" माझे काव्यवाचन........" 😉😜




       एका काव्यवाचनाचं आमंत्रण आलं....! खुप खुष होते ! अगदी घरात ह्यांच्या पासून आत्ताच कविता करू लागलेल्या लहान लेकीलाही कितीतरी वेळा विचारून झाले "कोणती कविता वाचून दाखवू ...? "
ह्यांच म्हणनं "बघ , तुला आवडेल ती वाच...!"
आणि लेकीचं आपलं भलतंच "आई जी तुला पाठ आहे ती तू वाच ! (हं मी तिला तिची पुस्तकातली कविता पाठ करायला सांगते नं त्याचं उट्ट काढायला म्हणत असेल कदाचीत 😊😊).
माझ्या मते कविता पाठ असण्याशी आणि वाचन करण्याशी काय तरी संबंध असतो का आजकाल ?..😃
काव्यवाचनाला आजकाल कवि लोक डायरी (हल्ली कवितांची डायरी नेणं अगदीच बैकवर्ड लक्षण हं )नाहीतर अन्ड्राइड मोबाईल नेतात !
एका झटक्यात सॉफ्ट टच करून हवं ते स्क्रीनवर पहाता येतं ! इतकं सारे सोप्पे मार्ग असतांना कविता पाठ कशाला हवी?
काव्यवाचनाचा दिवस ....कल्याण सार्वजनिक वाचनालयचं सभागृह
प्रेक्षकांनी तुडूंब भरलाय....! मनात धाकधूक होती , तरी काव्यवाचनाचा उत्साह कमी झालेला नव्हता...! तेवढ्यात आयोजकांनी सर्व कवि लोकांना काव्यवाचन करण्यास स्टेजवर बसण्यासाठी बोलवलं ! आम्ही सगळे आपआपला जामानिमा सांभाळत स्टेजकडे निघालोच होतो ....तेवढ्यात आयोजकांमधील एकानं हाताचा पंजा वर करीत हातावरील एक पेनाने काढलेली डीझाईन दाखवत ही अशी डीझाईन स्टेजच्या जवळ काढायची आहे कुणाला येईल? डिझाईन साधीच होती . एका टिंबाला पकडून एक एक रेषेला वर्तुळाकार फिरवून जोडून असे असे अनेक रेषांचे एक वर्तूळ काढायचे होते ! आणि त्यांनी मलाच सांगितलं ....
रांगोळी कुणीतरी आणून दिली मी आपलं सोप्प सोप्प म्हणत होते पण भलतीत कॉम्प्लिकेटेड रांगोळी होती.... पण माझं नशीब एक वयस्कर कवयित्री माझ्या मदतीला आल्या...त्यांनीच रांगोळी पुर्ण केली...मी आपली रांगोळीचे पांढुरके हात झटकत स्टेजवर गेले ... सारे कवि लोक स्थानापन्न झाले होते...!
सुत्रसंचालकीने प्रस्तावना न लांबवता काव्यवाचनाचा कार्यक्रम सुरू केला ! एक एक कवि कवयित्रीचे वाचन होत होते ...माझी धडधड वाढत होती . अब मेरा नंबर आयेगा...... अब मेरा ही नंबर ...!असं वाटूवाटूनच आतल्या आत घसा साफ करून सुकायला लागला होता!
आणि माझा लाडका अन्ड्राईड फोन उघडून जी कविता वाचायची होती ती उघडून पाहिली...! हीच छान आहे हीच वाचावी पण तीही छान आहे ती छान गाता पण येईल ...! असं मनातल्या मनात विचार करत मोबाईलवर सॉफ्ट टच करून स्क्रीन वर खाली करीत होते ........
आणि तेवढ्यात मोबाईलचा रेडअलर्ट आला! मोबाईलची बैटरी "लो " 😭😭 झाली होती ! अर्रे .... देवा ...! मघापासून फोटो व्हीडीयो वैट्सअप फेबू उघडझाप करीत होते त्याचाच हा परिणाम .....!
डोळ्यापुढे अंधारी आली! एकतर मी या मोबाईलच्या भरवशावर माझी कवितांची डायरी पण आणली नव्हती पण मी विचार करण्यात वेळ न घालवता मी स्टेजवरून उडी मारून एका कोप-यात गेले आणि कुणाकडे चार्जर आहे का चार्जर विचारत होते ! आणि अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणी चार्जर घेऊन येईल का?😃😃 पण मुसीबत अकल को बंद कर देती है असं काही झालेलं ! तरी मी आशा सोडली नाही अगदी हॉलच्या शेवट पर्यंत जाऊन विचारले....! आणि उम्मीद पे दुनिया कायम है ! याचा अनुभव आला! एकाने मला चार्जर दिला...! अगदी झडप घातल्यासारखा मी तो घेतला!
आता चार्जर मिळाला तो लावायला बोर्ड शोधणे बाकी होते ...!
तशीच हॉलच्या ऑफीसमध्ये गेले तिथे एक तब्येतीनं अगदीच बारीकसा माणूस कान कोरत बसला होता .
मी त्याला प्लिज प्लिज माझा मोबाईल चार्ज कराल का? विचारले तर भिक मागणा-याकडे तुच्छतेने पहावं तसं तो माझ्याकडे पहात होता ..पण माझी आर्जव जरा जास्तच वाढली होती....तिकडे स्टेजवर माझा नंबर आला असेल असं मनात आलं आणि मी रडकुंडीला येऊन त्याला हात जोडून विनंत्यांवर विनंत्यां करीत होते ....यावेळी तोच एक तारणहार दिसत होता!
आणि तो बारीक माणूस प्रसन्न झाला त्याने एक बोर्ड दाखवला ! जो माझ्या उंचीच्या पोहोंचके बाहर था!😞😞😞
मग पुन्हा एकदा त्यांच्याकडे बेचारी मुसीबत की मारी नजरेनं पाहिले ...😞😞 तोही जे समजायचे समजला !
मोबाईल चार्जर त्यांच्याकडे दिले त्याने तो बोर्डला लावला चार्जरची पीन मोबाईलला लावली आणि बोर्डाचा बटन ऑन केलं आणि तो उभ्या उभ्या एकदम थरथरायला लागला ! मला क्षणभर काय होतंय ते कळेणाच !
आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा माझी पाचावर धारण बसली 😳😳😳
त्या बारीक माणसाला शॉक लागला होता .....😳😳आणि मी त्याला पकडणार तर त्याने त्या अवस्थेतही माझ्यावर डोळे वटावरले😳😳😳😳
अगं येडे हे काय करतेस ..? असे काही भाव त्याच्या त्या डोळ्यांत मी वाचले
(एरवी काव्यात डोळ्यातले मी वेगळेच भाव वाचत असते 😀😀😀)
हं लाकूड लाकूड ! इकडे तिकडे पाहिले एक लाकडी टेबल दिसला . पुर्ण ताकदीनं तो त्या माणसाजवळ फरफटून आणला
आणि त्याने तो पकडल्याबरोबर त्याची थरथर थांबली😊😊👏👏 आणि तो वाचला !😂😂
त्या बारक्याला आणि मोबाईलला तिथेच सोडले ...आणि मी तशीच बाहेर पळाले !😃😃
बाहेर आले तर काव्यवाचनासाठी माझेच नांव पुकारत होते...!
आता स्टेजवर जाऊन काय आणि कसे काव्यवाचन करू प्रश्नच होता! लेकीचे शब्द आठवले "जी पाठ असेल ती कविता वाच...!" पण माझे पाठांतर कच्चे त्यामुळे माझ्याच कविता पण कधीच पाठ नव्हत्या ! तशीच ब्लैंक स्टेजवर गेले ...माईकसमोर उभी राहिले आणि डोळे घट्ट मिटून घेतले . डायरीतली ती कविता आठवली , आणि लख्ख डोळे उघडून काव्यवाचन केले ....शब्द नं शब्द आता आठवत नाही पण मित्र हो,
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
हा अनुभव काल रात्री पाहिलेल्या स्वप्नातला आहे बरं का  ..........!😉😉
 
पण स्वप्नातल्या ह्या फजीतीनं माझे डोळे मात्र चांगलेच उघडलेत .....!
"पाठांतर" किती महत्वाचे असते याचा अनुभव मी स्वप्नातून का होईना पण घेतला मित्र हो 😃😃!
कविता पाठ असेल तर .....
* कविचा काव्यरसिकांशी थेट संपर्क होतो!
* कवीच्या चेह-यावरील भाव आपल्या कवितेतील भावनांसोबत बदलतात त्यामुळे ती केवळ वाचिक न होता प्रेक्षणीय होऊन अगदी थेट रसिकांपर्यंत पोहचते !!!
* आणि अशा काव्यवाचनाने कवीलाही रसिकांचे चेह-यावरचे भाव कळतात आणि त्यांच्यातील कनेक्टीव्हीटी जास्त वाढते .
*काव्य आणि आशय रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी कवितेला निश्चितच मदत होते!
* आणि महत्वाचे म्हणजे कवि, कविता आणि रसिक
यांच्यातील आपआपसातील कनेक्टिव्हीटीने एक " "माहोल" तयार होतो ....!!
काय पटतंय का?
अजुनही खुप फायदे असतीलच!
कवी काव्यरसिकहो तुम्हाला काही माहित  असतीलच ! 🌷🌷

                                                                                                       समिधा

नको देवराया अंत असा पाहू .... !!!

very old indian couple in sadness के लिए चित्र परिणाम

      आज ऑफिस मध्ये निवृत्त झालेल्या एक सफाईकामगार रुक्मिणी मावशी आल्या होत्या, माझ्या टेबल जवळ येऊन उभ्या राहिल्या , मी कामात होते त्यामुळे माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते , पण मला जाणवले कुणीतरी माझ्या टेबल जवळ उभे आहे, मी मान वर केली तर रुक्मिणी मावशी ... ! मी हसून विचारले काय मावशी कश्या आहात ? झाले ना सर्व पेन्शनची , ग्रॅज्युइटीची कामं .... हो गं लेकी  तुज्यामुळं सगळं यवस्थित मिळालं पैसं ... ! मलाही ऐकून बरे वाटले , आता या वयात त्यांना जास्त फे-या माराव्या लागू नयेत म्हणून खूप कमी दिवसात कागदोपत्री सा-या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांची पेंशन चालू केली होती . ऑफीसचा लंच टाइम झालाच होता , मावशी जेवणार नां आमच्या सोबत , चला जुन्या आठवणी जरा ताज्या करू ... मावशींना माझ्या सोबत घेऊन मैत्रिणींच्या टेबलाकडे निघाली तर मावशी थबकल्या , म्हणाल्या नको मॅडम , तुमी जावा , तुमी येवतर  मी हतच बसते ...! मला वाटले मावशी उगीचच  इकडे आलेल्या नाहीत . 

     रुक्मिणी मावशी रिटायर्ड होऊन दोन वर्षांनी आज ऑफिसला आल्या होत्या .... का बरं आल्या असतील...?  मी लंच आटपून आले तोवर मावशी माझ्या टेबलपाशी बसल्या होत्या,  मावशी चहा मागवते थांबा ... नका नका मॅडम सुरेशनी आताच दिला , सुरेश आमच्या ऑफिसचा प्रेमळ पिऊन , मग मीही हसले , हं बोला मावशी सगळं ठीक आहे नं ...? मालक कसा आहे तुमचां ....?  रुक्मिणी मावशींनी डोळ्याला पदर लावलां .... न्हाही वो ,मालक माजा मागल्या वर्षीच आजारानं गेला .... ! अरे बापरे ... काय सांगता मावशी ..? मी . हो नं ... त्याच्या जागंवर मोठया लेकाला लावलाय ,  तुम्हाला दोन मुलगे आणि एक मुलगी नां ? मी मध्येच विचारले . हो  लहान्याला माज्या  जागंवर लावलाया आणि लेकीचं लगींन आगुदरच झालया !  आता मी तिच्याकडंच असतुया ...! का तिच्याकडे का रहाता ? इथं असतानाच तुम्ही नवं  घर बांधलं होतं नां ? हो पन तिथं थोरला ल्योक आनि त्याची बायकापोरं राहत्यात आनि धाकालाबी येगळीकडं ऱ्हातोया .  पण मग तुम्ही का नाही राहत तिथे ? मी .  माजं त्यांच्या बायकांशी पटत न्हाय म्हून पोरांनी बायेर काढल्यान मला . , बापाची पेंशन थोरला घेतोया आनि माजी पेंशनितलं पाच हजार लेकिला देती , तिला कशाला ...? तिच्याकडं  राहती नव्हं मी ...!अर्ध्या पेंशनीत भागवते   हे ऐकून माझ्या काळजाला पीळ बसला ....! आयुष्यभर ज्या माउलींनी पोरांसाठी घाणी घुणीत कामं केली , स्वतःची काही हौस केली नाही ती माउली आज तीन मुलं असून बेघर आणि अशी लाचार होऊन जगते आहे ....! मुलांच्या सा-या हौशी , शिक्षण आणि लग्न करून दिली त्याचा मोबदला काय तर हे असे बेघर आयुष्य ...?
स्वतःच्या कष्टाचंही तिला खायला देत नव्हते ... एक भार म्हणून तिला तिच्याच पैशाने पोसत होते. लेकीनं तरी पैसे घेऊन तिला आसरा दिला ती कमावती नव्हती पण मुलांनी असं वागावं...? मी हे सारं ऐकून सुन्न झाले होते  ...! माझ्याकडून काही मदत पाहिजे का  मावशी  ..... ? मी विचारले !  पोरी मला कुटं काम मिळल का। ..?  काम   ...? मी  प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहीले  .  काम म्हंजी  धूनी भांडी कचरा लादी काय पन करीन  .....!  मावशीकडे  मला पहावत नव्हते  ...!  हाडाची काड करून पोरांना वाढवलं आणि आज एवढे कष्टांनंतरही तिच्या वाटयाला कष्टच  होते ...!!

          आमच्या शेजारी एक वयोवृद्ध जोडपे रहाते  ! दोघेही पेंशनर  ...!  मूली लग्न होऊन  सासरी गेल्या आणि मुलगा सून  नोकरी निमित्त बाहेर  गावी  ...!  मूली जावई तरी अधूनमधून आईवडिलांना भेटायला विचापूस करायला येतात , राहतात पण मुलाने जणू त्यांचे श्राद्धच घातल्या सारखे नाव गांव टाकले आहे  ...!  ह्या आईवडिलांना आर्थिक गरज नाही पण एकुलता एक मुलगा पण  त्याच्या भावनिक आधाराची त्यांना गरज असतांना मात्र तो मुलगा कुठेच नाही  ...!  इकडून आईवडिलांनी फ़ोन केला तर उचलत सुद्धा नाही   ...! अश्यावेळी ह्या आईवडिलांच्या मनाची अवस्था काय होत असेल...?  आज आहेत तर उदया   नाहीत अश्या अवस्थेत डोळ्यामध्ये सतत मुलाला  पाहण्याची आस दाटुन असते  ....! त्यांच्याकडे पाहिले की डोळ्यांच्या जागी अश्रुंचा समुद्र दिसतो  .... भरतीला आलेला  ..... पण  ओसंडून वहायला  त्यांच्याकडे किनाराच नाही....!!


           मी  आजूबाजूला असेही  वयोवृद्ध पाहिलेत की मुंबईची घरे वन रूम किचन अथवा टू रूम किचन  मग त्या वाढत्या पीढ़ी मध्ये सर्वात वयो वृद्ध माणसांची अडचण होउ लागते  ...!  एक सम्पूर्ण रूम त्यानी अडवल्या सारखीच  ..... मग त्यांची रवानगी बिनदिक्कत चांगल्या सेवेच्या नावाखाली वृद्धाश्रमात केली जाते  .....!!


         असे  हे दुःख  आणि अशी ही माणसे पाहिली की वाटते हीच माणसे कधी काळी  डेरेदार वृक्ष होती   ...!   कष्टाने आपल्या लहान वेली फुलांना जपले मोठे केले सावली दिली   ...!  आज  त्यांना सावलीची आधाराची गरज पण ती  उघडयावर पडली होतीं   ....!! मृत्यु येत नाही म्हणून जगत राहायचे आणि हताश होता होता पुनः पुनः स्वतःला सावरायचे  हा जीवनाचा खेळ त्यांनाही नकोसा असतो   .....! आम्हाला हे आयुष्याचे दान नको  ... मृत्यु आला तर बरे असे  डोळ्यातले आधीच सुकलेले पाणी ओघळत कोरडे निश्वास सोडत नको देवराया अंत असा पाहू  .... असे विधात्याला विनवत असतात  ....!!  आणि हेच हात आपण त्यांना नमस्कार करायला वाकल्यावर   "शतायुषी"   हो  असा आशीर्वाद देताना   थरथरत  असतील का    ....?   त्यांचे मला ठावूक नाही पण असा आशीर्वाद मला कुणी दिला तर माझे मन मात्र  थरथरते   ....!!



                                                                                                                 *** समिधा 


        


         




प्रिय ......... काल रात्रभर जागीच होते....

 


प्रिय .........
काल रात्रभर जागीच होते....
तुला भेटून आल्यापासून काहीच
सुचत नव्हते....
आईनेही विचारले पण काहीच सांगता आले नाही....
किती कोवळी हळवी पहिली भेट पण ....मनावर मोरपीस फिरवत संपली....!!
देवळाच्या चौथ-यावर हातानं
रांगोळी काढत काढत किती अनं
काय बोलले ,ऐकलं काही आठवतंच नाही....!
तुझ्या विशाल अथांग डोळ्यात पहातांना मी त्यांत कधी हरवले
कळलंच नाही....!
ह्रदयाची धडधड आणि अंगाची
थरथर त्यामुळे मुखातून शब्दही
फुटत नव्हते...!!
आणि जेव्हा तू हातात हात घेतलास .....शरिरात अशी
वीज थरारली की अंगअंग तापून गेले
म्हणूनच कदाचीत कालपासून ताप भरलाय....!!
कुठेसे वाचले होते यालाच प्रेमज्वर म्हणतात म्हणे 😚
तुझ्या प्रेमाला होकार द्यावा की नाही तोच विचार करते आहे...!

प्रेम सोपे नसते .....हेच ऐकत आले आहे....पण मन मात्र नाही नाही म्हणता तुझ्याकडेच धाव घेतेय...!!
पण मला भिती वाटते...हा प्रेमसागर मी पार करू शकेन...?
प्रेमाचे नाते जुळायला प्रथम मनं एकत्र यावी लागतात .....मनाकडून मनाकडे जाणारी ओढ हीच खरी नात्याची गरज आहे......!!
शरीर हे माध्यम असते पण तेच जर नाते टिकवण्यासाठी साधन
म्हणून वापरले गेले तर तो केवळ बाजार असेल! लग्न हा समाज संमत शरीर सुखाचा मार्ग असला तरी त्या नात्यातही शरीरापेक्षा मनाचा विचारच आधी करावा मन हे सर्व सुखाचा सांगाती असतो मनातून फुललेले नाते कायम टिकते .....!!
प्रेमाला वासनेचा शाप असतो,पण जेव्हा त्या क्षणीक मोहाला लांघून जेव्हा तुम्ही फक्त प्रेम निवडता तेव्हा
ते खरं आत्म्याचं आत्म्याशी मिलन असतं...ते नातं शारीर नात्याला मागे टाकून आत्मीक नाते प्रस्थापीत
करते आणि नातं फुलत जातं अव्यक्तपणे अविरत आणि अनंतकाळासाठी.....!!
मग तिथे देह गळून पडतात अनं उरतात
फक्त आंतरीक संवेदना तीच मग
दोन जीवांना बांधून ठेवते...!
मग काय फरक पडतो
तू तिथे अनं मी इथे
अशी अवस्था होऊन जाते!!!
तू मला वेडी म्हणशील पण मी तर प्रेमाची अशीच मोहक सुगम कल्पना केली आहे ...!!
असं सात्वीक प्रेम अपुर्ण राहीले तरी त्याची गोडी मात्र निरंतर अवीट रहाते...!!
असं निर्मळ तरल प्रेम आयुष्याला
प्रत्येक वळणावर दिलासा देत रहातं...!
आयुष्यात आलेले खरं प्रेम हे अमृता सारखे असते ...जीवनात
कायम चैतन्य भरून ठेवते...!
मला त्याच चैतन्याचा ध्यास आहे!
प्रेमातून प्रेमाकडे जाणारा मार्ग म्हणजे सर्जनशीलता ...आणि जीवनात आनंदही सर्जनशिलताच निर्माण करते...! प्रेमानुभव घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक आत्मीक
सुखाची अनुभूती अनुभवता येते
प्रेम हे शाश्वत आहे ....! प्रेम सर्व सुखशांतीसंयमाचा सांगाती आहे
प्रेम म्हणजे शक्ती
या सर्व अनुभूतींचा आनंद मला देशील ...??

कदाचीत उद्या माझे उत्तर नाही असेल पण तरीही माझे तुझ्यावरील प्रेम कमी होत नाही आणि हो असेल तर संपणारही नाही....! पण....
उत्तर काहीही असो प्रेमानुभवाची जाणीव संवेदना आपल्यात निर्माण होणे हे सुद्धा
एक स्वर्गीय सुख आहे ते मला मिळाले , निमीत्त तू आहेस हे खरे असले तरी त्या जाणीवेतून
मिळालेला निर्गूण निराकार आनंद माझा फक्त माझा आहे!!
तुझ्याबरोबरचे ते काही क्षण हिंदोळ्यावर झोके घेत
पुन्हा पुन्हा जगते आहे.....अखंड अविरत निरंतर !!😄😄😄

*** तूझीच ..... 😚


                                                           
                                                             "समिधा "

                                                 

" दि डायरी ऑफ अँन फ्रँक "

     


     दि डायरी ऑफ अँन फ्रँक" हे पुस्तक हातात आले आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेवरूनच हे पुस्तक अतिशय सुंदर वाचनीय ठरणार याबाबत खात्रीचे पटली!हे पुस्तक जसजसे वाचत जावे तसतसे ते आपल्या भाव भावनांचा ताबा घ्यायला सुरूवात करते!! कित्येक ठिकाणी तर आपल्याच जीवनातील परिचीत रंग अनुभवाला येतात!१९४२ मध्ये दुस-या महायुद्धात जर्मनानी ज्यु लोकांचा जो अनन्वीत छळ मांडला होता त्या छळाला टाळण्यासाठी अँन व तिचे आई वडील व बहीण मार्गारेट एका डच कुटूंबाच्या मदतीने अज्ञातवासात रहात होते . या अज्ञातवासात त्यांच्याबरोबर श्री व सौ व्हेडँन व त्यांचा मुलगा पिटर हे कुटूंब व डसेल हा दंतवैद्य होता . 

      १९४२ जुलै ते १ऑगस्ट १९४४ पर्यतचा त्यांचा अज्ञातवासातील जीवनपट अँन ने ह्या तिच्या डायरीतून दिसतो. केवळ १४-१५ वर्षाची अँन पण ह्या तीन वर्षांत अँनच्या मनस्थीतीत होणारी स्थित्यंतरे वाचतांना जीवनाबद्दलची आसक्ती माणसाला जगायला शिकवते याचा प्रत्यय येत रहातो . प्रत्येक क्षणाला जर्मन गेस्टोपांच्या धाडीची टांगती तलवार घेऊन या माणसांचे जगणे म्हणजे मृत्यू जवळ होता पण तो दिसत नव्हता ... पण त्याची जाणीव सतत होती..यात दिलासा हाच सर्व आपली माणसे जवळ होती!

      या डायरीत अँनच्या मनातील वैचारीक आंदोलनाचे हेलकावे आपल्याही मनात नकळत येत रहातात..."किटी" नांव तीने आपल्या डायरीला दिले होते , किटीला ती आपल्या मनातलं सर्व सांगायची.या अज्ञातवासात कुटूंबातील ठरावीक चेह-याशिवाय तिला कुणी पहाताच येत नव्हते , अँन एक स्वप्नाळू निसर्गवेडी मुलगी पण बाहेरचा साधा प्रकाश ही दिला अनुभवता येत नव्हता . या तीन वर्षांत अँनमध्ये होत गेलेले बदल म्हणजे एक हट्टी मुली पासून एका समजुतदार, भावूक मुलगी हा तिच्या स्वभावातील बदल वाचण्यासारखा आहे ! आधी कुणाशीच पटवून न घेणारी पण नंतर मात्र बाहेरील ज्युंचे छळवणूकीचे दु:ख ऐकले की तिला आपण आपण खुप सुखी आहोत असं वाटण्याऐवजी जास्त दु:ख होई!

      याच दरम्यानच्या काळात पिटर सोबत तिचे जुळलेले नाजूक भावबंध अतिशय संयतपणे यात तिने मांडले आहेत , हे वाचणे खरंच खुप छान अनुभव आहे! 

     अँनचे कुटूंब पकडले जाते.... आणि त्यानंतरची त्यांचा छळछावणीतील अनुभव वाचल्यावर अँनचा असा अंत होणे आपल्याही डोळ्यांत पाणी आणते. तरीही एकदा हे पुस्तक वाचलेच पाहिजे, माणूस आणि त्याची स्वप्न या दरम्यान नियती/ परिस्थिती असते आणि तेव्हा होणारा संघर्ष म्हणजे जीवन! मग कुणाची त्यात आहुती पडते तर कुणी राखेतुनही पुन्हा नव्याने उभारी घेते!!! याचा अनुभव देणारे हे पुस्तक आहे....... !!

                                      

                                                                             "समिधा"
(त.टिप या पुस्तकाची मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे) 

"नामाचा महिमा....!"

 

मी आई होणार हे जेव्हापासून कळलं तेव्हापासूनच
होणारं बाळ मुलगा असेल तर .... हे नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर .... हेच नांव ठेवायचं पक्क केलं पण
पण जेव्हा नेमकी वेळ आली आणि बाळाचं माझ्या लेकीचं काय नांव ठेवावं हा मोठा गहन प्रश्न झाला, मी सुचवलेली नावं एकदमच आउटडेटेड आहेत असं सर्वॉचं म्हणनं पडलं... मग काय आत्या, काकी, मावश्या , ताई माई आई सा-यांची शोध मोहीम आणि
एक एक नांव सुचवणं सुरू झालं....शेवटी बाळाचं नांव ठेवायचा अलिखीत अधिकार आत्याचा असतो आणि माझ्या बाळाच्या आत्यानं तो अगदी आनंदाने बजावला! नांव ठेवलं शर्वरी .....! आणि योगायोगाने ते
आमच्या नवदुर्गा देवीचंही नांव असल्याचे कळल्याने शर्वरी नाव ठेवल्याचं सार्थक झाल्यासाखे वाटले...
बाळ आता ब-यापैकी मोठं झालं... नावांत काय आहे... ? या शेक्सपियरला पडलेल्या प्रश्नाची उकल मला हळू हळू होऊ लागली ....एक दिवस लेक म्हणते आई माझं नांव छानच आहे , पण अजून एखादं जरा मॉडर्न नांव का गं नाही ठेवलं....? आलिया, प्रिटी वगैरे ... !
" का तुझं नाव आवडत नाही का?" मी
आवडतं पण वर्गातल्या ब-याच मुलींची नावं शिना , रिया, किया अशी एकदम हटके आहेत ...! " शर्वरी
" त्यांना त्यांच्या नावाच्या मागील अर्थ माहित आहेत का गं ?" मी
" हं काय माहीत...!" शर्वरी
पण तुझ्या नावांत देवींचं नाव आहे आणि इंग्रजीत ट्वीलाईट म्हणतात... म्हणजे संधी प्रकाश जिथे निसर्गपिसारा त्याच्याकडच्या सा-या रंगांची उधळऩ करून प्रत्येकाच्या मनाला एक हूरहूर लावतो
किती सुंदर आणि पवित्र नांव आहे तुझं
यावर तिचं समाधान झाल्यासारखं वाटत तरी होतं..
पण या निमीत्ताने मला एक प्रसंग आठवला आमचे एक मराठीचे प्रोफेसर होते ,. त्यांच्या
घरी पण बाळ झालं आणि त्यांनी काहीतरी
खास नांव ठेवावं म्हणून आपल्या मुलीचं नांव "श्लेश्मा"
ठेवलं , वर्गात बर्फी वाटून सर्वांना कौतूकाने नांव सांगत होते, तेवढ्यात आमच्या प्रिन्सीपल मैडम पण आल्या,
सरांनी त्यांनाही बर्फी दिली... मैडम म्हणाल्या अभिनंदन ... मुलीचं नाव काय ठेवलंस, तु काय मराठी चा हुशार प्रोफेसर नाव अगदी छान ठेवलं असशीलच,
सरांनीही अगदी छाती फुलवून कौतूकाने "श्लेश्मा" असं
सांगितलं....ते नांव ऐकताच प्रिन्सीपल मैडम चा चेहरा
कसुनसा झाला, काय रे प्रमोद हे कसलं नांव ठेवलंस,
सरांचा चेहरा एकदम पडला , " का मैडम काय झालं ?
आधी तू तुझ्या मुलीचं नांव बदल ... तुला या नावाचा या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? त्यांच्या चेह-यावर चं हसू लपत नव्हते... आम्हीही सगळे कान टवकारून ऐकत होतो,. सरांनी आमच्याकडे चोरट्या नजरेनं पाहिलं न पाहिल्या सारखं केलं,
" अरे तू मराठीचा प्रोफेसर नां मग श्लेश्मा या शब्दाचा अर्थ तुला माहीत नसावा ?
सर आता आणखीणच गोंधळून त्यांच्याकडे पहात होते.... आणि आम्ही मुलं उत्सुकतेने....
आणि मग नावाचा अर्थ ऐकून आम्ही सगळ्यांनीच वर्षभराचा हसण्याचा कोटा संपवला...
सरांचं काय झालं ते सरच जाणोत...अर्थ होता....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
शेवटी मैडम नी "श्लेश्मा " नावाच्या अर्थाचा भोपळा फोडला ................
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
"शेंबूड"....!!!!!


                                               



                                                                  "समिधा"

" घर खरंच निर्जीव असते का ..?"

   
     
                                                            (माझे सासरचे  गोव्याचे घर)



      आपली मनं  जिवंत सजीव असतील तर निर्जीवतेतही चैतन्य येते  …!! निर्जीव वस्तुत आपल्या भावना गुंतने म्हणजे काय याचा प्रत्येकाने अनुभव घेतला असेलच !

     मध्ये एका स्रीचा  अनुभव वाचनात आला होता. जुने घर विकून ती नवीन घरात रहायला जाण्याचा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय पक्का झाला होता !  त्याच आनंदात ती नवीन घर कसे सजवायचे त्याला रंग कोणता द्यायचा फर्नीचर कसे  घ्यायचे ?  अनेक गोष्टींचा विचार सतत तिच्या मनात असायचा !  कुठे बाजारात गेली तरी नविन घरी आपण हे घ्यायचे का ते घ्यायचे का स्वतशीच तिची सल्ले घेणे देणे चालू असायचे , कुणा मैत्रीणीकडे गेली तरी तिच्या न घेतलेल्या नवीन घराबद्दलच बोलत रहायची। ..!  जुन्या राहत्या घराला ती  जणू विसरुनच गेली होती   ....!

     एक दिवस तिची एक मैत्रीण खुप दिवसांनी तिच्या  घरी आली  .   तिने घरात प्रवेश करताच म्हणाली "काय ग काय हा अवतार केला आहेस  ...?"  हिने लगेच आपल्या केसांवरुन हात फिरवत साडी वगैरे नीट केली  .  तर मैत्रीण हसून म्हणाली " अगं  तुझा नाही   .... तुझ्या घराचा म्हणते  मी  ."   ती स्री चपापलीच तिने आपल्याच घरातून सभोवर नजर फिरवली  ...  घरात वर कितीतरी ठिकाणी जाळी लोंबत होती , भिंतींचे पोपडे निघाले होते , रंग फीका पडला होता , कोप-या कोप-यात वस्तूंचा नुसता खच मांडून ठेवला होता ! आज ना उद्या हे घर बदलायचेच आहे या विचाराने तीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते ! मैत्रीण निघून गेली पण त्या स्रीच्या तिच्याच नजरेत एक लाजिरवाणी जाणीव ठेवून गेली !

     तिने लगेचच रंग काम करना-याला सांगून घराला रंग काम करुन घेतले , नको त्या  वस्तूंना भंगारात काढले ,  पडदे स्वच्छ धुउन खिडक्या दरवाज्याना लावले ,  घरचा एकदम काया पालट झाला जुंनेच घर पण पुन्हा एकदा जिवंत नवा श्वास घेऊन तरतरीत झाले !  तिचे तिलाच कितीतरी समाधान मिळाले ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

      माझ्या बाबांची नोकरी निमित्त बदली होत असे  . पण आम्हा मुलांच्या शिक्षणा साठी त्यांनी स्वत: प्रवास केला पण रहाते घर सोडले नाही !  पण काही वर्षांनी आम्हाला आमचे दहा वर्षे ज्या घरात राहिलो ते घर सोडणे आवश्यक होते !  नविन जागी, नवीन घरात , नविन माणसांत जाण्याची उत्सुकता मनात होतीच पण त्या पेक्षा जुने  घर आणि त्या भोवतीचं आमचे बालपण सारे इथेच राहणार होते !  घर आणि त्या भोवतीचं मोठ्ठ अंगण , अंगनातली झाडे  आणि झाडाला बांधलेला  झोपाळा  सारे कायमचे मागे पडणार होते , मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती , आज खुप काळ पुढे आलो आहोत पण ते बालपणीचे घर मनात कायमचे घर करुन राहिले आहे ! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

   माझ्या लग्नानंतर मला माझ्या जाऊबाईनी सांगितले आमचे घर पुनर्बांधणी साठी काढायचे ठरले तेंव्हा आमच्या  आदरणीय कै  . आई (सासुबाई  हा शब्द त्यांच्या साठी उच्चारणेही शक्य नाही )   त्यांनी अतिशय प्रेमाने पण निग्रहाने मुलांना सांगितले की , " तुम्हाला घराचा  बंगला करायचा करा  … महाल बांधायचा बांधा  … पण  या घराची एकही भींत तोडायची नाही ! या भिंतींची एक न एक विट तुमच्या स्वर्गवासी बाबांनी घमेल्याने स्वत:च्या डोक्यावर वाहीली आहे  … !!  त्यांच्या भावनेचा मुलांनी  सर्वानी आदर राखूनच घर बांधले …! मग सांगा घर खरंच निर्जीव असते का ..?

निर्जीव वस्तुत आपल्या चैतन्यमयी भावना गुंततात तेंव्हा  निर्जीव वस्तुला आपोआप जिवंत करतात  !!


(टिप : सदर लेख मा. श्री अविनाश दुधे यांच्या " घर खरंच निर्जीव असते का ..?"  या लेखामुळे प्रेरित आहे ! )


                                                                                                       " समिधा "

वडापाव...!

 
 

       एक म्हातारे तरतरीत आजोबा रोजच छान स्वच्छ पांढरा धोतर सदरा घालून ठाणे रेल्वे प्लैटफॉर्मवर असतात. ट्रेन येते प्रवासी चढतात...ट्रेन सुटायला काही अवधी असतो. तेवढ्यात ते आजोबा खिडकीजवळ येतात...हात पुढे  करून माय वो एक वडापाव वडापाव, एक  वडापाव वडापाव करीत याचना करतात..
समोरच एक फास्टफुडचे कैन्टीन असते मला त्यांची दया आली.. मी एक वडापाव १२रू. मिळतो तेवढे पैसे खिडकीतूनच  त्यांच्या हातावर ठेवले. माझ्या मनात आले भिकारी असूनही
किती टापटीप स्वच्छ आहेत. असं कसं? की घरी दुर्लक्षीत म्हातारं माणूस असेल?म्हणून
घरच्यांच्या नकळत इथे येऊन अशी भीक मागत असतील...? पण खायला न देण्याईतके
हाल करीत असतील? मला त्यांची अजूनच  दया आली! मी अगदी काकुळती नजरेने
त्यांच्याकडे पहात होते .... एवढ्यात मला  माझी मैत्रीण दिसली मी तिच्याकडे गेले
तिच्या शेजारी बसून बोलत असतांना .....माय वो वडापाव वडापाव ... वडापाव वडापाव...
मी खिडकीकडे पाहिले ..…... तेच आजोबा परत  दुस-या खिडकीजवळ येऊन तितक्याच आजर्वाने भीक मागत होते.... मी स्तब्धच!  माझी मैत्रीणीने लगेच पर्समध्ये हात घातला.
मी तिला थांबवलं ! काय आजोबा एकावेळी  किती वडे खाता पोट बिघडेल तुमचे ! आजोबांनी माझ्याकडे न कळून पाहिले ! आणि लगेचच पुढच्या खिडकीत तेच पुन्हा वडापाव वडापाव ......!!

      संध्याकाळी घरी परतांना बदलापूर  स्टेशनच्या जीन्यावर एक कळकट म्हातारी आजी....
माय वो तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत समोर हात पसरले...! मी दुर्लक्ष करीत
खाली उतरले समोरच वडापावची गाडी एक प्लेट वडापाव घेतले आणि पुन्हा जीना चढत
असतांना विचार आला ती आजी तिथे असू दे नाहीतर हे वडापाव मलाच खावे लागतील...
ती आजी तिथेच होती, तिच्या हातात वडापाव  दिला तीने दिलेले तोंडभरून आशिर्वाद घेऊन
जीना उतरले मागे वळून पाहिले ती पुन्हा तोंडाकडे हात नेऊन भुक लागली करत
हात पसरत होती ...! 

माणसाला नेमकी भुक कशाची असते अन्नाची  की पैशाची ....?

* समिधा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......