" घन दूर अंधाराचे …!! "


 
 मन मनास सांगे 
नको आकारु 
रूप दुर्दैवाचे   .......

     मन मनास सांगे 
     शोध आधार 
     रूप सौजन्याचे  ……  

मन मनास सांगे 
नको घाबरु 
जग लढणा-यांचे   ……

     मन मनास सांगे 
     कर प्रकाश 
     घन दूर अंधाराचे   …!!
     घन दूर अंधाराचे   …!!
 
माझ्या सर्व सुहृदय मित्र मैत्रिणींना  दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपावलीच्या नव  तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत  ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना  उमलू दे  ....!!

                                                                                       " समिधा "


" हतबल …!"


 
     तो तिला बोलत होता    …  तो बोलत नव्हता तर तिला अनुकूचीदार , धारदार शब्दांनी सोलत होता ! तिच्या असण्या नसण्याची लक्तरे सर्वांसमोर फेडत होता   …! तिच्या शरीरावर  घाव असतीलच पण आता ते मला आणि माझ्या सारख्या इतरांना दिसत नव्हते    !  पण आता तिच्या मनावरचे घाव मला तरी  बसत होते ! तिच्या भावनांच्या या उड़ना-या चिंधड्या आणि त्यामधून तिची आर्त वेदना  आणि आक्रोश माझ्या आणि माझ्या सारख्या तिथे हज़र सर्वच जणींच्या मनापर्यंत पोहचत असलेच   …!!!

     ती स्त्री दिवसभर लोकल ट्रैन मध्ये भेळ विकून आपल्या तोड़मोड़क्या संसाराला हातभार लावणारी व  कष्ट करून आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणा साठी तिच्या भविष्या साठी धडपडणारी मायमाउली होती! आणि तो पुरूष तिचा मालक/नवरा होता (परंपरेने  नव-याला मालक बोलविले जाणे म्हणजे नवरा बायको यांच्यातील  स्तर इथेच नोकर मालक  म्हणून अधोरेखित केला जातो ) दिवसभर कष्ट करणा-या आपल्या हक्काच्या बायकोकडे दारु पार्टी साठी तो पैसे मागत होता आणि ती ते द्यायला तयार नव्हती ! त्याला नकार  म्हणजे  … नव-याला नकार मग मालकाच्या आवेशात तिला भर लोकांमध्ये शिव्यांची लाखोली वाहत होता !
(घरातील  शाररिक आणि मानसिक त्रास याची कल्पनाच नको )

"अगं  ये x x x x x ने  मला पैसे दे !
मारुन टाक तुझ्या पोरीला   ....!
कायला तिला उरावर घेऊन राहलियस … ?
रांडेचे तुझ्या x x x x x "
असं आणि बरच काही    ....!

      त्याला नाही पण तिला आजूबाजूचं भान होतं  . तो जेवढ्या रागाने आणि त्वेषाने तिच्या कानाजवळ ओरडत खेकसत शिव्या देत होता तितक्याच संयमाने आणि शांतपणे ती त्याला थोपविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती !  आणि मी , आजूबाजूचे आम्ही काय करत होतो ?

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  अश्या परिस्थितीत स्त्रियांना मदत करणारी कोणतीच यंत्रणा नाही का   …? अश्यावेळी पोलिस ख़ास करून लेडीज पोलिस आसपास असणे किती गरजेचे आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली ! दूसरे काही नाही पण त्याला शाब्दिक दम देऊन तत्पुरता तिचा होणारा मानसिक छळ तरी थांबवता आला असता ! म्हणून मी पूर्ण प्लॅटफॉर्मवर एक फेरी मारून आले पण मला साधे  रेल्वे  पोलिसही दिसले नाहीत ! हा मी सभ्यपणे  कायद्यात राहून केलेला एक "निष्फळ" प्रयत्न !

    मला त्याचा भयंकर राग आला होता ! अश्या परिस्थितीत वाटत होते त्याच्या कॉलरला पकडून चांगले लाथाबुक्क्यानी , कानाखाली दोन चार लगावून बदडून काढावे !  हा मी केलेला  असभ्यपणे कायदा मोडून तिला मदत करण्याचा "निष्क्रिय" प्रयत्न !

     मला त्याचा भयंकर राग आला होता !  मी माझ्या आजूबाजूच्या बायका पोरींना विचारले आपणच जरा त्याला "समजवावे"  का ?  पण कोणी "तो दारुड्या आहे आपल्यालाही काहीतरी बोलायचा , त्यांच्या भांडणात पडणे नकोच! बरे दिसेल का? उगीच लोकांना शोभा !  त्यांना कसली आली आहे अब्रू आपल्याला ते शोभत नाही ! त्यांचे ते पाहुन घेतील ! आणि मग हळूहळू एक एक जण तिथून काढता पाय घेऊ लागल्या !

     आता मला भयंकर राग आला होता !  माझा, माझ्या आजूबाजूच्या सुसंस्कृत म्हणवणा-या लोकांचा, आमच्या असंवेदनशील  संस्कारांचा , आमच्या सोकोल्ड सभ्यपणाचा  आणि यातून येणा-या वांझोटया भितीचा आणि  "बृहन्नडा"  हतबलतेचा   ……!!!

                            " समिधा "





      



एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

 

     किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे   …!  जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही   … आपला आक्रोश  … आपले आक्रंदन  दिसत नाही   ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो   …!  मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा  !  गेलेल्याचे दुःख असते  की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या  ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो  …!!  असा "तो" आपला मित्र असतो आप्त असतो  आणि कधी कधी कुणीच नसतो   … पण काही क्षण जरी आपण "त्या" व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ....! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच  येते ....!!


           अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत  एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी
ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते,  आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच   ....  तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली मुलगी होती , तीचेच ते कलेक्शन होते! मोठ्या आवडीने तिने मला खुप सारे ड्रेसेस दाखविले, एक दोन मी  घेतलेही पण घरी येऊन पाहिले तर एक छोटा तर एक मोठा होत  होता  . पुन्हा मी  तिच्या दुकानात गेले  , तीनेही न वैतागता न रागवता अगदी हसत मला पुन्हा ड्रेसेस हसतमुखाने आणि तेव्हढ्याच उत्साहाने दाखवले   … पुन्हा घरी येऊन तेच छोटा मोठा  ! आता जर मी  तिच्या कड़े पुन्हा ड्रेसेस बदलायला गेले तर ती  नक्कीच वैतागणार म्हणून मी जरा कचरतच तिच्या दुकानात गेले पण तिच्या चेह-यावरचे तेच हसमुख भाव ! मग मात्र मला तिच्या बद्दल अतीव प्रेमच वाटले !

       थोड्या आस्थेनेच तिच्या दुकानाची तिची माहिती विचारली   … आज तिच्या दुकानात तिचा नवरा आणि तिची दीड वर्षाची छोटुली मुलगी पण होती  !  तिने सांगितले तिचे वडील लहानपणीच वारल्याने आईसोबत लहानपणापासूनच काहिनाकाही कष्ट करायची आवड होती ! लग्न झाल्यावरही हा उत्साह कमी नाही  झाला।    दुकानात तिने ड्रेसेस सोबत इमिटेशन ज्वेलरी पण विकायला ठेवली होती.   घर मुलगी संसार  सारे सारे सांभाळून ती स्वतः सर्व खरेदी करण्यासाठी दादर मुंबई ठाणे इथे प्रवास करायची   …! ताई मला अजुन खुप वाढवायचे आहे माझे दूकान   । ही तर अजुन सुरवात आहे ! मीहि तिच्या मेहनीति स्वभावावर खुश झाले , तिचा तो उत्साह पाहुन तिचे कौतुक वाटले। . आणि नको असताना अजुन दोन अधिकचे ड्रेसेस तिच्याकडून खरेदी केले ! आणि माझ्या मैत्रीनींनाही तिच्या दुकानाची माहिती देईन हाँ असं तिला सांगितले तर तीला आनंदही झाला ! हसत हसत मी तिचा निरोप घेतला  !

       नंतर मी एकदोन  दिवस येता जाता तिला कधी लहानग्या मूली सोबत गि-हांइकाना हसतमुखाने ड्रेसेस दाखवताना पाहत होते   …!  पण एक दिवस  दूकान बंद दिसले मला वाटले आज सोमवार म्हणून दूकान बंद असेल ,  पण नंतर दोन दिवस दूकान बंदच होते !  माझे मलाच वाटले गेली असेल गावी, किंवा नव-या बरोबर मुलीसोबत फिरायला  … ! पण सलग एक आठवडा दूकान बंदच होते , खरंतर मला असंच दुकानातून ज्वेलरी पहायची होती  .   पण दूकान बंदच ! तिला भेटून एक आठवडा उलटला होता  .

      त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी लेकिला शाळेच्या बसवर सोडायला मी घराच्या गेटपाशी उभी होते
माझ्या सोबत अजुन एक दोन जणी आपल्या मुलांना घेऊन उभ्या असतात  .  बस आली मुले गेली की आम्ही काही मिनिटे बोलत असू  … आणि बोलता बोलता माझी मैत्रीण दीपिका बोलली  अगं आमच्या बिल्डिंग मधली एकजण गेली ना अचानक   … ! मी विचारलं कोण गं ?  अगं तीच जिचे ते नवीनच कोप-यावरचे ड्रेसचे
दूकान होते !  ती अशी बोलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! डोळ्यापुढे अक्षरशा अंधेरी आली ! कसेतरी तोंडातून शब्द आले , अगं काय सांगतेस काय ? गेल्या आठवडयात तर मी तिच्याकडून चार ड्रेसेस घेतले ! किती गोड हसमुख मेहनती होती  गं  ती !  काय  झालं काय गं तिला !  हार्ट अटॅक  आला असं कळलं ! काय ? एवढ्या लहान वयात ? खरच माणसाचं काही काही खरं नाही  !

       मला प्रचंड मोठा धक्का होता तो !  तसे काही नाते नव्हते तिच्याशी पण तरीही तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांसोबत नकळत  तिच्या स्वप्नांशी माझे नाते जोडले गेले होते !  तिच्या हसमुख मेहनती स्वप्नाळु कष्टांसोबत मनाचे भावबंध जोडून बसले होते !  तिच्या त्या छोटुल्या लेकिसोबतच्या तिच्यानंतर तिचं कसं होणार ह्या काळजीसोबत मीही काळजीत पडले होते !  किती किती नात्यांनी मी जोडले गेले !  तिची स्वप्न इथेच ठेवून गेली ती माझ्या जवळ   … त्यांचांच आक्रोश माझ्या मनात उमटत होता पण तो तिच्या पर्यन्त कसा जावा  … ?

        जे अवेळी जातात त्यांच्या स्वप्नांचे काय करावे ?  त्यांनी योजून ठेवलेल्या प्लॅन्सचे  काय करावे? त्यांनी त्यांच्या जीवन डायरीची काही पाने आगाऊच लिहिली असतील त्या पानांचे काय करावे?  चटका बसतो जिव्हारी अश्या "अवेळी" गेलेल्यांच्या सरणावरील ज्वाळांचा   .... आपण कितीही दुरुन त्यांना पहात असलो तरी ! मग त्यांच्या सोबतच्या  अद्वैतांचे काय होते  ?  ते जळतात आयुष्यभर काळ  कितीही लोटला तरी   … मध्ये मध्ये आठवत राहते त्यांची सोबत  … ! कितीही हळुवार असली तरी चटका देणारीच   ....!

      किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!



                                                                                         "  समिधा "

     



         

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......