" माझे बाईपण "...................




कवयित्री पदमा गोळे यांची एक कविता वाचनात आली....! "आजच्या इतकी आईपणाची भीती वाटली नव्हती. अगतिकतेची खंत कधीच दाटली नव्हती" ....!  कवितेतील या काही ओळी वाचताना आजही  स्री आणि तिची भीती यांचा संदर्भ बदललेला नाही ....! दिल्लीतील आणि त्यानंतर सातत्याने स्रीयांवरील अत्याचारांच्या घटना आपण वाचतोच आहोत.  ज्या स्रीयांवर  हे अमानुष अत्याचार झालेत त्यांच्या दुख:वेदनांशी आपण कल्पनेतही भिडू शकत नाही....! आपला सामाज स्रीयांबाबत एव्हढा असंदेनशील कसा राहू शकतो?
अनादी -अनंत काळापासून कधी द्रौपदीच्या रुपात विटंबना तर कधी सीतेच्या  रुपात स्री पवित्र्याच्या सत्वपरीक्षेचे आव्हान अश्या    विकृत समाजपुरुषाच्या   मानसिकतेचे स्वरूप पहायला मिळते ....! आणि आजही हि विकृत समाजपुरुषाची  मानसिकता बदलेली नाही ..!
स्री पुरुष विषमता हा एक व्यापक विषमतेच्या वास्तवा मधला सर्वव्यापी घटक आहे. यापलीकडे विषमता पेरणारे घटक आहेतच धर्म , जात शिक्षण पैसा असे अनेकविध घटक आहेत. आणि प्रत्येक घटकातहि आपल्या परीने आहे रे नाही रे , थोडे वरचे  आणि थोडे खालचे स्तर आहेत या प्रत्येक स्तरावर स्रीयाना संघर्ष करावाच लागतो....! स्री  दुर्बल आहे...! असे फक्त समाजपुरुष ओरडतो ...! आजची स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषी मक्तेदारी असलेल्याही प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे...!  परंतु तरीही स्रियांचा त्यांच्या मतांचा , त्यांच्या विचारांचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा किती विचार केला जातो....? 
आजच्या २१ व्या शतकातही स्रीयांपुढे  स्रीभ्रून हत्या ,हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरात- बाहेर मानसिक,शाररीक अत्याचार या आणि अश्या अनेक समस्या उभ्या आहेत...! ग्रामीण भागातील स्री तर आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहे . कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने ती कष्ट करते पण तरीही तिला आर्थिक स्वातंत्र्य नाही...! निर्णय स्वातंत्र्य नाही...! तिला तिच्या मुलभूत गरजापासून वंचित ठेवले जाते..!

हि परिस्थिती बदलणे गरजेचे आहे....! या साठी सनातन भारतीय संस्कृतीचे पालक सांगतील मग स्रियांनी ७ च्या आत घरात यावे...! पूर्ण  कपडे घालावेत..! फक्त चूल आणि मुल सांभाळावे......! तर हे सर्व थोतांड आहे.....! बलात्कार करताना ती लहान मुलगी आहे कि म्हातारी स्री  आहे  हे बघितले  जाते का ...? तिचे वय ...तिचे कपडे या नगण्य गोष्टी आहेत..!  तिचे फक्त बाईपण बघितले  जाते ...! तेंव्हा  कुठे जाते तुमचे संस्कृती..? 
 मुळात संपूर्ण समाज्पुरुशाची विकृत मानसिकताच बदलली पाहिजे. स्रीला माणूस म्हणून वागवा ..! बरोबरीने तिचा सन्मान करा ...! कारण स्री -पुरुष हे समाजाची केवळ दोन चाके नाहीत , तर निसर्गाची दोन सूत्र आहेत ज्यावर समस्त मनुष्यजातीचे अस्तित्व अवलंबून आहे...!  आणि याचे भान समाजपुरुषाला येणे आवश्यक आहे...! विकृत समाजापेक्षा सुसंस्कृत समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी पाश्च्चात्य संस्कृतीच्या नावाने जे अंधानुकरण चालले आहे या
बाबत ओरड होते.. हे काहींअंशी खरे असले तरी आपली भारतीय संस्कृतीचे डोळस भान ठेवून पुरुषी मानसिकता आणि त्याहूनही विकृत मानसिकता बदलली पाहिजे....! 

माझं  बाईपण बघा ...
पण 
मी जोजविते विश्वाला ....
माझं आईपणही बघा ....!!!! 


                                               "समिधा" 

" गुंतता ह्रदय हे " ......!!

    
                                     


      काही माणसांना आपण आपल्या आयुष्यात खुप महत्व देतो   . त्यावेळी आपण हे असे का करतो   ….? ही माणसे आपण आपली मानतो , कारण आपल्याला स्वत:ला कुठेतरी हे जाणवत असते , कधी कधी त्याचा प्रत्ययही घडलेला असतो की आपल्या आयुष्यात त्याना जेवढे महत्व आहे तेवढेच मलाही त्या व्यक्तिच्या आयुष्यात महत्व आहे   . मग आपल्यातील हे आपलेपण त्या व्यक्तीला अनेक त-हानि पटवून देतो  अगदी प्रामाणिकपणे  .  सुरवातीला आपली ह्या प्रमानिकतेबाबत त्या व्यक्तिकडूनही तितकाच आणि तसाच प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा नसतेच ….! पण ही अवस्था फार काळ नाही टिकत   …!

     कारण ह्या आपलेपणाचा हळुहळु आपल्या नकळत एक मानसिक गुंता होंत  जातो  . हळुहळु आपण आपलेपण त्या व्यक्तीवर ठसविण्याच्या प्रयत्नात लादण्याचा प्रयत्न होंत जातो  .  सुरवातीला त्या व्यक्तिकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळतो अगदी तेव्हढ़य़ाच उर्मितुन आणि ऒढीतुन पण जसे "अति परिचयात अवदन्या"  अश्या तर्हेने या अति आपुलकीने , ओढाळ  मनाला कुठेतरी शह बसतो आणि ती  ओढ हळुहळु खूंटत जाते   ! हे खूंटणे त्यावेळी एकाचवेळी दोघांच्याही किंवा एकावेळी एकाच्याच लक्षात येते त्यावेळी त्यांच्यातील आपलेपण कुठेतरी थरथरते आणि मग ते तुटक तुटक होते व् नंतर कदाचित ते कायमचे लोप पावते  …!!

    असे घडण्याची दोन  कारणे असू शकतात एक म्हणजे हे आपलेपण  नेमक्या त्या क्षणी पालवी धरते ज्याक्षणी कोरड्या मनाला कुठूनतरी ओलावा लाभतो  ….!  पण पुढे हीच पालवी म्रुगजळाने  आभासाने फुललेली असते असे लक्षात येते  ….!

     आणि दुसरे म्हणजे ज्यावेळि प्रेम-जिव्हाळा , आपुलकी आपला हक्क सांगू लागते त्यावेळी जबाबदारिचा  विसर पडलेला असतो  .   त्याचवेळी दोनही व्यक्तिमधील अहं सदैव जागा असेल तर तो या आपुलकिच्या हक्काने आधिक जोपासला जातो  आणि त्यामुळे तो अहं अधिक दाट , गडद , गहिरा , ठळक  होउन ज्या आपुलकीने त्याना जवळ आणलेले असते त्याचाच  नाश करत  जाते  …!! आणि गैरसमजाना अधिक पेव फूटते  ….!  असा हा गुंता /तेढा  वाढत गेला की मग नात्याचा आपोआपच अंत होतो   ….!  


                                                                                               " समिधा "












                                                                                                                        



     


"वळण"

                                        
     इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं  .  जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण  आले की वळावेही लागते  . अश्यावेळी मागचं विसरून  समोरच्याला जाऊन भिड़ावं लागतं   …. !  आता माणसांमध्ये स्त्री -पुरुष ह्या नैसर्गीक भेदांमध्येहीं एक आगळेपण दिसते  . वळनांची ची ज्यावेळी आपण चर्चा करतो  त्यावेळि ही चर्चा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा विचार करता अधिक चिंतनीय तर होइलच पण खात्रीने करमणुकिचेही ठरेल  .   

     स्त्रीच्या जीवनात अनेक वळनं  येतात  .  पहिलेच वळण तिच्या जन्माबरोबरच येते  . तिच्या आईच्या जीवनात  .  (ती ही एक स्त्रीच) कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे जिची सर्वाना  जबाबदारी उचलायची आहे … ! आणि मुलाचा जन्म म्हणजे जो सर्वांची जबाबदारी उचलतो (वंशाचा दिवा )   …! अश्या  सामाजिक धारणेत तिचा जन्म होतो आणि तिच्या पूर्ण जीवन प्रवासाची वळनं तिथेच निश्चत होतात  …!

     आई , बहिण, मुलगी अश्या नात्यांच्या गुंत्यातिल वळनांवर चालताना तिला त्यांच्याच प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार उकार घडवावा लागतो  .  (तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठीही तिला पिता,बंधू  अथवा पति यां सारख्या पुरुष सत्ताक सामाजिक रचनेच्या चौकटीत  राहून घडवावे लागते ) . 

     सर्वात मोठे वळण तिचे लग्न होते तेंव्हा   …. माहेरी या स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व तयार झालेले असते  . ज्यावर तेथील माणूस प्रक्रुतिंचे प्रभाव पडलेले असतात  आणि लग्नानंतर पूर्णत: वेगळ्या वातावरणात. निराळ्या माणूसप्रक्रुतिच्या माणसामध्ये तिला स्वत:ला सामावून घेणे आवश्यक असते.  या सामावन्यात प्रयत्न एकतर्फी ठरतात तर  कधी अपुरे पडतात आणि मग अश्यावेळि संघर्ष निर्माण होउ शकतात   . आणि हे सर्वात धोकादायक वळण आहे.  या वळणावर तिला आघात होउ शकतो, अनेक ठेचा लागू शकतात  …!

     ज्या वळनावर तिला स्वत:च्या स्वत्वाला विसरून दुस-याना आपले मानलेले असते  अश्याच्या सोबतीने (जिथे फक्त विश्वासबळावर ती स्वत:ला सोपवित असते /झोकुन देते   ….!) आपल्या जिवनाचे पुढचे वळण कोणतेही असेल तरी आपण आता एकटे  नाही या विश्वासावर ती निर्धास्तपणे जगण्यास सीध्द होते. … !!

     अश्या ह्या पदोपदी वळण घेत चालना-या स्त्रीला समाज नेहमीच मुलीला चांगलं "वळण"   असावं असा आग्रह धरीत असतो  …! (समाजपुरूषाला अजुन कोणत्या चांगल्या वळनांची आवश्यकता वाटते …?) स्त्रीकडून समाजाला खुप अपेक्षा आहेत  … ! पण सर्व अपेक्षाच्या केंद्र स्थानी फक्त पुरुषसत्ताक प्रवृतिला पोषक असे तिचे वळन  पाहिजे.!

     अशी वळणा वळणाच्या गुंत्यात अडकलेली स्त्री म्हणुनच एक आगळे  -वेगळे    सदैव दुभंगलेले  व्यक्तिमत्व  आहे असे वाटते  ….! 


                                                                                                                "समिधा" 
     
     

     

आजचा समाज कुठे चालला आहे …. ?

    

                            


     आजचा समाज कुठे चालला आहे  …. ? जुन्या पारंपारिक नितिमुल्याना चिकटून बसलेला समाज आजच्या यंत्रयुगात माणसाच्या मनात संघर्षच निर्माण करीत आहे  .  माणसाचा माणसावरचा विश्वास उडत चालला आहे  . भोगवादाच्या आणि वासनेच्या नशेचं प्रमाण वाढत आहे   . जुनी नैतिक मूल्य जोपासली जात नाहीत  .  पैशाला अवास्तव महत्व आल्यानं कुठल्याही नितिमुल्यांची चाड  न बाळगता तो मिळवण्याच्या मागे माणूस धावत आहे  . भावभावनांनाही बाजारी स्वरुप   येत आहे की काय असं वाटत आहे  .  

     यंत्राला मन  नसतं , अगदी संगनकावरही हुकूमत चालते ती माणसाची  .  जो पर्यन्त माणसाच्या मनाची जागा यंत्र घेऊ शकत नाही तोपर्यन्त माणसाची मन:शक्ति सर्वश्रेष्ठच राहणार  .   म्हणुनच मला वाटते की माणसाच्या प्रेमभावना , वात्सल्यभावना आणि स्नेह्भावना जपनं आवश्यक आहे  .  या भावनांचे  बंध  गुंफणारी  नवी मूल्य आणि त्यावर आधारलेला समाज व कुटुंबव्यवस्था निर्माण करणे अधिक निकोपपणाचे ठरेल  असे वाटते  …! 


                                                                                                                   " समिधा "
     
     
     

"जन्मलेल्या प्रत्येकाला " ................!!



एखाद्याचा जन्म दुस-या जन्माशी बांधलेला असतो तेंव्हा आईच्या उदरातुन जुळि भावंड जन्माला येतात …!
पुढ़ेही ती मानसिक रित्या अशिच जुळलेलि रहातात की नाही हा प्रश्न क़ाळाकडेच सोपविणे ईष्ट  …!

    काल घरी परतताना गाडीतिल चर्चेतुन समजले की ठाण्याला कामाला जाणा-या  एका २० -२१  वर्षाचा मुलगा गाडीतून वाकल्यामुळे बाहेरचा खांब लागुन पडला …. आणि त्याच वेळी लेडिज डब्यात बसलेल्या त्याच्या मैत्रीणीने गाडीतून उडी मारली …! (कदाचित ते एकमेकाना पहाण्याचा प्रयत्न करीत असावेत )आणि अश्याप्रकारे एक प्रेमकहानी संपली  …!! तिचा शेवट असा व्हावा  …?

     कालच मी प्रीया तेंडूकरांचे "जन्मलेल्या प्रत्येकाला " या पुस्तकातील "एकेका कथेचे एकेक शेवट " ही ललित लघुकथा वाचली  . प्रत्येक माणूस हा स्वतंत्र कथाबिज घेउन जन्माला येतो त्याचे आयुष्य एक त्याच्याही नकळत ओघात ओघवती घडत जाणारी कथा असते   …. ! तो त्याच्या कथेचि सुरुवात त्याच्या मर्जिप्रमाणे करतो … !(खरे तर या बाबत मतमतांतरे असू शकतात )पण त्या कथेचा शेवट अपेक्षेपेक्षा वेगळाच घडतो  ….!

   काल मी एकलेल्या घटनेतील प्रेमी  …. त्यांची ती "कथा "   'तो'  आणि 'ती ' दोघानी जन्म एकावेळि घेतला नाही  .  पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात त्यांच्या मर्जिने झाली असेल , त्यांचे असणे एकमेकांसाठीच होते  . त्यानी कितीतरी एकत्र स्वप्ने पहिली असतील , त्यांचा जन्म विभक्त होता पण त्यांचे  जुळणे  मात्र "मृत्युच्या बिन्दुला येउन मिळाले होते  ….!

    त्या दोघांच्या  मिलनाची  " सम"  त्यांच्या एकाचवेळीच्या मृत्युपाशी  लागली  ….! ती "एकवेळ " त्यांच्या मिलनाची "मात्रा " होती …!!  त्यांचे जीवनगाणे /युगुलगाणे या पहिल्या मात्रेपाशीच संपावे  का  ….? त्यांच्या प्रेमकहाणीचा हाच शेवट  ….?  गाण्याच्या समेलाच दोघां गाना-यानी उडून जावे …? आणि हा त्यांच्या कथेचा शेवट  त्यानाही ठाउक नव्हता …!

     जन्मलेल्या प्रत्येकालाच आपल्या कथेचा शेवट  माहीत नसतो …! जन्मलेल्या प्रत्येकासाठी स्वत:चेच जीवन एक  "गूढ़ "कथा असते  …… ! आणि आपण जगत असतो म्हणजे काय करीत  असतो  …? आपल्याच जीवनाचे "गूढ़" उकलत असतो   …! पण या बाबत आपण अनभिद्न्य असतो  …. ! आणि या अद्न्यानातच सुख असते  ! आणि म्हाणुनच जीवन "सुन्दर आहे "  ….!!!!


                                                                                                                    "समिधा"


बलात्कार …बलात्कारी ......!!!!!

                                               
     काहीही करून आज आपण हा सिनेमा पूर्ण  पाहायचाच  …! गेल्या पंधरा वर्षात आपण  हा सिनेमा पूर्ण पाहूच  शकत नाही  …. का …?  पण आज  पाहायचाच असा मनाचा निश्चय  करुनच टिव्ही समोर  बसले 
घरात अर्थात माझ्याशिवाय कुणी नव्हते …. ! सर्व दारं खिडक्या नीट बंद केल्या आणि मनाचा हिय्या करून 
मी टिव्ही समोर  सिनेमा पहायला लागले  …… !

     आणि  जस जसा सिनेमा पूढे सरकत होता, आणि तो विशिष्ट सीन येण्याची वेळ जवळ  येत होती तस तसा माझा माझ्या मनावरिल आतापर्यंतचा ठेवलेला   ताबा सुटायला लागला  … माझ्या छातीत धडधड सुरु झाली  …कितीही कंट्रोल करीत असतांनाही डोक्याला झिनझिन्या येउ लागल्या होत्या  . आणि तो सीन सुरु झाल्या बरोबर आपोआपच माझे अवसान गळाले  …आणि मी रिमोट्चा ऑफ बटन दाबले  …. !!मी पुन्हा एकदा "तो" सिनेमा अर्धवट सोडला होता  …!!!

     "तो " सिनेमा म्हणजे   "बैंडिट क्वीन "  जो मी आजही पूर्ण पाहू शकत नाही  "फूलनदेवी " या एक सर्वसामान्य मुलीचा  "बैंडिट क्वीन"दरोडेखोर होण्या पर्यन्तचा जीवन प्रवास हा या चित्रपटाचा विषय आहे .आजही  या चित्रपटातील  "तो " बलात्काराचा सीन पहायची हिम्मत माझ्या जवळ नाही  …!  पण हल्ली तर रोज सकाळी उठल्या पासून एक नाही तर अनेक  "स्त्री" वरील लैंगीक अत्याचाराच्या बातम्या ऐकुन मनाच्या 
संवेदना भेदरून जात आहेत .आज एक स्त्री म्हणून विचार करताना स्त्रीच्या शरीराची चाललेली  वीटम्बना कशाचा परिपाक आहे ….?

     एका बाजुला एकविसाव्या शतकाच्याआगमनाचे ढोल वाजवीत नव्या संगणक आणि युगाच्या पहाटेची वाट पहात आहोत ….!  विलक्षण प्रगत  अश्या तंत्रयुगाच्या आगमनाची वाट पहात आहोत  .   स्त्रीया  आज शिकत आहेत  …. शिकवित आहेत  …!भारता सारख्या अतिपारंपारिक देशात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन क्षेत्रं पादांक्रात  करीत आहेत,  पण तरीही …पण तरीही प्रश्न उरतोच  …"आजची आधुनिक स्त्री खरंच "माणूस " म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली आहे  …?

     अजुनही स्त्रीचे "वस्तुपण" संपलेले नाही  . तिच्यावरील अन्याय अत्याचाराचा तपशील बदललाय   … !पण त्यामागचे पुरुषीमन तेच आहे .  कदाचित अधिक विकृत झालेलं  आहे …. !म्हणुनच  समाजातील पुरुषी विचारसरणी , मानसिकता महाभारत कालिनच आहे  . आजच्या दिल्ली , मुंबई मधील  बलात्काराच्या घटना कशाच्या द्योतक आहेत  … ! महाभारतात द्रौपदी , ययाति पुत्री माधवी यांच्यावरील पुरुषी वर्चस्वाच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत  ….! आणि आजही कितीतरी द्रौपदी, माधवी  यांचे शील हरन  केले जात आहे . स्त्रीमनाचा आणि तिच्या भोवतीच्या वास्तवाचा कुणीतरी , कधीतरी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे का  …. ….? जेंव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार करून तिच्या शिलाचा , तिच्या कौमार्याचा भंग केला जातो तिची ती पीडा कोण लक्षात घेते  ….? स्त्रीवर असा घृणास्पद अत्याचार करणा-या पुरुषाची मानसिकता ,  ह्या क्रौर्य मनाचा पोत पुरुष मनच ओळखू शकतात  …! कारण स्त्रीची शील हरना नंतरची नव्हे ती  शील हरना  पूर्वीची मानसिकता मी  तो "बैंडिट क्वीन " सिनेमा पहात असताना अनुभवली आहे  …! तर प्रत्यक्ष असा घृणास्पद प्रसंग ज्या दुर्दैवी स्त्रीवर गुदरला  आहे  …. तिच्या मनाची पीड़ा कशी असेल  …???  स्त्रीच्या कौमर्याचे लचके तोड़नारे ही गिधाड़ेच आहेत ….!   स्त्रीच्या मनाची आणि देहाची विटंबना  करणारे हे नरभक्षक आहेत।  समाजात एकुणच समाज व्यवस्थेत स्त्रीचे चारित्र्यहनन करणे या इतकी सोपी गोष्ट नाही।       "स्त्री म्हणजे पैर की जुती "  किंवा   स्त्रीचे शील म्हणजे काचेचे भांडे  …. एकदा तडकले की परत सांधता येत नाही …"  हे या समाज व्यवस्थेतील स्त्रीयांबाबतीतिल अलिखित नियम आहेत  ….!  याच पुरुषी मानसिकतेतुन स्त्रीला नेहमीच दुबळ समजुन दाबलं आहे  … !  "भोगाची वस्तु " हेच तिचं मूल्य आणि समाजव्यवस्थेतील स्थान होउ पहात आहे  …!   आजकाल स्त्रीयांवरिल  अत्याचाराच्या घटनांमधे  ल क्ष णिय वाढ झाली आहे  .  परत एकदा स्त्री घराच्या उंबरठयाआड़ लपून राहिली  तरच ती  " सुरक्षित " अशी स्थिति या विकृत समाजाने स्त्रीवर आणली आहे  … !

  " स्त्री"आदिम काळा पासून स्वत:च्या केवळ "स्व" साठी  नाही तर स्वत:च्या मन्युष्यवत  अस्तित्वासाठी लढत  आहे।   तिने आजही हक्क ओरबाडून मिळवले नाहीत तर  स्त्रीत्वाच्या सर्व परिसीमा भेदुन पुरुषी सामर्थ्याच्या सर्व शक्यतां  पर्यन्त स्वत:ला सिध्द करून  मिळवले आहेत. ….! मग "संभोग " हाही तिचा स्वत:चा हक्क का असू नये…? तिथेच मात्र तिला घरी दारी हक्क नाकारला जातो . माणुसपणाच्या पुढाकारान  कधीच का घडू नये  संभोग … !  या विकृत समाजाकडून तोच तिचा हक्क ओरबाडून घेतला जात आहे ….!! तिचे लचके तोडले जात आहेत ….!  

     खरे तर  या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्त्री-पुरुषांना ख-या अर्थाने समानतेच्या जगात आणण्यासाठी आवश्यक ती मानसिकता , शैक्षणिक    आणि आर्थिक पात्रता प्राप्तच होउ नये  अश्या  दिशेने सगळा प्रवास चाललेला दिसतो . त्यामुळे कायदे ,  आयोग असोत की प्राचीन काळापासून चालत आलेली स्त्री गौरवाची सुभाषिते असोत, यांचा कितीही वर्षाव झाला तरी स्त्रीची परिस्थिति प्रत्यक्षात किती बदलली  …?बदलते?

     पण संघर्ष अटळ आहे.! आणि तरीही नदी,धरती ,आग, हवा ही सर्व स्त्री रूपं आहेत ,  शतकानुशतकांच मौन मोडून जेंव्हा ती  आक्रोश करतील तेंव्हा "भोगण" या शब्दाचा आविष्कार काय असतो त्याचा प्रत्यय सा-या जगाला येइल आणि त्याच दिवशी जगाला कळेल पुरुष प्रधान व्यवस्थेत काय अर्थ असतो "स्त्री" असण्याचा आणि का व्याकुळ होते  मन जेंव्हा तिचं माणूसपण  अमानुषपणे नाकारलं जातं आणि केवळ शरीर भोगलं  जातं  …! आणि त्याच दिवशी रुजतिल समाजात तिच्या विषयीच्या आस्था , दृढ़ता , प्रीती ,  आशा  , निष्ठा , प्रार्थना ,  वेदना  आणि  उदारता  …!!!! कारण …….

                                                                   "स्त्रीच   आई  आहे ,
                                                                     सावित्री  आहे ,
                                                                     राधा आहे,
                                                                    आणि दुर्गाही  आहे  ……!!!!!

                     

                                                                                                                         " समिधा"


                                         

          न भूतो न भविष्यति अशी रुपयाची घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांपासून अगदी लक्ष्मीपुत्रांना अर्थात उद्योग धंदे व्यापा-यानाही सोसावा लागतो आहे  . 

          सर्वांना ओबामा यांची भारत भेट आठवत असेल त्यावेळी अमेरिके पुढे आर्थिक मंदी , बेरोजगारी हे प्राधान्याने मोठे प्रश्न होते  . त्यावेळी अतिशय मुत्सद्दीपने बराक ओबामा यांनी भारतातील उद्योगपतिंना , कारखानदाराना आर्थिक गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आणि आपल्या सरकारला "भारत" हां भविष्यात जगातील आर्थिक महासत्ता होणारा  देश आहे " अशी गाजराची  वाजवून चांगलेच झुलवुन आपली झोळी भरून गेले आणि आज "कुठे भारत आणि कुठे गेली आर्थिक महासत्ता "

         भारताने आंतरराष्ट्रीय खुली बजारपेठेचे धोरण स्वीकारुन सर्वानाचा भारताची बाजारपेठ उपलब्ध करून 
दिली  .   आज भारतात भारतीय बनावाटिच्या वस्तुंनी बाजारपेठ काबिज केलि आहे. भारतातील प्रत्येक सन समारंभातिल वस्तु चीनी आणि त्याचा पहिला ग्राहक भारतातील फेरीवाले विक्रेते। … आणि अशी आर्थिक घूसखोरी कुणी   ? आणि कशी रोखायाची ? 
     आपला भारत देश हा "शेतिप्रधान देश आहे" अशी फक्त घोषणा  राहिली आहे आज आपण लसून, बटाटा , गहू पाकिस्तान आणि  आयत करतो  ….! 
     
. संगणक , मोबाइल ,  टी . व्ही  . यामुले जग जवळ आले आहे। …. पण त्याबरोबर आपल्यातील "भौतिक गोष्टींची" व्यसनाधीनता वाढते आहे   . आणि त्याचाह फायदा अमेरिके सारखी तंत्रदद्यानी राष्ट्र घेत आहेत  . 

           भारताची पर्यटन व्यवस्था पार कोलमडली आहे. आज उच्च मध्यमवर्गीय लोकही (श्रीमंत लोक तर परदेशातच खरेदी करतात) परदेशात फिरायला जायला लागले आहेत  . भारतीयाना सोन्यामधील गुंतवनुक अधिक सुरक्षित वाटते।  आणि भारतीय एकुणच संस्कृतीचा  तर ते सोने हे भारतीयांचे केवल गुंतउकिचे साधन नाही तर ते  एक अविभाज्य अंग आहे. पश्चिमी देशांत असे महत्व सोन्याला नाही। पण त्यामूले सोन्याची आयात वाढली आहे  . पण त्यासाठी सरकारने गोठवलेले सोने बाहर काढने गरजेचे आहे।   
"भ्रष्टाचार"  हा तर  कलिचा प्रश्न आहे. कोट्टयवधीचा काळा पैसा भारताबाहेर आहे. तो भारतात येणे आवश्यक आहे. "ग्लोबलायझेशन " वाढले पण त्याबरोबरच रुपयाचे "डिमोशन" मात्र झाले। 

          रुपयाची किंमत सुधारायची असेल तर परत एकदा "गंधिजिनी" दिलेला "स्वदेशिचा नारा " भारती यांमधे  जागवन्याची   गरज आहेच … ! जस्तिजास्त गुंतवनूक भारतीय उत्पादनात करून भारताला आधुनिक तंत्रदद्यानाची जोड़ देने आवश्यक आहे। . 

     आपल्यातील राष्ट्रीय अस्मिता जागवा   …! स्वदेशी वापरा रुपया वाचवा  …. ! 

         

     

""".......पाऊस ....... """"






     
          पाऊस गारांचा ,पाऊस सरींचा ,रस्ते गटार तूंबविणारा , दोन  चार इमारती पाडणारा ,गाड्या घोड्या अडविणारा .... माणसांना सळो की पळो करूंन  सोडणारा .... असा हा वात्रट ... धांद्रट  पाऊस ......!

          पाऊस ..कसा तर अगदी पावसा सारखा चिखलात लोळणारा ... नदित डुम्बणारा  , सागराच्या लाटांवर स्वार होणारा ....वादळा बरोबर भरकटनारा , पानांतुन निथळणारा ....कौलांवरुन ओघळणारा .... फुला पानांवर रमणारा ...... अगदी गटार .. नाल्यात तुंबणारा ... असा अनेक विविधांगी .... बरसना-या पावसाचा पहिला स्पर्श मातीला होतो .... आणि सा-यांना पाउस मातीचा सुंगंध म्हणजे त्याच्या चैतन्यमय अस्तित्वाची चाहुल देतं ...! तो सुगंध किती घ्यावा आणि किती नाही .... सारे भानच सूटते ....!

           पाउस अनुभवता येतो .... अगदी आपला आपणच .....! पावसाबरोबर कोसळताहि येतं ....! बरसायचे असेल त्याच्या सोबत तर मनातले कढ डोळ्यात दाटले की ... कोंडलेल्या आसवांना पावसाबरोबर बरसु द्यायचे ... म्हणजे मनही आकाशा सारखे हलकं फुलकं निरभ्र  होतं ....! गुंतलेल्या ... अडकलेल्या मनाला मोकळे सोडावे , पावसाच्या धारांत जाऊ द्यावे ... अगदी कागदी होडी प्रमाणे ... मनाबरोबर आपणही बाहेर जावे ...!        पाऊसाचे थेंब अंगावर शहारे आणतात ..... ओलेचींब झाल्यावर अंगाअंगात भिनतात ......!

         पाऊस जोड़ीनही अनुभवता येतो ......! पावसाच्या प्रत्येक सरीनं देहातील कण न कण पेटून उठतो ...! अंग लपेटून ...संकोचुन आडोश्याला उभे रहातो .....! पण त्या अदवैताला फक्त पाउसच साक्षी असतो…. !!!!
पाउसासारखं जगता आले पाहिजे .. बेधुंद ..... नवजीवनाला प्रतिक्षण जिवंत ठेवत ......!

          पावसाचे शांत ...शीतल  निश्चल ...अस्तिव ... कधी कधी आपल्याला मुळासकट  हादरविते…. ! पावसाचे रौद्र रूप माणसाच्या अस्तिवाला मिटवू शकतो …!


"पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"

                                                                             किंवा

           "नको नको रे पावसा ... असा धिंगाणा तू घालू ....! 
        झोपड़ी चंद्रमौळी  माझी बघ जाईल वाहून 
       धनी गेला दूर देशी .... त्याला येउ दे परतून "


      असा हवा हवासा वाटणारा पाउस असा बदलला  की नको नकोसा होतो .......! 


                                       "अति पावसाचे लाड नाही कुणी करित…! 
                                       वहाता वहाता त्याने भानही  ठेवायाचे .... 
                                        दूर कुठेतरी कुणाचे घर आहे मातीचे ...."




                                                                                                                  समिधा

   

          




        




       






"इतिहास" एक संकल्पना ....!


टॉलस्टॉयची  " war  and pease " मधील शेवटच्या पानातील काही भाग .

'इतिहास ' या संकल्पनेवरच खुपच विस्ताराने विचार मांडला आहे .

     एखादी गोष्ट घडून गेल्यावर खुप काळाने जेंव्हा आपण मागे वळून त्या गोष्टीकडे पहातो तेंव्हा त्या काळी 
प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची कारण परंपरा आपण आजच्या परिणामाच्या  संदर्भात ठरवत असतो .  म्हणजे 
समजा , एखादी लढाई होउन गेली .  पुढे तिचा इतिहास लिहायचा झाला तर ती लढाई जो जिंकला  तोच कसा 
शूर  होता, त्याची योजना,शिस्त, त्याच्या सैनिकांची स्वामिनिष्टा , सात्विकता , पुण्याई सर्व काही गुणांनी त्याची बाजू अधिक जड़ असल्याने तो जिंकला , आणि त्या मानाने अनेक बाबतीत कमी पडल्याने त्याचा शत्रु 
हरला, हेच इतिहासाचे सार असते .

     प्रत्यक्षात मात्र परिस्तिथी फार वेगळी असू शकते .कधी कधी असेही असू शकते की , इतिहासकाराने जिंकणा -यांच्या खाती जमा केलेले गुण खरे तर हरलेल्याच्या जवळ असतात . तो कुठेही कमी नसतो . पण 
अचानक पाउस येतो , रोगराई येते , अपघात होते , निरोप पोहचवाण्याच्या मार्गात अनपेक्षित अडचणी येतात नैसर्गिक किंवा मानव निर्मित एखादे क्षुल्लक कारण परिणामी फार महत्वाचे ठरते आणि डांव उलटा पडतो .

        टॉलस्टॉयची  इतिहासाची ही संकल्पना वाचल्यावर एकुणच इतिहासाकडे  'खरे वास्तव '  म्हणून पहावे का .?असा प्रश्न पडतो .! अगदी आताचेच उदहारण म्हणजे संभाजी ब्रिगेड़ने 'ख-या' इतिहासाचे दाखले देत 'शिवाजी महाराजांचे 'दोदोजी कोंडदेव' हे गुरु  नव्हतेच ... आणि त्यांचा पुतळा रातोरात हट्वायला लावला .....! शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ महाराज एकदाही प्रत्यक्ष भेटले नाहीत मग ते त्यांचे अध्यात्मिक गुरु कसे ...? असाही ऐतिहासिक प्रश्न विचारला गेला . 

       पण शेवटी इतिहास हे काळाचे 'चरित्र ' असते !  आणि ते काळा प्रमाणे त्याच्यातही उलथापालथ होत राहणारच ......! आपल्या पर्यन्त आज पोहचलेला इतिहास हा कानगोष्टी सारखा एका कानातून दुस-या कानापर्यंत पोहाचलेला नसेल कशावरून .....? वेगळ्या अर्थी वेगळा अन्वयार्थ घेउन नवी फलश्रुति देणारा इतिहास ! पुढच्या पिढीपर्यन्त पोहचण्या पुर्वीच इतिहास  "इतिहासजमा"  होउ नये हीच इच्छा .......!




     

"स्वप्न" म्हणजे काय .......?

   


     "स्वप्न" म्हणजे काय .....? याचा शोध  घेताना आपण नकळत आपल्या आंतर गाभा-रयात जातो ......!
जिथे कधी कधी आपल्यातला स्व अवती भवति असतो ...... पण तरीही तो अदृश्य असतो…! तर  कधीतरी तो आपल्या सोबत इतराना घेतो… ! स्वप्न खुप अधभुत असतात ...... कालच मला स्वप्न पडले ......! मी लहानशी आमच्या जुन्या घराच्या मागच्या पडवित माझ्या बबली नावाच्या मैत्रीणीशी भातुकली भातुकली खेळत होते…!  आणि तिथे आमच्यात खेळायला  कोण आले ...... तर माझीच सहा वर्षाची चिमुकली मुलगी .....!   आणि मी तिला माझ्यात खेळायलाच  घेतले  नाही … ! ती बिचारी एवढेसे तोंड करून निघून गेली ......!
सकाळी उठले .... आणि मलाच माझ्या स्वप्नाची गंमत वाटली ......! माझ्या स्वप्नात मी एक  लहान मुलगी ..... आणि माझ्याबरोबर खेळायला मिळावे म्हणून हट्ट करणारी माझीच  चिमुकली लहान लेकही स्वप्नात येते ......! या स्वप्नाचा अर्थ काय लावावा ......?

     पण या स्वप्ना च्या अर्थाचा खुप विचार नाही करावा लागला .....! मी नोकरी करणारी आई ..... माझ्या लेकीला कितीसा वेळ मी देते ...?

   तिलाही माझ्या बरोबर खेळावेसे वाटते .....! पण मी तिच्या बरोबर मनसोक्त  खेळुही  शकत नाही ......! मलाही तिच्याबरोबर तिचे बालपण अनुभवायाचे आहे ..... पण घड्याळाच्या काट्यांमधे आमचे दोघींचे खेळणे हरवले  आहे…! मी माझ्या लेकीला माझ्या खेळात म्हणूनच नाही घेतले …!

      स्वप्नांचे आणि आपल्या जगण्याचे धागे असे एकमेकांत गुंफलेले असतात ......!  फक्त ती  स्वप्ने जागेपणी हरवलेल्या  दुर्लक्षित क्षणांची जाग  स्वप्नात आणून देतात…!

              "स्व"  ला समजून घेण्यासाठी स्वप्नांचा असा उपयोग होऊ शकेल कदाचित ........!!!!!! 



                                                                                                           " समिधा "
                                        






"इसीलिए शायद"

     असावरी काकडे मराठी साहित्य जगतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिध अश्या कवयित्री आहेत… १९९३ साली त्यांचा पहिला मराठी काव्य संग्रह प्रसिद्ध झाला "आरसा "  आणि या पहिल्याच काव्य संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला  ....!
      "इसीलिए शायद " हा त्यांचा हिंदी मधील काव्य संग्रह असून या काव्य संग्रहाला दिल्ली केंद्र निदेशालायाचा एक लाखाचा पुरस्कार मिळाला आहे…!
         आदरणीय असवरीजी या मझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री आहेत .....! त्यांच्याच "इसीलिए शायद " या काव्य संग्रहाचे वाचन करीत आहे ... त्यातील काही मौलिक ... तुमच्या पर्यन्त पोहचवन्याचा प्रामाणिक प्रयत्न .....!

       "इसीलिए शायद " कवितांचे वाचन चालू आहे .....! प्रत्येक कविते मध्ये एक आमच्याच मनातील विचार आहे ... पण त्या कवितांची दिशा एक वेगळा दृष्टिकोण  देऊन जाते ...!
…!
      जेंव्हा आपण त्या वादळात सापडलेले असतो तेंव्हा नियति ..... परमेश्वर ..... स्वत:च्या नशिबाला दुषणे देतो .... पण  'हर तूफान '  या कवितेने एक वेगळा दृष्टिकोण दिला आहे….!  

     कविता संग्रहातील ही सुरुवातिचीच कविता 'हर तूफान ' अप्रतिम .  आपल्या आयुष्यात कधी कधी असा  प्रसंग येतो  तेंव्हा जसे आज आपण असतो तसे कदाचित उरले नसतो .....! कदाचित तसे घडले नसतो ....!आयुष्यातील 'त्या' वादळामुळे  आपण असे काही ढवळून निघतो ... जसे आपल्या जीवन सागरात मंथन व्हावे आणि असे नवे काही लाभावे ज्याने आपल्या जीवनाला नवा अर्थ यावा…!

                                                     हर तूफान
                                                      हमेशा खत्म नहीं करता हमें
                                                      कभी कभी वह
                                                      पत्तों जैसे
                                                      उड़ाकर
                                                      पहुंचाता है वहाँ
                                                      जहाँ पहुँचने  के लिए
                                                      शायद हमें
                                                      कई साल गुजारने पड़ते .....!

    'प्रगति '  अतिशय समर्पक शब्दात मांडलेली ही कविता .......  माणसाची प्रगति  सर्व स्तरांवर होत आहे…!
आबादी ,भीड़ , गंदगी ...... प्रगतीचा पुढे जाणारा मार्ग दाखवताना तो कसा अध:पतनाकड़े नेतो ....हे या दृष्टांताने परखड पणे  दाखवून माणसातील माणुसकी घटत घटत तो माणसातुन पशु मध्ये परिवर्तित होत आहे .....! आजच्या माणसातिल पशुत्वाच्या घटना ऐकताना ही कविता मनाला चटका लावून जाते…!
                                               
                                                       आबादी
                                                       भीड़
                                                       गंदगी
                                                       इमारते
                                                       प्रदुर्षण
                                                       हवस
                                                      बीमारियाँ
                                                      धार्मिकता
                                                      भ्रषाटाचार
                                                     वैज्ञानिक प्रगति
                                                    वाहनोंकी संख्या
                                                    दुर्घटनाये
                                                    महंगाई
                                                    सब कुछ
                                                    बढ़ रहा है
                                                   तूफान की गति से

                                                   सिर्फ हम है
                                                  कि घटते जा रहे है ...!
                                                  गाँव शहर में
                                                 और
                                                शहर महानगर में
                                                बदलता जा रहा है
                                               और मनुष्य ?
                                              शायद पशु में ...!

     'वह औरत ' या कवितेतून एक असाहय स्त्री ची जगण्याची धडपड , जगण्यातील संघर्ष आपल्या मुलाना उराशी घट्ट पकडून ... रस्ता ओलांडण्याच्या एक कृतीतून दाखवला आहे ... याला तोड़ नाही ....! 'तिच्या ' जगण्याचा   अवघा संघर्ष यातून प्रतीत करून तिच्या संघर्षाची धार किती "धारदार" आहे हे 'ती जीवन की मृत्यु" कशाला घाबरते .....? असा शेवटी प्रश्न विचारून  आपल्याला थकक केले आहे  ..!

                                                     सहमी हुई
                                                    वह  औरत
                                                    रास्ता लाँघ रही थी

                                                    दोनों हातोंसे
                                                    उसने अपने
                                                   दो बचों कों
                                                   कसकर पकड़ा है

                                                    यातायात में
                                                    फँसी है वह
                                                    भर आई है उसकी आँखे

                                                   कुछ अलग ही
                                                  दिख रहा है
                                                  उसके चेहरे पर
                                                 छाया हुआ भय ..!

                                                एक संधिग्धता भाव
                                                मिला हुआ है ऑस में ...!
                                                शायद
                                                वह समझ नहीं प् रही
                                                कि उसे
                                                किससे डरना है
                                                मृत्यु से… ?
                                                या  जीवन से ?


    असावरीजी यांच्या  प्रत्येक कवितेत एक नवा दृष्टिकोण आहे .... त्याचाच शोध मी घेत आहे .... प्रत्येक कविता मनाला वेगाळाच आनंद देत  आहे .....!

     कोहारां , अकेली नहीं  ….  या सारख्या कविता  "बाई" तू  एकटी  नाहीस  …. तुझ्या आस पास। . तुझ्या मागे पुढे एक शक्ति आहे…. ! तिला तू पहाण्याचा  …. तिचे अस्तित्व जाणण्याचा  प्रयत्न कर  …. !

                        "हमारें दरमियान
                         सिर्फ
                         कोहरा ही तो है
                         देखो नं   …. "        किंवा

                        " मैंने देखा
                          पीछे
                          पूरब खड़ी हैं   …!


                         फिर चल पड़ी   …
                         अकेली नहीं , रोशनी के साथ   …!

         कविते मध्ये आशावाद ओतप्रोत भरलेला आहे  …!  "चोकों मत " ही कविता मनाला खुपच भावली   …!
यात इतके अनापेक्षित वर्णन आहे   … की मनाला स्पर्शुन गेल्याशिवाय रहातच नाही   …!


                  " चौंको मत
                    दरवाजे पर किसी की
                    दस्तक सुन कर
                   अनचाहा कोई नहीं होगा वहां
                   वह तो दस्तक दे कर
                    नहीं आता कभी   ….!

                   होगा शायद आँगन में
                   बिन बुलाये आ कर
                   नाचने वाला मोर
                   या फिर
                   बहुत पहले
                   उभरने की कोशिश में
                   दफन हुई  चाहत में से
                   उगे हुए बेनाम फूल की गंध  …!

    या आणि या  सारख्या अनेक अनपेक्षित कल्पना वाटाव्यात अश्या आशयाच्या कवितेतील ह्या ओळी आपल्याला मात्र "चौंका " देतात…!

                   " क्या होता "  …. ? ही कविता तर  मनुष्य प्राण्याच्या एकुणच वैशिष्ट्याला "नगण्य " स्वरुप देऊन जाते "चिड़िया   … तोता   … मैना
                  कौआ   … कबूतर   …
                  कई प्रकार के
                  पंछी होते है
                 अलग अलग रंग होते है   …!

                लेकिन
                उनके नाम नहीं होते
                हर  कौआ
                सिर्फ कौआ कहलाता है   ….!

पुढच्या ओळीमध्ये त्यानी जो प्रश्न केला आहे तो खरच विचार करण्यास प्रवृत्त करतो  ….

                 क्या होता
                 अगर  मनुष्य का  भी
                 कोई विशेषनाम ना होता   ।?
                 हर मनुष्य
                 सिर्फ मनुष्य कहलाता
                 तो क्या होता   …?

                 सिर्फ मनुष्य
                 न कोई नाम   … जात
                 धर्म   … भाषा  …. प्रांत   …
                 सिर्फ मनुष्य
                 कोई भेद नहीं   …

                वैसे भी
                तोते से बेहतर
               करता भी क्या है मनुष्य
               ऐसी कोई
               विशीष्टता पा कर  ….?


                आसावरी काकडे यांचा पहिला काव्य संग्रह " आरसा" आणि हा हिंदी काव्यसंग्रह "इसीलिए शायद " या मधील आशय  आणि विषय भिन्न आहेत  … कवितांची प्रकृति  आणि त्या कवितामधिल प्रवृति वैश्विक आहे    … समाजशीलता हा या कवितांमधील मुळ गाभा आहे असे मला वाटते  …! तरीही प्रत्येक वाचकाची मनोदृष्टि वेगळी असते …  त्या दृष्टीने ह्या  कविता अधिक  गहन अर्थाने समोर येऊ शकतात   …!

                  या काव्यसंग्रहातिल सर्वच कविता एका वेगळ्या अर्थाने  मनाला आनंद देतातच पण मनाला भिड़ताना विचार करण्यास प्रवृत्त करतात   . ज्याना आसावरी काकडे यांच्या आधीच्या कविता वाचून माहित असतील त्याना हा काव्यसंग्रह आवडेलच पण ज्याना त्या अजुन कवितेमधुन  भेटल्या नसतील त्याना त्यांचे हे साधे  सोपे वाटणारे  पण तरीही विलक्षण काव्य  नक्कीच पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल !!!!


               त्यांच्याच संग्रहातील शेवटच्या  कवितेतील ओळी

                     कितने अद्भुत होते है
                     शब्द  !
                     कई तरह
                     कई बार
                     सत्य को
                     उजागर करते है
                     और फिर
                     धक् लेते है उसे
                     अपने ही प्रकाश से  … !


                    ओह   …!
                    कितने अद्भुत है
                    शब्द   …!



कवितासंग्रह:- "इसीलिए शायद" 
कवयित्री :- आसावरी काकडे
प्रकाशक :- सेतु प्रकाशन (पुणे)

                                                                                 BY  पुष्पांजली कर्वे 













                 





                       
                          

                                                                                                   



  

"देवाशी भांडण"

"देवाशी भांडण" या लेखावरिल वरील आपले विचार  काही पातळी वर समर्थनीय वाटतात  तर काही पातळीवर मनाला पटत  नाहीत .
     एक म्हणजे "देवाशी भांडण" करणारी स्त्री ही पुरुष प्रधान समाजरचनेला शरण गेलेली पापभिरू स्त्री वाटते .किंवा कदाचित ती  खरोखरच दुस-याच्या उद्धारात आपला उद्धार आहे असे समजुन उमजुन 'सवत ' घरात आणून स्वत:च्या स्वत्वाला मिटवून 'मोठ्या हृदयाची  म्हणून त्यागमूर्ति झालेली 'निष्ठावान स्त्री असावी असे वाटते .
    पण दूसरी आजची आधुनिक बुद्धिवादी स्त्री मला अधिक खरी वाटते  .  कारण ती  तिच्यातील स्वत्वाशी      ख-या अर्थाने निष्ठावान आहे , त्यामुले ती  पुरुषी समाज रचनेला शरण जात नाही की त्याग मूर्ति हो सार्थक्यही मिळवत नाही .ती आपली निष्ठा डोळसपणे जागवते/जगवते  म्हणून कोणतीही सजग आधुनिक स्त्री जेंव्हा तिला  कळते की , आपला नवरा आपल्याला मूल देऊ शकत नाही तेंव्हा ती आधुनिक बुद्धिवादी 
स्त्री डोळसपणे परिस्थितीचा स्वीकार करते 'त्याचा ती त्याग करत नाही तर उपलब्ध सर्व उपचार उपायांचा अगदी 'दत्तक ' घेण्याचाही निर्णय घेण्यास तयार असते . पण जर याच्या  उलट परिस्थिति असेल तर ...?पुरुष काय करेल , जरी त्याची मूल्य, निष्ठां कितीही घट्ट असले तरी परिस्थितीला मुरड  घालणार नाही .... तो  मुल्याना त्याच्या निष्ठेला मुरड  घालेल ....! (म्हणजेच स्वत:ची समाज मान्य सोय पाहील )
    त्यामुले आजच्या आधुनिक बुद्धिवादी स्त्रीचे वागणे व तिची  बदलाणारी मूल्य ही तिच्या ठायी बदलत      असणा-या  सक्षमतेचे प्रतिक आहे असे वाटते .....!
     एकुणच जगण्याच्या मुल्यांचा विचार केला तर जसे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . मग मानवी मूल्य काळाप्रमाणे बदलणारच .....त्यांच्यातही परिवर्तन घडणारच (कारण आज परिस्थितीला मुरड  घालण्यापेक्षा मुल्यांना मुरड घालणे अधिक सोपे झाले आहे )
     मुल्यां बाबत अधिक व्यापक विचार केला तर "जेंव्हा मूल्य ही मानवी जीवनाची वृत्ति बनते  तेंव्हा मानव स्वत:पासून मुक्त होउन सर्वांशात जाउन मिळतो    ....! अर्थात मुल्य आपला आत्मशोध आहे जो परमात्म्याशी जाउन मिळण्याची शक्ति आहे ऊर्जा आहे .  आणि अशी ऊर्जा स्वत:पार होउन इतरांच्या ठायी आनंद देण्यास आपल्याला उद्युक्त करते  ...! आणि म्हणुनच 'आनंद ' चित्रपटातील 'आनंद' मला खरा वाटतो ....!
        थोडक्यात   आजची परिवर्तनशील मूल्य आजच्या जगण्यासाठीची गरज असेल व "जगण्याशी प्रमाणिक असतील" तर ती  लेखन आणि प्रत्यक्ष जगण या दोन्ही स्तरांवर स्विकारावीच लागतात ….!


                                                                                                    "  समिधा "



*****सखी******




          "सखी" ही काव्यात्मक रोमॅंटिक मराठी कादंबरी मला माझ्या कॉलेजच्या एका प्रिय  सखीनेच वाढदिवसाला भेट म्हणून दिली  .  कविता हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा  विषय आहे , त्यामुळे ही कादंबरी म्हणजे तिने मला दिलेला प्रेमाचा नजराणा होता  ..!  कादंबरी मी  एका बैठकितच वाचली पण तरीही मन  अजूनही भरले नव्हते म्हणून पुन्हा वाचली  .... पण आजही इतक्या वर्षांनीहि ह्या कादंबरीचा गोडवा कमी झाला नाही  .  कधीही मल एकटे वाटले , थोड़े  मझ्यातच  मला रमावे  वाटले   .... कधी प्रेमात रमावे वाटले की ही कादंबरी उघडून वाचते   .... आणि आता  इतक्या वर्षांनी तिचं पान नं पान इतकं ओळखीचं झालय की एखाद्या गाण्याची जशी एक एक हरकत ,  एक एक आलाप आपल्या मनाच्या गाभा-यात आधीच घुमू लागते  अगदी तशीच एक एक पानाच्या एक एक शब्दामागील भावनांचे तरंग मनात आधीच अलगद येऊन रुंजी घालतात  ...! 
 "पत्रव्यवहाराने प्रेम करणे, हा प्रेमाचा आदर्श प्रकार आहे...! याचे प्रत्यंतर देणारी अशी ही कादंबरी  .  लेखक वामन देशपांडे यांनी लिहिलेली *सखी* हि एक आदर्श प्रेम कादंबरी आहे....! ज्याचे कवितेवर प्रेम आहे त्यांच्यासाठी हि कादंबरी म्हणजे काव्याझुल्यावर झुलल्याचा आनंद लुटल्या सारखे आहे.

     एक 'तो ' आणि एक 'ती ' दोघांचेही कवितेवर प्रेम ... 'तो ' लेखक तर 'ती' एक काव्य रसिक.  "कविता" या एकाच  समान धाग्यामुळे  एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेली पण पत्रमैत्रीने झालेली ओळख त्या दोघांमध्ये त्यांच्याही नकळत काव्यमय नाते विणत गेली .  या वीणेत एक एक वीण आतुर, व्याकुळ,  भावविव्हल धाग्यांनी गुंफली होती ... त्यांची हि वीण इतकी घट्ट होती कि , एकमेकांच्या संवेदना त्यांना पत्रातील अक्षरांमधून हृदयाला भेदून जात होत्या ...!

     दोघांचेही जीवन दुख:रुपी एकाच नावेत प्रवास करीत होते. सखीचे आयुष्य वसंत ऋतूच्या आगमनालाच शिशिर ऋतूची दृष्ट लागावी तसे फुल फुलल्या नंतरचे सुख तिला मिळालेच नाही.... तिचा सुगंध दरवळण्यापुर्वीच पाकळ्यांच्या कुपीत नियतीने तो बंद केला ...!

     'त्याचे' आयुष्य दिशा हरवलेल्या तारुसारखे एकटेच भरकटत होते.  अगदी पहिला सुरातला संसार असूनही त्याच्या सुरांमध्ये न गाणारा ..... शेवटी तोच त्यांच्यात बेसूर ठरला.. आणि वेगळा, अगदी एकटा ... एकटा पडला......!!

     या अश्या काळात 'ती' व 'तो' यांची ओळख झाली .... हि नुसती अक्षर ओळख त्यांनी एकमेकांना  लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून अशी झिरपत झिरपत त्यांच्याही नकळत त्यांच्या अंत:करणात प्रेम होऊन व्यापून राहिली .....! प्रत्येक पत्रात त्यांनी आपल्या निशब्द भावनांचे वर्णन कधी कवी ग्रेस, पाडगांवकर , बोरकर, बालकवी , कवी महानोर,संगीता जोशी, नीता भिसे , मराठी गझलचे महामेरू कवी सुरेश भट यांच्या विविध भावनांनी ओथांबलेल्या काव्यानि केले आहे. आणि अशी काव्यात्मक कादंबरी वाचण्याचा आनंद आपल्याला अनुभवाच्या एका विशिष्ट उंचीवर नेउन ठेवतो.उदा:

     जेंव्हा त्याचे दुख: तिला कळते ... त्याच्या दुख:ने ती खचून जाते .. त्याच्या दुख:त साथ देण्यासाठीच आश्वासन व्यक्त करते ते कवी ग्रेस यांच्या कवितेतून ....

              " रात्र थांबवूनी असेच उठावे
                तुझ्या पाशी यावे क्षणांसाठी
                डोळीयांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेठी
                आणि दिठी दिठी शब्द यावे .....

               तुही थेंब थेंब शब्दासाठी द्यावा
               अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
               आणि उजाडता पाठीवर ओझे
               वाटे पाशी डोळे तुझे यावे.....!


किंवा याच संदर्भात नीता भिसे यांची गझल

              " तुझ्या घराला तोरण, माझे बांधले दिवस
                तुझ्या दाराशीच सारे , माझे थांबले दिवस

                एक एक गोळा केला तुझ्याबरोबर क्षण
                नको समजूस मनी तुझे सांडले दिवस

               आता बोलणेही नाही आता भेटणेही नाही
               खंत करण्यासाठीही कुठे राहिले दिवस ....?

               काय घडून जे गेले , तुझ्या ध्यानी मनी नाही
               मला कळण्यासाठीही किती लागले दिवस .....

               पाने वाळली जातात, खोड वठली जातात
               हिरवेगार राहतात कसे आतले दिवस .....!

अश्या अनेक कविता कादंबरीभर प्राजक्ताचा सडा  पडावा तश्या उधळल्या आहेत.....!

     'ती' आणि 'तो' सुद्धा या काव्यमय झुल्यावर झुलत स्वप्नांचे , कल्पनांचे इमले बांधत त्यावर त्यांना मिळालेल्या आनंदाची तोरणे बांधत नव्या जीवनाला ते नव्या दिशेने नेत होते ....! त्याच्या प्रेमकहाणीत सखीने रंग भरले .... त्याच्याच रंगात रंगून आपल्यापुढे तिने सुंदर रांगोळी काढली .. त्या रांगोळीत त्याचेच रंग भरून त्याची वाट  पाहत राहिली...!

     दोघेही भेटण्यासाठी आतुर व्याकुळ होते... पण तरीही ती आणि तो शेवटपर्यंत एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेच नाहीत... ती तशीच आपल्या उंबरठ्यापाशी त्याची वाट  पाहत ... त्याच्या दु:खात दु:खाप्रमाणे साथ देण्याचे आश्वासन देत आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून त्याला जोजावन्याचेही तिने सांगितले  पण ....... तो नाही आला .....!

     'तोही  व्याकुळ आणि असहाय्य होता ....! ह्या पूर्ण कादंबरीचे वाचन करतांना  आपण त्यात इतके गुंतले जातो कि ,'ती' व 'तो' आपण आपल्यातच जगायला लागतो ...!त्यांचे उत्कट प्रेम आपले मन व्यापून जाते...!  ह्या कादंबरीचे शेवटचे विवेचन वाचतांना हृदयात एक कळ उठते ..... त्यांचे प्राक्तन त्यांना एकमेकांना अखेरपर्यंत नाही भेटू देत...!  दोन प्रेमिजीवांमधील शत्रू त्यांचे प्राक्तन... नियती ठरते...!

      कादंबरीचा शेवट .... "त्याच्या शेवटच्या पत्रातल्या दोन ओळीतून सुटलेल्या जागेत त्याची अखेरची व्याकूळता , असहायता दिसत होती...! ह्या पत्रात त्याची खाली सही नव्हती ... तर अश्रूत विरघळेलेले अक्षरांचे पुंजके .....!

     त्या पुंजक्यांचा अर्थ लावला ... तर तो  अत्यंत वेदनामय असा होता...!  पत्रात सोडलेल्या दोन ओळीतील जागेत त्याची व्याकुळता,विरहवेदना , दु:ख दिसत होते...!  ज्या रात्री पत्र लिहिले रात्री नदीत दिवे सोडावेत तसे  त्याने स्वत:ला झोकून दिले होते ...! त्या दिव्याबरोबर वाहत वाहत तो पलीकडच्या तीरावर गेला जिथे गोकुळातील त्याची सखी (मनु ) राधा त्याची वाट  पाहत होती.... आणि वैकुंठातल्या घंटा त्याला ऐकू येत होत्या...! "तिला  तिचे प्राक्तन कळले होते ....."राहिले ....दूर...घर....सख्याचे....!

     ही काव्यमय कादंबरी प्रत्यक्ष वाचणे हा एक अत्यंत सुंदर अनुभव ठरावा...! कधीही न कोमेजणारी..... प्रत्येकाला आपले मन हिरवेगार ठेवणारी भावना म्हणजे "प्रेम"  याचा अनुभव देणारी हि कादंबरी आहे ...! आयुष्याच्या वैशाख वणव्यातही वसंत ऋतूचा आनंद देणारी अशी हि कादंबरी आहे...! 

    माझ्या सहवाचन कट्ट्या वरील सर्व मित्र मैत्रीणीनी   हि कादंबरी जरूर जरूर वाचावी  आणि काव्यमय झुल्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ..... आणि आपला स्वत:चा वेगळया अनुभवाचा अन्वयार्थ लावावा  ......!!!!!

कादंबरीचे नाव:    *सखी*
लेखक        :    वामन देशपांडे
प्रकाशिका     :    सौ. सुरेखा करंदीकर
प्रथम आवृत्ती  :   ३० ओगस्ट , १९९३.


                                                                           समिधा  

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......