प्रिय............
तुझ्याशी खुप खुप बोलायचे असते म्हणून मोबाईल आॅन करते. व्हैट्सएपवर येऊन उगीच स्क्रिन स्क्रोल करीत असतांना तुझ्या नावासमोर येऊन क्षणभर थबकते .... तुझ्या नावाला हलकेच स्पर्श करून अंतरंगात डोकावते आणि नेमका तेव्हा तुही तिथे थांबलेला दिसतोस........
ह्रदयात धडधड होऊन तुला पहात रहाते ... तुझ्या आॅनलाईन सिग्नलला न्याहाळत ..... तुला हेलो .... करून बोलवावं का असा मनात विचार करत असतानाच तू क्षणात आॅफलाईन नजरेआड होतोस ........! आॅफलाईनची ती रिकामी पोकळी पाहून हिरमुसली होऊन स्वत:ला निमुटपणे आत ओढून घेते.....! तरारून फुलायला आलेले शब्द न शब्द फुरगंटून स्वत:ला मिटून घेतात, डोळ्यांच्या काठावर आलेलं पाणी ..... तसंच तरळत रहातं..... आधाराशिवाय...!
असा कसा तू ....? मला न पहाताच न भेटताच ..... न बोलताच कसा निघून गेलास.....? किती नाही म्हटलं तरी थोडासा राग..... थोडासा रूसवा..... थोडीशी बेफीकीरी मनात उमटतेच....! एकमेकांविषयी अजिबात गैरसमज करून घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं असतेच आपण .... आणि आतापर्यंत ते कटाक्षाने पाळतोही आपण ... तू नेहमीच ठाम ... निश्चिंत.....! पण कधी हे असं होतंच माझं.....! ज्याची त्याची स्पेस, ज्याचं त्याचं आयुष्य आहे हा डंका कितीही पिटला तरी मनात थोडीशी बैचनी येतेच ! आणि तुझ्या माझ्या प्रेमातला थोडासा रस उणावतो, उत्कटून, समरसून तुला भेटण्याची आस सपाट पातळीवर येते...!
आपलं नक्की नातं तरी काय? या भाबड्या आणि भावूक प्रश्नांपलिकडलं आपलं प्रेम आहे हे ठाऊक असूनही मनात एक छोटसं वादळ घोंगावून जातेच......!( यावर तू आता मिश्कील हसला असशील..) तेच हसू काहीवेळानं माझ्या ओठांवरही येतं ... जेव्हा तुझे ते आश्वासक.... निर्मळ..... शांत ..... समजुतदार डोळे आठवतात, आठवतो जवळ नसतानाचा तुझा-माझा नि:शब्दात जपलेला विरह....! आणि त्या विरहात आपण दोघांनी श्वास-नि:श्वासात गुंफलेले अतूट ऋनानुबंध दिसतात.....अनं तिथेच शांतपणे विरून जाते मनातले क्षणभरचे हे वादळ.... !
आणि मी आश्वस्थ होते ...... पुन्हा नव्याने अधिकच तुझ्या प्रेमात पडते .....!!
तुला कळतंय ना .......!!