भाबड्या आणि भावूक प्रश्नांपलिकडलं आपलं प्रेम आहे हे ठाऊक असूनही मनात एक छोटसं वादळ घोंगावून जातेच......!( यावर तू आता मिश्कील हसला असशील..)  तेच हसू काहीवेळानं माझ्या ओठांवरही येतं ... जेव्हा तुझे  ते आश्वासक.... निर्मळ..... शांत ..... समजुतदार डोळे आठवतात,  आठवतो  जवळ नसतानाचा तुझा-माझा  नि:शब्दात जपलेला विरह....!   आणि त्या विरहात आपण दोघांनी श्वास-नि:श्वासात गुंफलेले अतूट ऋनानुबंध दिसतात.....अनं तिथेच शांतपणे विरून जाते मनातले क्षणभरचे हे वादळ.... !

      आणि मी आश्वस्थ होते ...... पुन्हा नव्याने अधिकच तुझ्या प्रेमात पडते .....!!
तुला कळतंय ना .......!!


@ समिधा

    

स्री पुरूष मैत्री एक दिवास्वप्न !

  

 

       अहो ..... तुम्ही आरशात पहा जरा स्वत:ला !   बघा  तरी कसा अवतार झालाय ? पोटाचा घेर वाढलाय, चेहरा केवढा ओढल्यासारखा दिसतोय ! स्वत:कडे लक्ष द्या नं जरा.  किती काम आणि काम करीत रहाल?  कीती वेळा तुम्हाला हे सांगितलं पण तुम्ही  माझं कशाला एेकाल... तुम्हाला एखादी मैत्रीण असती तर बरे झाले असते .... निदान तिचे तरी एेकलं असतं.! असं मी माझ्या प्रिय नव-याला बोलते .... तेव्हा त्यांच्या चेह-यावर मिश्कील हसू तरळतं...! हे मी माझ्या पतीला एवढ्या सहज बोलू शकते तितक्या सहज मी त्याची मैत्रीण खरंच स्वीकारेन का?
     मी एक स्त्री  आहे  आजची आधुनिक पुरोगामी  विचारांची  … तरीही माझ्या विचारांना पारंपरिक संस्कारांची एक बैठक आहे ! पुरोगामी विचारांच्या तळाशी अभेद्य अश्या परंपरेची घट्ट वीण आहे तिची गाठ माझ्या दैनंदिन व्यवहारपासून ते एकूण  जीवन मूल्यांपर्यंत वेढली आहे !  अश्या ह्या समांतर रेषेतील जगण्यात मी माझे स्त्रीत्वाचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करते  …  तेंव्हा माझा स्वत:शीच मानसिक संघर्ष खुप होतो.
     मग हा संघर्ष होत असतांना आपल्या मनातील प्रत्येक विचाराला नैतीक अधिष्ठान असतेच असे नाही. कारण हा संघर्ष खरंतर  मन आणि बुद्धी यांच्यात होत असतो.  
     जेव्हा  हा  पुरोगामी आणि पारंपारीकतेचा संघर्ष स्री-पुरूष नातेसंबंध असा माझ्या आत होत असतो तेव्हाच्या विचारसंक्रमणात  आपण आपल्या काही नितीमुल्यांचा पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक प्रगल्भतेने विचार करावा असे वाटते. तेव्हा वाटते आपले अस्तित्व ज्या परंपरा संस्कार यांच्या पायावर उभे आहे त्यांना पुन्हा एकदा स्री-पुरूष दोघांनीही नव्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजे आणि काळाप्रमाणे त्यांचा स्विकार करून जगणे अधिक समृद्ध केले पाहिजे ! पण जगणे समृद्ध करणे म्हणजे नेमके काय? सहज, सोपे, सुटसुटीत जगता येणे  या जगण्याला मी समृद्ध मानते.  जिथे प्रत्येक विचारात सुस्पष्टता असते,  गृहितकांना स्पष्ट नकार असतो, आणि प्रत्येक विचारामागे कृतीमागे आयुष्याला अधिक अर्थपुर्ण करण्याची आस असते, एवढेच नाही तर त्या नात्यामुळे आपल्या जगण्याला उर्जीत चालना मिळणे अपेक्षीत असते.

     प्रत्येक नात्यामध्ये ज्याची त्याची स्वतंत्र जागा असावी.  पण ही जागा कोणत्याही नात्याच्या दृढतेला विश्वासाला धक्का देणारी नसावी.  नात्यांमधील आस्था , प्रेम हे कृत्रीम न रहाता ते अधिक सकस आणि सजीव व्हायला पाहिजे.   प्रत्येकाचे एक  स्वतंत्र भावविश्व असते. त्या भावविश्वात आपल्या भोवती , आपल्या सोबत असणा-या प्रत्येक व्यक्तिचा प्रवेश होत नाही ! एखादाच तिथे पोहचतो जो आपल्या आंतरिक संवेदनांना विचारांना समजू शकतो हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य  स्री-पुरूष दोघांनाही उदारतेने सन्मानाने स्वीकारता आले पाहिजे.

     जेव्हा स्री-पुरूष संबंध हा केवळ शारीरपातळीवरून जोखला जातो तेव्हा त्या नात्याला आपसुकच एक दुर्गंधी येते! खरं तर  या नात्याला अनेक कंगोरे आहेत.  जेव्हा एक प्रगल्भ स्री आणि एक प्रगल्भ पुरूष यांच्यात मैत्री होते ती परिस्थितीच्या अधीन असते तरिही वास्तवाचे भान ठेवणारी आणि एकमेकांच्या स्वतंत्र संसारांचा आदर राखून एकमेकांच्या  सानिध्यात संपर्कात येऊनही परस्परांच्या आत्मीक उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्नशील असते.. ! अशी मैत्री कुणालाही दिवास्वप्नच वाटेल पण अगदी रविंद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, गाोपाळकृष्ण गोखले, सरोजीनी नायडू यांनी अनुभवलेली स्रीपुरूष मैत्रीचे सामर्थ्य याच नातेसंबंधांवर आधारीत असलेल्या  अरूणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तकातून वाचायला अनुभवायला मिळते .  अगदी अलिकडचे जी. ए. कुलकर्णी सुनिता देशपांडे, एमरोज अमृता प्रितम साहिर लुधयानवी   या महान विभुतींची उदाहरणे पाहिली की स्री पुरूष मैत्रीचा एक  सुंदर आयाम आपल्याला समजतो.
ही अशी मैत्री दोघांचाही सन्मान, आदर  वाढवणारी आणि समाजात अभिमानाने मिरवता येणारी पाहिजे .

     या संपुर्ण विचार संक्रमणात एकूणच  स्री - पुरूष नाते मग ते पती पत्नीचे असो वा अन्य कोणतेही  प्रत्येक नात्यात एक खरा सच्चेपणा पाहिजे  !  त्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास तर हवाच पण प्रत्येक नात्याला त्याचे एक विशीष्ट स्थान असते ते स्थान अबाधीत ठेवून त्याचा योग्य तो सन्मान करणे  आवश्यक आहे.

      थोडक्यात एक अस्तित्व दुस-या अस्तित्वाशी जोडले जाते ते त्यामधील समसंवेदनांमुळेच त्या जितक्या
 ख-या स्वच्छ, निर्मळ तितकेच ते नाते पवित्र असे माझे प्रामाणिक मत आहे.  !

@  समिधा
    

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......