काल १५ ऑक्टोबर २०१४ मतदानाचा दिवस …!! सकाळी उठले खूपच अस्वस्थ होते …! कारणही तसेच होते …! माझा नवरा सकाळीच मस्त दाढ़ी करून कड़क इत्श्रीचे कपडे घालून शीळ घालित मतदानाला जायची तयारी करत होता ! ( जसा काही मैत्रीणीला भेटायला निघाल्या सारखा ) आदल्या दिवसापासून मला तो चिडवत होता …! सरकारी माणसे असून घरात बसणार आणि आम्ही मतदानाचा हक्क बजावणार ! नागरिकत्वाचा हक्काचा हक्क ! त्यामुळे मी जरा घुश्शातच होते ! एवढे वर्ष निवडणुकीचे कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान कधी करता आले नाही, पण निवडणुकीचा एक भाग म्हणून या प्रक्रियेत असल्याचे समाधान मला नक्कीच मिळायचे … पण या वेळी नेमकी माझी इलेक्शन ड्यूटी लागलीच नाही आणि एवढे वर्ष लग्नानंतर मतदार यादीतील नाव सासरी स्थलांतरित केले नाही ! त्यामुळे मतदार यादीत नावच नव्हते मी खूपच हिरमुसले होते ! जाताना घरातले सर्वच मला मुद्दाम आवाज देऊन जात होते …! शेवटी न राहून आईकडे फ़ोन लावला luck by chance घ्यायचे ठरवले … ! " आई माझ्या नावाची इलेक्शन पावती आली आहे का गं ?" मी . " हो …! " आईचे ते शब्द ऐकून मी जोरात ओरडलेच "काय खरंच ?" हो का गं ? येतेस का ?" मी पण केले नाही मतदान थांबते तुझ्यासाठी " आई . हो ! निघते लगेच ! मी .
पण एक प्रॉब्लम होता लग्नानंतर माझे नाव पत्ता सारेच बदलले होते ! जुन्या नावाचा आयडी प्रूफ काहीच नव्हता शेवटी माझा प्यान कार्ड शोधून काढले त्यामध्ये माझ्या नावा सोबत माझ्या बाबांचे नाव होते … बस्स एव्हढेच ! पण तरीही मला मतदान करू देतील की नाही याची खात्री नव्हती … ! पण इच्छाशक्ति जबरदस्त होती ! दुपारची गाडी पकडून माहेरी गेले आणि मतदान केन्द्रावर जाऊन आईच्या मागे रांगेत उभी राहिले ! एक मतदार म्हणून मी ब-याच वर्षानी अनुभव घेत होते .! मतदान केंद्रात प्रवेश केला आधी आईचा नंबर होता आईकडे फक्त एक पावती आणि रेशनकार्ड होते आणि मतदान अधिक-यांकडून अपेक्षित प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली ! " अहो मैडम तुमचा फोटो कुठे आहे ? सगळे आहे हो , पण मला वाटले यादीत माझा फोटो असेल मी फार जुनी मतदार आहे हो, गेली चाळीस वर्षे इथे राहते ! नाही … ! तसे चालत नाही ! चला तुम्ही बाजूला उभ्या रहा !" आता माझा नंबर होता ! तुमचे यादीत नाव वेगळे आहे ," । "यादीत तुमचा फोटो नाही " काही आयडी प्रूफ आहे का ? " मी माझ्याकडील प्यान कार्ड दाखवले ! " अहो पण यात तुमचे नाव वेगळे आहे ", " हो ते लग्नानंतरचे आहे "! पण त्या खाली पहा माझ्या वडिलांचे नाव आहे "! तेव्हढ्यात पी आ रो धावत आले ! नाही मैडम नाही चालणार …! " का नाही चालणार ? तुम्हाला आवश्यक ते सारे प्रूफ आहेत की । जूने नाव आहे … नविन नाव , फोटो आहे , आणि माझ्या बाबांचे नाव आहे ! आणि सर्वांशी जुळणारी मी स्वत: इथे उभी आहे ! साहेब ! मी तीच आहे …!" आणि ही शेजारी उभी आहे ती माझी सख्खी आई आहे !! त्यांचा प्रश्न वेगळा आहे पण तुमच्याकडे बँकेचे वगैरे पासबुक काही ? कशाला। .? त्यातही हेच पाहाल ना ? मग ? शेवटी पि आ रों . ना मला मतदानाची परवानगी द्यावी लागली ! मी विजयी थाटात बोटावर शाई लावून । दिमाखात ईव्हीएम मशीनचे बटन दाबून … बाहेर आले !
बाहेर येऊन आईला पाहिले तर ती बाहेर नव्हतीच । आत डोकावले तर ती पुनः पि आ रो ला विनंती करीत होती ।! बिच्चारी मतदान न करताच तशीच बाहेर आली …! आज मतदान यादीत तुमचे नांव असले आणि प्रत्यक्ष तुम्ही असलात तरी कागदी आयडी प्रूफला फार महत्व होते …!! इथे ओरिजिनल पेक्षा तुमची झेरॉक्स कॉपी भाव खाऊन जाते …! म्हणजे कागदी निर्जीव माणूस जिवंत माणसामध्ये प्राण फुंकतो आणि त्याला मतदान करता येते … मी तोच /तीच आहे … आणि अजूनही जिवंत आहे ! असे कागदी लिव्हिंग सर्टिफिकेट आणाल तरच पेंशनरांना पेंशन मिळते …!! म्हणजे आपण सारे कागदी जिवंत माणसे आहोत …!! स्वत: पेक्षा आपल्या अस्तिवाचे प्रूफ आसना-या कागदांना जपून ठेवा हां .... !!
"समिधा"