" एकेकाचा एक दिवस ....!"


      ठाण्याला बदलापुर ट्रेनच्या लेडीज डब्यातून  त्या  काकू धडपडतच कश्याबश्या उतरल्या  , हातात दोन कापड़ी कश्याने तरी भरलेल्या पिशव्या  . उतरल्या त्याच गाडीतल्या गर्दीने भेदरलेल्या घाबरलेल्या   … उतरताच त्यांच्या लक्षात आले आपली पर्स खांद्याला नाही  । बिचा-या आणखीनच काव-या बाव-या झाल्या  लेडीज डब्या समोर इकडून तिकडे तीकडून इकडे  धावत " अगं बायांनो कुणीतरी माझी पर्स दया गं   आतमध्येच पडली ओ  !" त्यांची ती केविलवानी स्थिति पाहून प्लेटफार्म वरच्या आम्हा बायकांना त्यांची दया आली   .  माझ्या सह एकदोघी जणी त्यांच्या मदतीला धावलो पण तेव्हढ्यात ट्रेन चालू झाली   … इतक्यात  कुठल्या तरी डोअर मधून आवाज आला  "आहे आहे पर्स  मिळाली !" आणि  गाडीने वेग घेतला !! बिचा-या  काकू रडकुंडीला आल्या   .  तेव्हढ्यात मी पटकन हातातल्या मोबइलवर माझ्या मैत्रीणीचा नंबर फिरवला ती  त्याच गाडीतून प्रवास करीत होती ( अती गर्दीमुळे मी ती  गाड़ी सोडली होती ) नशीब तीने कॉल घेतला  !  " अगं गाडीत कोणती पर्स मिळाली का गं  ?"  तिने विचारुन तुला पुन्हा कॉल करते सांगितले   .  काही मिनिटातच  तिचा कॉल आला   " अगं मिळाली आहे   …  ती  बाई बदलापुरचीच आहे,  ती  म्हणाली  मी बदलापुरला  प्लॅटफॉर्मवर थांबते त्यांना बदलापुरला यायला सांग  …!!

     काकू तुम्हाला कुठे जायचे आहे ?  अगं मला इथेच एक   स्टेशन पुढे जायचे कळव्याला   …!! " काय  … !! मी आश्चर्याने विचारले    . अहो मग ह्या फ़ास्ट ट्रेन  मध्ये कशाला चढलात   .?  स्लो कुठलीही चालली  असती  .  काय  सांगू   ! मी  जास्त  काही  ट्रेनचा प्रवास करीत नाही  …!  गाडीत चढले तेंव्हा कळले ही गाडी कळव्याला थांबत नाही  … म्हणून ठाण्याला धडपडत कशीबशी उतरले   ! तरी माझा मुलगा सांगत होता आई दुपारच्या गाडीने जा गर्दी कमी असते  .  पण  ऐकले नाही  ! बाई बाई संध्याकाळी कसली ही गर्दी   …!  आता मी  काय  करू  ? माझा मुलगा मला ओरडेलच   ! पैसे पर्स सगळेच गेलं  !  तुमची पर्स मिळाली पण ती  बाई बदलापुरची आहे  .  ती  थांबणार आहे प्लॅटफॉर्मवर  !! काय करता  ?  हो हो मी बदलापुरला येते म्हणून सांग  तिला   !! पर्स मिळाली तर बरेच झाले  !!   पण काकू तुम्हाला परत गर्दीच्या गाडीतच चढ़ावे लागणार   …!  चढाल  ना   ?  ह्या गाडीला पण गर्दी असते  …!! हो गं हो चढायला तर लागेलच   …!!"

     तेव्हढ्यात  गाडी आलीच  … काकू आपल्या हातातल्या दोन्ही कापड़ी पिशव्या  पकडून आता गाड़ी पकडायचीच ह्या तयारीत उभ्या होत्याच  …!! गाडी आली ही तूफान गर्दी उतरली  … आणि तेव्हढीच तूफान गर्दी  डब्यात घुसण्यासाठी रेटारेटी करत जीवाच्या आकांताने गाडीत चढली  …!! मीही त्या गर्दीत धक्केबुक्के खात कोपर आडवे तिडवे करीत गर्दी कापत आत घुसले  … चढताना त्या काकूंचे काय झाले असेल  …? चढल्या  असतील का  …? हे विचार डोक्यात होतेच   …!  दारातून आत मी कशी तरी  आले। . मागुन  बायका धक्के देतच होत्या मी अजूनच आत लोटले गेले  … !  मी त्या काकुना मागे पुढे पाहण्याचा  प्रयत्न करीत होते  तेव्हढ्यात माझ्या मागून कुणाच्या तरी धक्क्याने त्याही आत लोटल्या गेल्या   …!  आत आल्या  पण हातात पिशव्या नव्हत्याच  ....  पिशव्यांऐवजी  पिशव्यांचे फक्त हॅन्डलच ( बंदच ) होते  ....!  काय हो काकू पिशव्या कुठे आहेत  …? अगं  बाई पिशव्या कुठे गेल्या  …?  मेल्या ह्या गर्दीत माझ्या पिशव्या पण गेल्या !! त्या , मी  इकडे तिकडे खाली शोधायला लागलो   … इतक्यात  दारातल्या बायका  ओरडायला लागल्या  " हे नारळ कुणाचे पडलेत ....? फुलं  हार  ....!!! कुणाचे आहे हे  … ?  काकू तश्याच दाराकडे धावल्या   … माझं  माझं  आहे ते  सगळं  !" बायकांनी  एक दोन  नारळ  उचलून दिले  । हार फुलांचा तर कचराच झाला होता  …!! तुटलेल्या पिशव्यापैकी एकच पिशवी होती तीही बायकांच्या पायांखाली येऊन पार मळुन गेली होती   . दुस-या पिशवीचा पत्ताच नव्हता  . बहुतेक ती बाहेरच फेकली गेली असेल  ! नारळ घेऊन काकू गर्दीतून कश्या बश्या परत आत आल्या …! "अगं  कळव्याला दिराकडे चालले होते  ।! आमची कुलदेवता असते त्यांच्याकडे  … आज तिची पूजा मांडली होती म्हणून दर्शनाला हे सारं घेऊन निघाले होते  …!!  काय गं  माझी ही दशा   …!  परत म्हणून मी ट्रेनला  यायची नाय बाबा   !! कशा  गं  पोरींनो तुम्ही रोज प्रवास करता  …??" ह्या  सा-या प्रकाराने  काकू वैतागल्या होत्या   ! पण त्यांच्याकडे दूसरा पर्याय पण नव्हता   .  मला मात्र त्यांची दयाही येत होती   . पण सा-या एकूणच प्रकाराने हसुही येत होते  ! गाडीत बसायला मिळालेच नाही ,  प्रत्येक स्टेशनला गर्दी कमी जास्त चढ़त होती , उतरत होती  !  इतक्यात माझ्या मोबइलची रिंग वाजली  ....  पहाते  … तर त्याच मैत्रीणीचा कॉल होता   … " काय गं  ? हो हो आम्ही दहा मिनिटांत पोहचूच आता   …!!  हा हां त्यांना  प्लेटफार्मवरच्या कैंटीन जवळ थांबायला सांग    !! ओके  । बाय  थैंक्स हां   !!" मी मोबइल  ठेवला  . काकू माझ्याकडेच काय झाले , प्रश्नार्थक   बघत होत्या  .   " काकू त्या बाई थांबल्यात प्लॅटफॉर्मवर  … काकूंच्या चेह-यावर एव्हढयावेळात पहिल्यांदाच हसु दिसले   ! चला एव्हढया खटपटी -लटपटी ,त्रासा नंतर निदान आपली पर्स तरी आपल्याला परत मिळतीय ह्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते  .

         गाडी स्टेशनमध्ये आली    ! उतरताना पण ही एव्हढी  गर्दी   .  काकूंना मी  माझ्या पुढे घेतले आणि लोटालोटित  आम्ही खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो   !  एवढ्या गर्दीची काकूंना सवय नव्हती  .  मी त्यांना थोडावेळ  तिथल्याच एका बाकड्यावर बसवले  . कैंटीन मिड्ल डब्या जवळ होती  !   प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी झाली  ।! काकूंना मी हात धरून  उठवले   । कश्याबश्या  त्या उठल्या  .  आम्ही कैंटीन जवळ पोहचलो  माझी मैत्रीण व ती बाई तिथेच उभ्या होत्या  …! मी  तसे  काकूंना सांगितले  आणि काकू जरा उत्सहानेच  जोरात चालू लागल्या।   त्या त्यांची पर्स घेण्यासाठी उत्साहित  झाल्या होत्या  .  आम्ही त्यांच्या जवळ पोहचलो   , ती  बाई अगदी आनंदाने हसली   । कुणाला तरी त्याची वस्तू  त्याला सुपुर्द करणार असल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांत दिसत होता .  काकूंनी तिचे आभार मानले  , " प्रेमाने तिचे नाव विचारले ";चारु !" तीनेही प्रेमानेच नाव सांगितले "तुमच्यामुळे माझी पर्स मिळाली ! नाहीतर आजकाल कोण कुणासाठी एवढे करते ?" मीही माझ्या मैत्रीणीचे आभार मानले! थैंक्स हं  !"  आभार साभार प्रदर्शन कार्यक्रम झाला    … आणि चारु बाईंनी  त्यांच्या पर्स मधून एक मध्यम आकाराची पर्स (पाउच)  बाहेर काढला  . आणि काकूंना देऊ लागल्या  … पण  .... काकू त्याच्याकडे पहातच  राहिल्या  …… !  कारण ती पर्स  काकूंची  नव्हतीच    ....!!

        काकूंच्या चेह-याकडे पहावत नव्हते   … जीवाचा एव्हढा आटापिटा करून इथपर्यंत आले    … पण काय  झाले ?  " माझा मुलगा आता मला किती ओरडेल  ..., जीवाचे हाल तर केलेच   … पूजा गेली   … पर्स गेली   … पैसे गेले  … पिशव्या गेल्या  … हारफूलें   … काही  काही हाती आले नाही   …!! "काकू तुम्हाला आता कुठे जायचे आहे ?" माझ्या प्रश्नाने त्या भानावर आल्या !  " सांताक्रुज   माझ्या घरी …!"  आता मला घेरी यायची बाकी होती    .  काकू पुनः तीन तासाचा प्रवास करणार होत्या  ....!!!!


                                                                                 
                                                                                                  " समिधा  "

      


लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......