तो तिला बोलत होता … तो बोलत नव्हता तर तिला अनुकूचीदार , धारदार शब्दांनी सोलत होता ! तिच्या असण्या नसण्याची लक्तरे सर्वांसमोर फेडत होता …! तिच्या शरीरावर घाव असतीलच पण आता ते मला आणि माझ्या सारख्या इतरांना दिसत नव्हते ! पण आता तिच्या मनावरचे घाव मला तरी बसत होते ! तिच्या भावनांच्या या उड़ना-या चिंधड्या आणि त्यामधून तिची आर्त वेदना आणि आक्रोश माझ्या आणि माझ्या सारख्या तिथे हज़र सर्वच जणींच्या मनापर्यंत पोहचत असलेच …!!!
ती स्त्री दिवसभर लोकल ट्रैन मध्ये भेळ विकून आपल्या तोड़मोड़क्या संसाराला हातभार लावणारी व कष्ट करून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणा साठी तिच्या भविष्या साठी धडपडणारी मायमाउली होती! आणि तो पुरूष तिचा मालक/नवरा होता (परंपरेने नव-याला मालक बोलविले जाणे म्हणजे नवरा बायको यांच्यातील स्तर इथेच नोकर मालक म्हणून अधोरेखित केला जातो ) दिवसभर कष्ट करणा-या आपल्या हक्काच्या बायकोकडे दारु पार्टी साठी तो पैसे मागत होता आणि ती ते द्यायला तयार नव्हती ! त्याला नकार म्हणजे … नव-याला नकार मग मालकाच्या आवेशात तिला भर लोकांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत होता !
(घरातील शाररिक आणि मानसिक त्रास याची कल्पनाच नको )
"अगं ये x x x x x ने मला पैसे दे !
मारुन टाक तुझ्या पोरीला ....!
कायला तिला उरावर घेऊन राहलियस … ?
रांडेचे तुझ्या x x x x x "
असं आणि बरच काही ....!
त्याला नाही पण तिला आजूबाजूचं भान होतं . तो जेवढ्या रागाने आणि त्वेषाने तिच्या कानाजवळ ओरडत खेकसत शिव्या देत होता तितक्याच संयमाने आणि शांतपणे ती त्याला थोपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती ! आणि मी , आजूबाजूचे आम्ही काय करत होतो ?
मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत स्त्रियांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नाही का …? अश्यावेळी पोलिस ख़ास करून लेडीज पोलिस आसपास असणे किती गरजेचे आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली ! दूसरे काही नाही पण त्याला शाब्दिक दम देऊन तत्पुरता तिचा होणारा मानसिक छळ तरी थांबवता आला असता ! म्हणून मी पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक फेरी मारून आले पण मला साधे रेल्वे पोलिसही दिसले नाहीत ! हा मी सभ्यपणे कायद्यात राहून केलेला एक "निष्फळ" प्रयत्न !
मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत वाटत होते त्याच्या कॉलरला पकडून चांगले लाथाबुक्क्यानी , कानाखाली दोन चार लगावून बदडून काढावे ! हा मी केलेला असभ्यपणे कायदा मोडून तिला मदत करण्याचा "निष्क्रिय" प्रयत्न !
मला त्याचा भयंकर राग आला होता ! मी माझ्या आजूबाजूच्या बायका पोरींना विचारले आपणच जरा त्याला "समजवावे" का ? पण कोणी "तो दारुड्या आहे आपल्यालाही काहीतरी बोलायचा , त्यांच्या भांडणात पडणे नकोच! बरे दिसेल का? उगीच लोकांना शोभा ! त्यांना कसली आली आहे अब्रू आपल्याला ते शोभत नाही ! त्यांचे ते पाहुन घेतील ! आणि मग हळूहळू एक एक जण तिथून काढता पाय घेऊ लागल्या !
आता मला भयंकर राग आला होता ! माझा, माझ्या आजूबाजूच्या सुसंस्कृत म्हणवणा-या लोकांचा, आमच्या असंवेदनशील संस्कारांचा , आमच्या सोकोल्ड सभ्यपणाचा आणि यातून येणा-या वांझोटया भितीचा आणि "बृहन्नडा" हतबलतेचा ……!!!
" समिधा "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा