" आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय .....!!!

     

                                                  


          आज सावित्रीबाई फुलेंची १८३  जयंती  …!! आम्हा आया बायांची मूली बाळींची ज्ञानाई माउली …!
 प्रतिगामी म्हणवणा-या समाजाच्या शिव्या शाप झेलुन न डगमगता त्यांनी आपले कार्य चालू ठेवले नसते 
तर आज मी हा त्यांच्यावरील कृतज्ञतेचा लेख लिहु शकली नसती ! 

          मुलींना शिकवणे म्हणजे सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून  सनातन्यांनी विरोध केवळ विरोध केला नाही तर . अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. हा सनातन धर्मांधळा समाज किती क्रूर होऊ शकतो याचे आज आपण साक्षीदार आहोत  …! त्या सनातनी कर्मठ काळात महनीय सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेणाचे गोळे खाल्ले  आणि आज  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी "मलाला युसफजई "  कर्मठ जिहादी तालिबनियांच्या बंदुकीच्या गोळ्या झेलत आहे  .! 

       सावित्रीबाई फुले यांच्या  कार्याची माहिती आणि महती सर्वश्रुत आहे .  त्या काळात बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.त्यांच्या पुढ्यात समजाने सती  किंवा केशवपन हे दोन मार्ग ठेवले होते  .! जीवंतपणी  मरणयातनाना रोज सामारे जात जगणे नाहीतर कुणाच्या तरी भोगाचे बळी ठरुण गरोदर रहाणे 
 मग आत्महत्या नाहीतर भ्रूणहत्या   .... !  समाजाच्या या क्रुरतेला ब पडलेल्या बाळींना या माउलीने पदरात घेतले त्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली हे सर्व सनातनी कर्मठ समाजाच्या चालीरिती , परंपरा याच्या विरोधी जाऊन तेही स्त्रीने हे काम  करणे म्हणजे डोक्यावरून पाणी !  पण हे कार्य केले नसते तर मुलींच्या शिक्षणाची मुहर्त मेढ रोवली गेली नसती  .
           आज आम्ही तिच्या लेकी  लिहुवाचू शकतो   …! तिच्यामुळे आमच्या पंखात बऴ आले  …! आमच्या 
विचारांना , आमच्या अस्तित्वाला अर्थ आला आहे.  " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय , मी सडून होतो , पडून होतो , कुढून होतो  …! नाहीतर माझे आयुष्य एक पोतेरे झाले असते  .!  आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय …!!  ही जाणीव या माय ने आमच्यात जागवली   !! तिचे आम्ही ऋण कधीच फेडू शकणार नाही  .!
         आजही  सवित्रीच्या आत्म्याची नितांत गरज आहे   .!  आजही आम्ही नागवले जातो , पुरुषी  मानसिकतेपुढे  नमवले जातो    …!  आजही आम्हाला प्रश्नांची उत्तरे मागताना संघर्ष करवाच लागतो  …!
   तुला आमच्यातले विझलेले निखारे नकोत , हुंदके नकोत आसवांचे झरे नकोत , तुला हवेत  आमच्यातल्या पेटत्या मशाली , आन्यायाच्या छाताडावर  नाचना-या वीरांगनी  …!!  तुझ्या प्रेरणेने आम्ही उभ्या राहु  , आमच्या छाटलेल्या पंखाना नवे  बळ मिळवत राहु    ....!हीच आमची ज्ञानाई माउलीतुला श्रद्धांजलि   …!!

           

                                                                                    "समिधा"


          
    

                                                 


                   

       

सन २०१५ तुझे स्वागत आहे ....!!


 


                                                   सन २०१५ तुझे स्वागत आहे   ....!!

      सन २०१४ आज सरत चालले आहे…! तस तशी मनाची घालमेल, हुरहूर  वाढते आहे  …! प्रत्येक वर्षाप्रमाणे
यही वर्षी परमेश्वरचे नामस्मरण करून नूतन वर्षाचे स्वागत करणार  ।!   नव्या आशा , नवे संकल्प, नवी स्वप्न, नवी स्वत:ला इतरांना दिलेली वचने पूर्ततते साठी परमेश्वाराची कृपादृष्टि मागणार  …!!

      मी  सहज मागे  पहाते  … मी हर्मोनियम शिकणार होते  … ! कधीपासूनची माझीच ही इच्छा पण दरवेळी अडचणी वाकुल्या दाखवून पूर्ण होऊ देत नाहीत  …! यावर्षी पुनः संकल्प केला आहे  …! माझी मैत्रीण नंदिनी केंव्हाची तिची नविन पेंटिंग्स पाहायला बोलवते आहे  , अजुन मी पोहचले नाही. पुस्तकांचे कपाट , त्यातील पुस्तके रोज येता जाता हाक मारतात  । पण त्यांच्याकडे केवीलवाने पाहुन सरळ किचन कड़े धावावे लागते
नाहीतर लेकिच्या  चिमुकला आवाजात पुस्तकांचे आवाज विरुन जातात   …!

      तरीही नव्या आशांनी , नव्या स्वप्नांनी  नवीन वर्षाचे माझ्या मनाचे , माझ्या इच्छांचे कैलेंडर भरगच्च
भरले आहे  …!  नव्या नव्या संकल्पांच्या फुलांनी माझे इच्छेचे झाड़ डवरले आहे  !!   अवकाश फ़क्त येत्या
दिवसांमधली माझी सृजनात्मक ऊर्जा टिकण्याची   .... वाढण्याची....! ती  मला लाभो आणि माझ्या सर्व
सहोदरांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना  ....!

      नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा   …! २०१५  तुझे मन:पूर्वक स्वागत   आहे  …!!

       

"कागदी " पण .... "जिवंत माणसे " !!

       काल १५ ऑक्टोबर २०१४ मतदानाचा  दिवस   …!! सकाळी उठले खूपच अस्वस्थ होते  …! कारणही  तसेच होते  …! माझा नवरा सकाळीच मस्त दाढ़ी करून  कड़क इत्श्रीचे  कपडे घालून शीळ  घालित मतदानाला जायची तयारी करत होता  ! ( जसा काही मैत्रीणीला भेटायला निघाल्या सारखा )  आदल्या दिवसापासून मला तो चिडवत होता  …! सरकारी  माणसे असून घरात बसणार आणि आम्ही मतदानाचा हक्क बजावणार  ! नागरिकत्वाचा हक्काचा हक्क ! त्यामुळे मी  जरा घुश्शातच होते  ! एवढे वर्ष निवडणुकीचे कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान कधी करता आले नाही, पण निवडणुकीचा एक भाग म्हणून या प्रक्रियेत असल्याचे समाधान मला नक्कीच मिळायचे  … पण या वेळी नेमकी माझी इलेक्शन ड्यूटी लागलीच नाही आणि एवढे वर्ष लग्नानंतर मतदार यादीतील नाव सासरी स्थलांतरित केले नाही  ! त्यामुळे मतदार यादीत नावच नव्हते  मी  खूपच हिरमुसले होते  ! जाताना घरातले सर्वच मला मुद्दाम आवाज देऊन जात होते   …!  शेवटी न राहून आईकडे फ़ोन लावला   luck by chance घ्यायचे ठरवले   … ! " आई माझ्या नावाची इलेक्शन पावती आली आहे का गं ?"  मी   .  " हो  …! " आईचे ते शब्द ऐकून मी जोरात ओरडलेच "काय  खरंच ?"  हो का  गं ? येतेस का ?" मी पण केले नाही मतदान थांबते  तुझ्यासाठी  " आई   .  हो  ! निघते लगेच ! मी  . 

         पण एक प्रॉब्लम होता लग्नानंतर माझे नाव पत्ता सारेच बदलले होते  ! जुन्या नावाचा आयडी प्रूफ काहीच नव्हता शेवटी माझा प्यान  कार्ड शोधून काढले त्यामध्ये माझ्या नावा सोबत माझ्या बाबांचे नाव होते  … बस्स एव्हढेच ! पण तरीही मला मतदान करू देतील की नाही याची खात्री नव्हती  … ! पण इच्छाशक्ति जबरदस्त होती   ! दुपारची गाडी पकडून माहेरी गेले आणि मतदान केन्द्रावर जाऊन आईच्या मागे रांगेत उभी राहिले !  एक मतदार म्हणून मी ब-याच वर्षानी अनुभव  घेत होते   .!  मतदान केंद्रात प्रवेश केला आधी आईचा नंबर होता आईकडे फक्त एक पावती आणि रेशनकार्ड होते आणि मतदान अधिक-यांकडून अपेक्षित प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली  ! " अहो मैडम तुमचा फोटो  कुठे आहे ? सगळे आहे हो , पण मला वाटले यादीत  माझा फोटो असेल मी फार जुनी मतदार आहे हो, गेली चाळीस वर्षे इथे राहते !  नाही    … ! तसे चालत नाही ! चला तुम्ही बाजूला उभ्या रहा !"  आता माझा नंबर होता ! तुमचे यादीत नाव वेगळे आहे ,"  । "यादीत तुमचा फोटो नाही " काही आयडी प्रूफ आहे का ? " मी  माझ्याकडील प्यान कार्ड दाखवले ! " अहो पण यात तुमचे नाव वेगळे आहे ", " हो ते लग्नानंतरचे आहे "! पण त्या खाली पहा माझ्या वडिलांचे नाव आहे "!  तेव्हढ्यात पी आ रो  धावत आले  ! नाही मैडम नाही चालणार  …!  " का नाही चालणार ? तुम्हाला आवश्यक ते सारे प्रूफ आहेत की   । जूने  नाव आहे  … नविन नाव , फोटो आहे , आणि माझ्या बाबांचे नाव आहे   ! आणि सर्वांशी जुळणारी मी स्वत: इथे उभी आहे   !  साहेब ! मी तीच आहे   …!" आणि ही शेजारी उभी आहे ती माझी सख्खी आई आहे !! त्यांचा प्रश्न वेगळा आहे पण  तुमच्याकडे बँकेचे वगैरे पासबुक  काही ? कशाला। .? त्यातही हेच पाहाल ना ? मग ? शेवटी पि आ रों  .  ना मला मतदानाची परवानगी द्यावी लागली   ! मी विजयी थाटात बोटावर शाई लावून  । दिमाखात ईव्हीएम मशीनचे बटन दाबून  … बाहेर आले ! 

       बाहेर येऊन आईला पाहिले तर ती बाहेर नव्हतीच   । आत डोकावले तर ती पुनः पि आ रो ला विनंती करीत होती   ।!  बिच्चारी मतदान न करताच तशीच बाहेर आली   …!  आज मतदान यादीत तुमचे नांव असले आणि प्रत्यक्ष तुम्ही असलात तरी कागदी आयडी प्रूफला फार महत्व होते   …!! इथे ओरिजिनल पेक्षा तुमची झेरॉक्स कॉपी भाव खाऊन जाते  …! म्हणजे  कागदी निर्जीव माणूस जिवंत माणसामध्ये प्राण फुंकतो  आणि त्याला मतदान करता येते  … मी तोच /तीच आहे   … आणि अजूनही जिवंत आहे ! असे कागदी लिव्हिंग सर्टिफिकेट आणाल तरच पेंशनरांना पेंशन मिळते   …!!  म्हणजे आपण सारे कागदी जिवंत माणसे आहोत  …!!  स्वत: पेक्षा आपल्या अस्तिवाचे प्रूफ आसना-या कागदांना जपून ठेवा हां  .... !!

                                                                      

                                                                                                     "समिधा"  


" एकेकाचा एक दिवस ....!"


      ठाण्याला बदलापुर ट्रेनच्या लेडीज डब्यातून  त्या  काकू धडपडतच कश्याबश्या उतरल्या  , हातात दोन कापड़ी कश्याने तरी भरलेल्या पिशव्या  . उतरल्या त्याच गाडीतल्या गर्दीने भेदरलेल्या घाबरलेल्या   … उतरताच त्यांच्या लक्षात आले आपली पर्स खांद्याला नाही  । बिचा-या आणखीनच काव-या बाव-या झाल्या  लेडीज डब्या समोर इकडून तिकडे तीकडून इकडे  धावत " अगं बायांनो कुणीतरी माझी पर्स दया गं   आतमध्येच पडली ओ  !" त्यांची ती केविलवानी स्थिति पाहून प्लेटफार्म वरच्या आम्हा बायकांना त्यांची दया आली   .  माझ्या सह एकदोघी जणी त्यांच्या मदतीला धावलो पण तेव्हढ्यात ट्रेन चालू झाली   … इतक्यात  कुठल्या तरी डोअर मधून आवाज आला  "आहे आहे पर्स  मिळाली !" आणि  गाडीने वेग घेतला !! बिचा-या  काकू रडकुंडीला आल्या   .  तेव्हढ्यात मी पटकन हातातल्या मोबइलवर माझ्या मैत्रीणीचा नंबर फिरवला ती  त्याच गाडीतून प्रवास करीत होती ( अती गर्दीमुळे मी ती  गाड़ी सोडली होती ) नशीब तीने कॉल घेतला  !  " अगं गाडीत कोणती पर्स मिळाली का गं  ?"  तिने विचारुन तुला पुन्हा कॉल करते सांगितले   .  काही मिनिटातच  तिचा कॉल आला   " अगं मिळाली आहे   …  ती  बाई बदलापुरचीच आहे,  ती  म्हणाली  मी बदलापुरला  प्लॅटफॉर्मवर थांबते त्यांना बदलापुरला यायला सांग  …!!

     काकू तुम्हाला कुठे जायचे आहे ?  अगं मला इथेच एक   स्टेशन पुढे जायचे कळव्याला   …!! " काय  … !! मी आश्चर्याने विचारले    . अहो मग ह्या फ़ास्ट ट्रेन  मध्ये कशाला चढलात   .?  स्लो कुठलीही चालली  असती  .  काय  सांगू   ! मी  जास्त  काही  ट्रेनचा प्रवास करीत नाही  …!  गाडीत चढले तेंव्हा कळले ही गाडी कळव्याला थांबत नाही  … म्हणून ठाण्याला धडपडत कशीबशी उतरले   ! तरी माझा मुलगा सांगत होता आई दुपारच्या गाडीने जा गर्दी कमी असते  .  पण  ऐकले नाही  ! बाई बाई संध्याकाळी कसली ही गर्दी   …!  आता मी  काय  करू  ? माझा मुलगा मला ओरडेलच   ! पैसे पर्स सगळेच गेलं  !  तुमची पर्स मिळाली पण ती  बाई बदलापुरची आहे  .  ती  थांबणार आहे प्लॅटफॉर्मवर  !! काय करता  ?  हो हो मी बदलापुरला येते म्हणून सांग  तिला   !! पर्स मिळाली तर बरेच झाले  !!   पण काकू तुम्हाला परत गर्दीच्या गाडीतच चढ़ावे लागणार   …!  चढाल  ना   ?  ह्या गाडीला पण गर्दी असते  …!! हो गं हो चढायला तर लागेलच   …!!"

     तेव्हढ्यात  गाडी आलीच  … काकू आपल्या हातातल्या दोन्ही कापड़ी पिशव्या  पकडून आता गाड़ी पकडायचीच ह्या तयारीत उभ्या होत्याच  …!! गाडी आली ही तूफान गर्दी उतरली  … आणि तेव्हढीच तूफान गर्दी  डब्यात घुसण्यासाठी रेटारेटी करत जीवाच्या आकांताने गाडीत चढली  …!! मीही त्या गर्दीत धक्केबुक्के खात कोपर आडवे तिडवे करीत गर्दी कापत आत घुसले  … चढताना त्या काकूंचे काय झाले असेल  …? चढल्या  असतील का  …? हे विचार डोक्यात होतेच   …!  दारातून आत मी कशी तरी  आले। . मागुन  बायका धक्के देतच होत्या मी अजूनच आत लोटले गेले  … !  मी त्या काकुना मागे पुढे पाहण्याचा  प्रयत्न करीत होते  तेव्हढ्यात माझ्या मागून कुणाच्या तरी धक्क्याने त्याही आत लोटल्या गेल्या   …!  आत आल्या  पण हातात पिशव्या नव्हत्याच  ....  पिशव्यांऐवजी  पिशव्यांचे फक्त हॅन्डलच ( बंदच ) होते  ....!  काय हो काकू पिशव्या कुठे आहेत  …? अगं  बाई पिशव्या कुठे गेल्या  …?  मेल्या ह्या गर्दीत माझ्या पिशव्या पण गेल्या !! त्या , मी  इकडे तिकडे खाली शोधायला लागलो   … इतक्यात  दारातल्या बायका  ओरडायला लागल्या  " हे नारळ कुणाचे पडलेत ....? फुलं  हार  ....!!! कुणाचे आहे हे  … ?  काकू तश्याच दाराकडे धावल्या   … माझं  माझं  आहे ते  सगळं  !" बायकांनी  एक दोन  नारळ  उचलून दिले  । हार फुलांचा तर कचराच झाला होता  …!! तुटलेल्या पिशव्यापैकी एकच पिशवी होती तीही बायकांच्या पायांखाली येऊन पार मळुन गेली होती   . दुस-या पिशवीचा पत्ताच नव्हता  . बहुतेक ती बाहेरच फेकली गेली असेल  ! नारळ घेऊन काकू गर्दीतून कश्या बश्या परत आत आल्या …! "अगं  कळव्याला दिराकडे चालले होते  ।! आमची कुलदेवता असते त्यांच्याकडे  … आज तिची पूजा मांडली होती म्हणून दर्शनाला हे सारं घेऊन निघाले होते  …!!  काय गं  माझी ही दशा   …!  परत म्हणून मी ट्रेनला  यायची नाय बाबा   !! कशा  गं  पोरींनो तुम्ही रोज प्रवास करता  …??" ह्या  सा-या प्रकाराने  काकू वैतागल्या होत्या   ! पण त्यांच्याकडे दूसरा पर्याय पण नव्हता   .  मला मात्र त्यांची दयाही येत होती   . पण सा-या एकूणच प्रकाराने हसुही येत होते  ! गाडीत बसायला मिळालेच नाही ,  प्रत्येक स्टेशनला गर्दी कमी जास्त चढ़त होती , उतरत होती  !  इतक्यात माझ्या मोबइलची रिंग वाजली  ....  पहाते  … तर त्याच मैत्रीणीचा कॉल होता   … " काय गं  ? हो हो आम्ही दहा मिनिटांत पोहचूच आता   …!!  हा हां त्यांना  प्लेटफार्मवरच्या कैंटीन जवळ थांबायला सांग    !! ओके  । बाय  थैंक्स हां   !!" मी मोबइल  ठेवला  . काकू माझ्याकडेच काय झाले , प्रश्नार्थक   बघत होत्या  .   " काकू त्या बाई थांबल्यात प्लॅटफॉर्मवर  … काकूंच्या चेह-यावर एव्हढयावेळात पहिल्यांदाच हसु दिसले   ! चला एव्हढया खटपटी -लटपटी ,त्रासा नंतर निदान आपली पर्स तरी आपल्याला परत मिळतीय ह्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते  .

         गाडी स्टेशनमध्ये आली    ! उतरताना पण ही एव्हढी  गर्दी   .  काकूंना मी  माझ्या पुढे घेतले आणि लोटालोटित  आम्ही खाली प्लॅटफॉर्मवर उतरलो   !  एवढ्या गर्दीची काकूंना सवय नव्हती  .  मी त्यांना थोडावेळ  तिथल्याच एका बाकड्यावर बसवले  . कैंटीन मिड्ल डब्या जवळ होती  !   प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी झाली  ।! काकूंना मी हात धरून  उठवले   । कश्याबश्या  त्या उठल्या  .  आम्ही कैंटीन जवळ पोहचलो  माझी मैत्रीण व ती बाई तिथेच उभ्या होत्या  …! मी  तसे  काकूंना सांगितले  आणि काकू जरा उत्सहानेच  जोरात चालू लागल्या।   त्या त्यांची पर्स घेण्यासाठी उत्साहित  झाल्या होत्या  .  आम्ही त्यांच्या जवळ पोहचलो   , ती  बाई अगदी आनंदाने हसली   । कुणाला तरी त्याची वस्तू  त्याला सुपुर्द करणार असल्याचा अभिमान तिच्या डोळ्यांत दिसत होता .  काकूंनी तिचे आभार मानले  , " प्रेमाने तिचे नाव विचारले ";चारु !" तीनेही प्रेमानेच नाव सांगितले "तुमच्यामुळे माझी पर्स मिळाली ! नाहीतर आजकाल कोण कुणासाठी एवढे करते ?" मीही माझ्या मैत्रीणीचे आभार मानले! थैंक्स हं  !"  आभार साभार प्रदर्शन कार्यक्रम झाला    … आणि चारु बाईंनी  त्यांच्या पर्स मधून एक मध्यम आकाराची पर्स (पाउच)  बाहेर काढला  . आणि काकूंना देऊ लागल्या  … पण  .... काकू त्याच्याकडे पहातच  राहिल्या  …… !  कारण ती पर्स  काकूंची  नव्हतीच    ....!!

        काकूंच्या चेह-याकडे पहावत नव्हते   … जीवाचा एव्हढा आटापिटा करून इथपर्यंत आले    … पण काय  झाले ?  " माझा मुलगा आता मला किती ओरडेल  ..., जीवाचे हाल तर केलेच   … पूजा गेली   … पर्स गेली   … पैसे गेले  … पिशव्या गेल्या  … हारफूलें   … काही  काही हाती आले नाही   …!! "काकू तुम्हाला आता कुठे जायचे आहे ?" माझ्या प्रश्नाने त्या भानावर आल्या !  " सांताक्रुज   माझ्या घरी …!"  आता मला घेरी यायची बाकी होती    .  काकू पुनः तीन तासाचा प्रवास करणार होत्या  ....!!!!


                                                                                 
                                                                                                  " समिधा  "

      


जाणीव .....!!!


      नोकरी निमित्त माझा रोजचाच ट्रेन चा प्रवास  …!! मुंबईच्या लोकल ट्रेन्सला कधीही जा खच्चून भरून वहात असतात  …!!  बायकांसाठी तर मोजून तीन डबे   …!!  आणि फर्स्ट क्लासचे डबे  म्हणजे  "एक किचन"  नाव  पण अगदी परफेक्ट दिले आहे  … ! या डब्यात मोजून तेरा सीट असतात  …!! त्यामध्ये चौथी सीट नो अलाउड   …! अश्या ह्या किचन मध्ये एका वेळी आम्ही पन्नास बायका घुसतो  ....!!  एकमेकींच्या पायावर पाय देत  !! खांद्याला खांदा भिडवून शाब्दिक चकमकी घडवून  … प्रवासाचा महामेरु सर करीत घराचा गड गाठत असतो   …!!

      त्यादिवशी  नेहमी प्रमाणे ट्रेनला गर्दी होतीच  … पण जरा जास्तच होती  …!!   ट्रेनमध्ये चढण्याचे दोन प्रयत्न फेल गेले  …!  पण मला  काही डब्यात घुसता आले नाही  !! माझ्यासारखी डब्यात  चढण्याची धडपड   रिटायरमेंटला आलेल्या  अजुन दोन काकू करीत होत्या   .  शेवटी त्यातील एक जण  म्हणाली " आज काय मेलं  आपल्याला गाडीत चढ़ता येईल असे वाटत नाही …!" लेडीज फर्स्ट क्लास ला लागूनच "अपंगांचा " डबा असतो  … ! तुलनेने त्यामध्ये एव्हढी गर्दी नसते    . लगेचच दूस-या काकू म्हणल्याच चला गं आपण त्याच डब्यात चढू   … मी  मात्र काकू काकू  करायला लागले   …  कारण  त्यांचं ठीक होतं   । त्या दोघी वयस्कर होत्या   … पण मी  मेली तरुण तुर्क त्यांच्या बरोबर अपंगांच्या डब्यात चढायचे म्हणजे फारच गिल्टी वाटत होते  …!! गिल्टी वाटण्यापेक्षा भितीच  जास्त …!! पण शेवटी मनाचा हिय्या करून एक काकू पुढे आणि दुस-या माझ्या मागे  . अश्या एकदाच्या "त्या " डब्यात चढ़लो  … पण आम्ही जेमतेम आत घुसु शकलो होतो  … माझ्या मागच्या काकू मागून बोंबलायला लागल्या " अगं जरा पुढे सरका मी  दाराशी लटकतेय   … ! पण माझ्या पुढच्या काकू  का कोण जाणे पण पुढे काही सरकतच नव्हत्या  …!!  " काय  झाले काकू पुढे सरका  नं  …" अगं  कशी सरकू   ......... माझ्या पुढे खाली एकजण बसला आहे  … !"   खाली बसला आहे  ……… ?"  माझी सटकलीच  … मागे त्या  काकू लटकतायत  आणि हा पठ्या खाली बसलाय  … !! काय माणुसकी बिणुसकी आहे की नाही  …? " ओ भाऊ जरा आत सरको   … दिखता नही लोक लटक रहे  है   …!  थोड़ी बी माणुसकी नहीं है   … !!  माझ्या  मराठी मिश्त्रित हिंदीला त्याने जोरात धक्का दिला " ओ मॅडम मै  "अपंग " हूँ  दिखता नहीं  …? मला  काय बोलावे सुचलेच नाही  त्या  गर्दीच्या भाऊगर्दीत मी अपंगांच्या डब्यात घुसून हुशा-या मारत होते  …!!! मागच्या काकूंचा आवाज आपोआपच बंद झाला   …!! 
  
     कुठले तरी स्टेशन आले ( गर्दीत बाहेरचे काहीच समजत नव्हते ) गर्दी थोड़ी कमी झाली आम्ही लगेचच आत सरकलो   …  तेव्हढ्यात डब्यातली माझ्या जवळची एक बाई  माझ्याकडे पायपासून  वरपर्यंत  पाहत होती   । तिच्या नजरेला मी वाचवत होते  । तेव्हढ्यात  " तुमचं काय मोडलय  …? "  तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नाला काय  उत्तर दयावं   ?  काही  नाही मोडलं  … काही मोडु नये  नं म्हणून इथं आलो  ! माझ्या बरोबरच्या काकू आधीच तत्परतेने आपला डावा हात खाली वर करून माझ्या हातात रॉड घातला आहे  बरं …!! विचारणारी बाई पण धड़ धाकटच  दिसत होती  । मी पण लगेच सूडाने विचारले तुमचे काय मोडलय   …?  तिने तिच्या जवळ बसलेल्या तिच्या अपंग मुलाकडे बोट दाखवले  … ! ह्याला पाय नाहीत  …!!  मी  पुन्हा एकदा  पार ख़जिल  खल्लास  !!

     मी सुन्न दारात  उभी राहीले  । डब्यात  सभोवर नजर फिरवली  .  प्रत्येक सीट वर कुणीतरी आंधळे बसले होते, कुणाला पाय नव्हते , तर कुणाला हात नव्हते   !!  कुणाच्या डोक्यावर केस नव्हते ते  फडकी गुंडाळलेली कॅन्सर  पेशंट होते   …!!  ते माणसाच्या जीवनाचे वास्तव चित्र होते  …!! त्या तश्या अवस्थेत प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत  होता  …!!   डबाभर ते दुःख असले तरी मला ते जगातील दुःखाची जाणीव करून गेले  …!! माझ्या पूर्णत्वाची जाणीव करून देणारा तो  अपंगाचा डबा त्याने मला माझा आरसा दाखवला   !! छोट्या छोट्या अडचणींना दुःख समजून कवटाळायचे आणि मिळालेल्या ह्या पूर्णत्वाला नकारुन सुखी जीवनापासून स्वतःला दूर ठेवायचे  …!! मला हे सत्य माहित नव्हते असे  नाही  पण आज मला सत्याची प्रखर जाणीव झाली  …!!  



     माझे स्टेशन आले मी  उतरले   आणि  खटकन माझी चप्पल तुटली मी  तीला तिथेच सोडले  आणि माझ्या मोकळ्या पायांनी चालायला लागले न लाजता  …!!


                                                                                           "  समिधा  "


आणि समजाने तिला फुलनदेवीचा अवतार समजले तरी बेहत्तर ……!!!


      बदाउन मध्ये दलित मुलींवर झालेला बलात्कार आणि त्यांची निघृन केलेली हत्या ही क्रुरतेची परिसीमा आहे  …! स्त्रियांच्या कर्तृत्वाच आलेख जेवढा वाढत आहे। … त्यांच्यावरील आत्याचारात जास्तीतजास्त वाढ होत  आहे  ....!!!  तिच्या योनिशुचितेचा अपमान म्हणजेच स्त्रीयांचे दमन  !!!  ह्या  सामजिक पुरुषी आहंकाराचा , मानसिकतेचा बिमोड करायचा असेल तर दुर्गा माता होऊन स्त्रियांच्या हातात शस्र येण्यास वेळ लागणार नाही …!! आणि समाजाने तिला फुलनदेवीचा अवतार समजले तरी बेहत्तर   ……!!!


                                                                                                                           "समिधा"





                                                                                                               

हीच हिन्दू धर्माची अस्मिता ....?

     "पुण्यात एका मुस्लिम युवकाची हिन्दू राष्ट्र सेना  कार्यकर्त्यांकडून हत्या झाली " का ? तर अमेरिकेतून कुणीतरी फेस बुक वर आपल्या पूज्य , आदरणीय महापुरुषांचा अपमान केला !  म्हणून भारतातील एका निरपराध मुस्लिमाची ह्त्या करून ह्या अपमानाची भरपाई झाली  …? अतिशय निंदनीय आणि   माणुसकीला काळीमा फासणारे  हे कृत्य आहे  ....! हीच हिन्दू धर्माची अस्मिता    ....?


                                                                                                         "समिधा" 

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......